Wednesday, February 17, 2010

केली मी आत्महत्या


भेकड म्हणेल कुणी मला
मुर्ख किंवा बेजबाबदार सुद्धा
पण भिती उरली नाही आता कुणाची
हो, केली मी आत्महत्या ।।

रडताहेत बघा आता कसे
ते घरचे अन् शेजारचे
पण कधी दोन मार्क कमी मिळाले
तर अक्षरशः लचके तोडायचे.
शाळा, कॉलेज, क्लास, CET
चा घोळ कधी संपलाच नाही
स्पर्धेचा चक्रव्युह अभिमन्युलासुद्धा
भेदता आलाच नाही ॥

म्हणे बालपण निरागस असतं
आपल्याला कुठे ठाऊक होतं
साला अर्धा वेळ शाळा
अन उर्लेला वेळ homework खातं.
पप्पा म्हणायचे, दादाला बघ
कसा engineer  झाला मोठा
95 टक्क्यांहून कमी मिळाले
तर पाठीत ठरलेला रट्टा.
प्रत्येक पायरी चढता चढता
स्पर्धा सुद्धा वाढत गेली
एकएका गुणासाठी मारामार
ही काय साली जिंदगी झाली?
निघालो होतो कुठल्या दिशेने
प्रवाहाने आणून फेकलं कुठे
उमज आली खूप उशीरा
आता मागे फिरणं नव्हे ।।

मग उचललं एक दिवस rat-kill
किंचित थरथरला हात
घडू दे चंगली अद्दल म्हणून
गिळलं एका झटक्यात.
आठवण आली फक्त आईची
जिचा तुटायचा माझ्यासाठी जीव
माझ्या आकांक्षा, स्वप्नांची
फक्त तिलाच होती जाणीव.
विचलीत झालं माझं मन
तिच्यासाठी क्षणात त्या
पण मेलो होतो कधीच मी 
फक्त आज केली आत्महत्या ॥ 

-तन्वी देशपांडे 

Tuesday, February 16, 2010

आझाद मैदानावरील धरणे

दोन वाजताची वेळ ठरलेली होती. मी, सचिन, गणेश अन संजय धावपळ करतच आझाद मैदानावर सव्वादोनच्या सुमारास पोहचलो, आम्हाला वाटलं उशीर झालाय आणि कदाचित कार्यक्रम सुरूही झाला असेल. निर्माणसह रेशनिंग कृती समिती, स्त्री मुक्ती संघटना, महिला मंडळ फेडरेशन, महाराष्ट्र महिला परिषद या सारख्या महाराष्ट्रातील २८ संघटना आझाद मैदानावर शासनाच्या धान्यापासून दारू बनवण्याच्या धोरणा विरोधात महात्मा गांधी पुण्यतिथी दिवशी धरणे धरणार होत्या. आत्तापर्यंत अमुक संघटनेने, अमुक ठिकाणी, काही मागण्यांसाठी किवा विरोध दर्शवण्यासाठी धरणे धरले, मोर्चा काढला वगैरे गोष्टी मी फक्त वर्तमानपत्रातून वाचत ऐकत आलो होतो. आज मात्र प्रत्यक्ष मी हे सगळं अनुभवणार होतो. आम्हाला पोहचायला उशीर होण्यााचं कारण सकाळपासून आम्ही वाशीच्या ऑफिसमध्ये धरण्यासाठी लागणारी पोस्टर्स बनवत होतो. तर सचिन मुख्यमंत्र्यांना द्यावयाच्या निवेदनावर शेवटचा हात फिरवत होता. आम्ही चौघांनी ऑफिसात नुसता गोंधळ घातला. पोस्टर बनवायला पेपर आहे, तर स्केच पेन नाही प्रिंटर बिघडलाय, पेनड्राईव चालत नाहीये, अशा अडथल्याना पार करत पाच-सहा पोस्टर्स बनवली.

