गेले दीड वर्ष रोजगार हमी योजना हा विषय घेऊन निर्माण फेलोशिप अंतर्गत शिक्षण, काम चालू आहे. आपल्या देशातील सद्य परिस्थिती बघता अशा उपक्रमांची नितांत गरज आहे. ग्रामीण भागात राहून उत्पादक कार्य करायचे असेल तर पाणी हे अत्यंत महत्त्वाचे ठरते. रोजगार हमीतून पाण्याचे व्यवस्थापन करण्यासाठीची पायाभून कामे करून या पाण्याच्या आधारे स्थानिक रोजगार निर्मिती व्हावी असा याचा उद्देश.
एका बाजूला हे काम चालू आहे. सरकारी योजना जशी चालते त्या कार्यक्षमतेनी ही देखील योजना चालू आहे. मधे विवेक सावंतांशी चर्चा करत असताना असा विषय निघाला की आजच्या सरकारी योजनेंमध्ये माणसाच्या बुद्धीला, उद्योजकतेला चालना मिळेल असे पैलू नसतात आणि त्यामुळे यात लोकांच्या बाजूने ओढा नाही दिसत. सरकार करेल तर आम्ही येवू असा एक भाव असतो. यातून मार्ग कसा काढायचा? माझ्या पायावर उभा राहण्यासाठी धडपड करण्याच्या वृत्तीला चालना मिळेल आणि अशा धडपड्या व्यक्तीला मदत म्हणून सरकार पाठीशी उभे असेल अशा योजना कशा बनवता येतील?
या चर्चेनंतर जमेल तिथे लोकांशी संवाद करत असताना अशी काही स्वयंरोजगाराची, उद्योजकतेची वेगळीच उदाहरणे बघायला मिळाली ती मांडण्याचा इथे प्रयत्न करत आहे.
पेठ नाशिक रस्त्यावर वाटेत एक घाट आहे. घाटातून परतत असताना एका बाईक वर भरपूर भंगार वाटावे असे सामान घेऊन जाताना एक माणूस दिसला. मला वाटलं जाऊन विचारवं की एवढे कुठे घेऊन जाताय, पण ते काही जमले नाही. थोडे पुढे एक मारुती चे छोटेसे देऊळ आहे. तिथे तो माणूस थांबला. मग मी ही थांबलो आणि त्याच्याशी गप्पा मारल्या... त्याचा विडियो खाली आहे. यात बहुतेक गोष्टी आलेल्या आहेत.