आझाद मैदानावर पोहचलो तेव्हा आम्ही चौघे सोडून आणखी फक्त चार-पाच जणं जमली होती अन कार्यक्रम सुरुच काय पण आणखी काही तयारीही झाली नव्हती, माझा खरंतर मूड ऑफ झाला. आझाद मैदानावर एक दुसराच कार्यक्रम चालू होता त्यासाठी बरीच जनता आली होती. त्यामुळे आम्ही एका कोप-यात जाऊन थाबलो. हळूहळू एक एक जण येत होता. मागे झालेल्या धान्यापासून दारू विरोधी परिषदेमुळे बरेच चेहरे ओळखीचे वाटत होते. ब-याचजणांनी पोस्टर्स आणली होती. मग आम्ही ती भिंतीवर लावण्यालस सुरुवात केली. एकीकडे माइक व स्पीकर्सची व्यवस्था होत होती. तीन वाजेपर्यंत ३००-३५० जनता जमा झाली. बहुतांशी महिला होत्या. आम्ही पन्नास एक पुरुष मंडळी असू. माईकची व्यवस्था झाल्यावर चळवळीतील गाणी व दारू विरोधात घोषणा सुरु झाल्या. आता जरा काहीतरी घडते आहे असा वाटू लागलं. गणेश व सुनील ने "सांग सांग भोलानाथ दारू मिळेल का?" हे गाण म्हटलं. त्यानंतर गोरक्षभाऊनी आपण इथे का जमलो आहोत याची सर्वांना कल्पना दिली. या धरण्यामधे सहभागी असलेल्या विविध संघटनांनी मागील काही दिवसात धान्यापासून दारू विरोधात स्वाक्षरी व पोस्टकार्ड मोहिमा राबवल्या होत्या. त्यात निर्माणच्या वतीने आम्हीही वाशी व ठाणे इथे अशाप्रकारचे काम केले होते. तर या सर्व स्वाक्ष-या व धान्यापासून दारूविरोधी अभियानाच्या मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्र्यांची भेट घेवून त्यांना द्यावयाचे असे धरण्याचे स्वरूप ठरले.

जेव्हा एखादी संघटना आझाद मैदानावर काही मागण्या घेवून धरणे धरते किंवा मोर्चा काढते, तेव्हा तेथे उपस्थित असणा-या पोलीस अधिका-यांची ही जबाबदारी असते की त्यांनी मंत्रालयातील संबंधित मंत्र्यांशी किंवा अधिका-यांशी संपर्क साधून जनतेच्या मागण्या/मते त्यांच्यापर्यंत पोहोचवाव्यात. जर आपणास त्या संबधित मंत्र्यांची/अधिका-यांची भेट हवी असेल तर तशी व्यवस्था होऊ शकते. अर्थात या गोष्टी मला माहीत नव्हत्या. या आधी कितीदातरी मी या मैदानासमोरून गेलो असेन पण या गोष्टीची मला कल्पना नव्हती.

आता घोषणा व भाषणे यांमुळे धरण्याचा रंग चढू लागला होता. उल्काताई तर खूप छान बोलल्या. सुरेशकाकांनी आपल्या मागण्या म्हणजे मुख्यमंत्र्यांची भेट घेणे व त्यांना २३००० सह्या असणारे मागण्यांचे निवेदन देणे पोलिसांसमोर ठेवल्या. अर्थात त्यांनी काही फारसे लक्ष दिले नाही. एकीकडे घोषणा चालू होत्याच. संध्याकाळी पाच वाजून गेल्यानंतरही काहीच होत नाहीये असे दिसल्यावर आम्ही पोलिसांना इशारा दिला की जर आम्हाला थोड्यावेळात भेट मिळाली नाही तर जमलेले सर्व चारशे लोक मंत्रालयात जाऊन स्वतः मुख्यमंत्र्यांची भेट घेतील. यावरही पोलिसांनी चालढकलपणा व दूर्लक्ष केलं. मग आम्ही मंत्रालयात सत्याग्रहाच्या मार्गाने जाण्याचे ठरवले व दोन-दोनच्या रांगा करून, हातात पोस्टर्स घेवून आझाद मैदानाच्या गेटकडे जाण्यास सज्ज झालो. आम्ही उत्साही तरुण पुढच्या रांगेत जाऊन उभा राहिलो, तेव्हा भारतीताईनी काही महिलांना पुढे उभे केले.

समोर महात्मा गांधींचा फोटो घेवून दोन महिला होत्या. त्यांच्या मागे दोन-दोनच्या रांगा करून आम्ही सर्वजण आझाद मैदानाच्या गेटकडे निघालो. हा आमचा पवित्रा पाहून पोलिसांमधेही हालचाल दिसू लागली. आता पोलिसांची संख्या वाढलेली होती, जवळपास ५०-६० पोलीस आझाद मैदानाच्या गेट वर आम्हाला अडवण्यासाठी जमा झाले होते. मागे पाच-सहा पोलीस व्हॅानही होत्या. बहुदा अटक करावी लागलीच तर कामी येतील असा त्यांजचा विचार असावा. आम्ही गेटकडे चालू लागलो, सर्वांनाच पुढे काय होणार याची उत्सुकता होती अन थोडी भीतीही वाटत होती. पोलीस, मोर्चा, धरणे या अश्या गोष्टी मी तरी पहिल्यांदाच अनुभवत होतो, आपण काहीतरी वेगळं अनुभवतोय असा वाटत होतं. आम्ही सगळे गेटला भिडलो व पोलिसांनी बंद केलेले गेट उघडण्याचा प्रयत्न करत होतो. तर ते आम्हाला मागे रेटत होते. सगळे आझादमैदान घोषणांनी भरून गेले होते. - "बडी शरम कि बात है पुलिसभी उनके साथ है" अन "एक रुपयाचा कडीपत्ता, मुख्यमंत्री बेपत्ता".

काही वेळातच वातावरण चांगलेच तापले, पोलीस अन कार्यकर्त्यांमध्ये रेटारेटी सुरु झाली. पाच-सहा पोलीस गोरक्षभाऊंना घेरून त्यांच्याशी बाचाबाची करू लागले. त्यांच्यावर उगारलेली काठी सुनीलने हातात पकडून ठेवली. मग पोलिसांनी सुनीलला बाहेर काढले अन गाडीत टाकले. आता मात्र सगळाच जमाव उसळला व घोषणांचा जोरही वाढला. मला त्या क्षणाला एक गोष्ट जाणवली की आपणच निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींना भेटण्यासाठी व त्यांच्यासमोर आपल्या मागण्या ठेवण्यासाठी जर एवढा संघर्ष करावा लागत असेल तर गांधींना 'इंग्रजांनो देश सोडा' असे म्हणतांना किती संघर्ष करावा लागला असेल. एका क्षणासाठी त्या कल्पनेने मी थरारून गेलो. बाहेर एवढा गोंधळ चालू असतानाही त्या क्षणासाठी अंतर्मुख झालो. नाहीतर आजपर्यंत सत्याग्रह, मोर्चा, आंदोलने हे शब्द नुसते वाचत किंवा ऐकत आलो होतो, त्याचा थोडा थोडा अर्थ आता कळतोय अस वाटू लागल. चांगल्या गोष्टींसाठी असा हा संघर्ष करणार्यांबद्दल आदर वाटू लागला अन मी नकळत ते गेट जोराने ढकलू लागलो.

साडेसहाच्या सुमारास पोलिसांनी, मुख्यमंत्री तर नाही पण गृहमंत्रालयातील सचिव श्री संगीतराव भेट घेण्यासाठी तयार आहेत असे सांगितले व तुमच्यापैकी कोणीही एकजण भेटू शकता असा निरोप पोलिसांनी आम्हाला सांगितला. पण आम्ही कमीतकमी पाचजणांचे शिष्टमंडळ त्यांना भेटेल या मुद्यावर अडून राहिलो. थोड्याच वेळात तीही परवानगी मिळाली. मुख्यमंत्री मुंबईमध्ये नाहीत तेव्हा संगीतरावना भेटा. ते तुमचे म्हणणे मुख्यमंत्र्यांसमोर मांडतील असे सांगण्यात आले. सचिन, सुरेशकाका अन् आणखी तीघे असे पाचजण सचिवांना भेटण्यास पोलिसांच्या गाडीतून गेले. आम्ही सगळे परत मैदानात येऊन बसलो. तासाभराने शिष्टमंडळ पोलिसांच्याच गाडीतून परत आझाद मैदानावर आले. सचिवांनी निवेदन स्वीकारले होते व ते मुख्यमंत्र्यांना सादर करणार होते. सचिन म्हणाला की “सचिवांनी आम्हाला विशेष काही बोलू दिले नाही, तुम्हीच पुन्हा या विरोधाचा नीट विचार करा या विषयीचा तुमचा अभ्यास नाही” अशी उडवाउडवीची उत्तरे त्यांनी दिली.

एक गोष्ट तर स्पष्ट झाली की एवढ्या सहजासहजी आपले ध्येय साध्य होणार नाहीये, ही तर सुरवात आहे ...आगे आगे देखते है होता है क्या?
 
- त्रिशूल कुलकर्णी