Wednesday, February 17, 2010
केली मी आत्महत्या
Tuesday, February 16, 2010
आझाद मैदानावरील धरणे
आझाद मैदानावर पोहचलो तेव्हा आम्ही चौघे सोडून आणखी फक्त चार-पाच जणं जमली होती अन कार्यक्रम सुरुच काय पण आणखी काही तयारीही झाली नव्हती, माझा खरंतर मूड ऑफ झाला. आझाद मैदानावर एक दुसराच कार्यक्रम चालू होता त्यासाठी बरीच जनता आली होती. त्यामुळे आम्ही एका कोप-यात जाऊन थाबलो. हळूहळू एक एक जण येत होता. मागे झालेल्या धान्यापासून दारू विरोधी परिषदेमुळे बरेच चेहरे ओळखीचे वाटत होते. ब-याचजणांनी पोस्टर्स आणली होती. मग आम्ही ती भिंतीवर लावण्यालस सुरुवात केली. एकीकडे माइक व स्पीकर्सची व्यवस्था होत होती. तीन वाजेपर्यंत ३००-३५० जनता जमा झाली. बहुतांशी महिला होत्या. आम्ही पन्नास एक पुरुष मंडळी असू. माईकची व्यवस्था झाल्यावर चळवळीतील गाणी व दारू विरोधात घोषणा सुरु झाल्या. आता जरा काहीतरी घडते आहे असा वाटू लागलं. गणेश व सुनील ने "सांग सांग भोलानाथ दारू मिळेल का?" हे गाण म्हटलं. त्यानंतर गोरक्षभाऊनी आपण इथे का जमलो आहोत याची सर्वांना कल्पना दिली. या धरण्यामधे सहभागी असलेल्या विविध संघटनांनी मागील काही दिवसात धान्यापासून दारू विरोधात स्वाक्षरी व पोस्टकार्ड मोहिमा राबवल्या होत्या. त्यात निर्माणच्या वतीने आम्हीही वाशी व ठाणे इथे अशाप्रकारचे काम केले होते. तर या सर्व स्वाक्ष-या व धान्यापासून दारूविरोधी अभियानाच्या मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्र्यांची भेट घेवून त्यांना द्यावयाचे असे धरण्याचे स्वरूप ठरले.
जेव्हा एखादी संघटना आझाद मैदानावर काही मागण्या घेवून धरणे धरते किंवा मोर्चा काढते, तेव्हा तेथे उपस्थित असणा-या पोलीस अधिका-यांची ही जबाबदारी असते की त्यांनी मंत्रालयातील संबंधित मंत्र्यांशी किंवा अधिका-यांशी संपर्क साधून जनतेच्या मागण्या/मते त्यांच्यापर्यंत पोहोचवाव्यात. जर आपणास त्या संबधित मंत्र्यांची/अधिका-यांची भेट हवी असेल तर तशी व्यवस्था होऊ शकते. अर्थात या गोष्टी मला माहीत नव्हत्या. या आधी कितीदातरी मी या मैदानासमोरून गेलो असेन पण या गोष्टीची मला कल्पना नव्हती.
आता घोषणा व भाषणे यांमुळे धरण्याचा रंग चढू लागला होता. उल्काताई तर खूप छान बोलल्या. सुरेशकाकांनी आपल्या मागण्या म्हणजे मुख्यमंत्र्यांची भेट घेणे व त्यांना २३००० सह्या असणारे मागण्यांचे निवेदन देणे पोलिसांसमोर ठेवल्या. अर्थात त्यांनी काही फारसे लक्ष दिले नाही. एकीकडे घोषणा चालू होत्याच. संध्याकाळी पाच वाजून गेल्यानंतरही काहीच होत नाहीये असे दिसल्यावर आम्ही पोलिसांना इशारा दिला की जर आम्हाला थोड्यावेळात भेट मिळाली नाही तर जमलेले सर्व चारशे लोक मंत्रालयात जाऊन स्वतः मुख्यमंत्र्यांची भेट घेतील. यावरही पोलिसांनी चालढकलपणा व दूर्लक्ष केलं. मग आम्ही मंत्रालयात सत्याग्रहाच्या मार्गाने जाण्याचे ठरवले व दोन-दोनच्या रांगा करून, हातात पोस्टर्स घेवून आझाद मैदानाच्या गेटकडे जाण्यास सज्ज झालो. आम्ही उत्साही तरुण पुढच्या रांगेत जाऊन उभा राहिलो, तेव्हा भारतीताईनी काही महिलांना पुढे उभे केले.
समोर महात्मा गांधींचा फोटो घेवून दोन महिला होत्या. त्यांच्या मागे दोन-दोनच्या रांगा करून आम्ही सर्वजण आझाद मैदानाच्या गेटकडे निघालो. हा आमचा पवित्रा पाहून पोलिसांमधेही हालचाल दिसू लागली. आता पोलिसांची संख्या वाढलेली होती, जवळपास ५०-६० पोलीस आझाद मैदानाच्या गेट वर आम्हाला अडवण्यासाठी जमा झाले होते. मागे पाच-सहा पोलीस व्हॅानही होत्या. बहुदा अटक करावी लागलीच तर कामी येतील असा त्यांजचा विचार असावा. आम्ही गेटकडे चालू लागलो, सर्वांनाच पुढे काय होणार याची उत्सुकता होती अन थोडी भीतीही वाटत होती. पोलीस, मोर्चा, धरणे या अश्या गोष्टी मी तरी पहिल्यांदाच अनुभवत होतो, आपण काहीतरी वेगळं अनुभवतोय असा वाटत होतं. आम्ही सगळे गेटला भिडलो व पोलिसांनी बंद केलेले गेट उघडण्याचा प्रयत्न करत होतो. तर ते आम्हाला मागे रेटत होते. सगळे आझादमैदान घोषणांनी भरून गेले होते. - "बडी शरम कि बात है पुलिसभी उनके साथ है" अन "एक रुपयाचा कडीपत्ता, मुख्यमंत्री बेपत्ता".
काही वेळातच वातावरण चांगलेच तापले, पोलीस अन कार्यकर्त्यांमध्ये रेटारेटी सुरु झाली. पाच-सहा पोलीस गोरक्षभाऊंना घेरून त्यांच्याशी बाचाबाची करू लागले. त्यांच्यावर उगारलेली काठी सुनीलने हातात पकडून ठेवली. मग पोलिसांनी सुनीलला बाहेर काढले अन गाडीत टाकले. आता मात्र सगळाच जमाव उसळला व घोषणांचा जोरही वाढला. मला त्या क्षणाला एक गोष्ट जाणवली की आपणच निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींना भेटण्यासाठी व त्यांच्यासमोर आपल्या मागण्या ठेवण्यासाठी जर एवढा संघर्ष करावा लागत असेल तर गांधींना 'इंग्रजांनो देश सोडा' असे म्हणतांना किती संघर्ष करावा लागला असेल. एका क्षणासाठी त्या कल्पनेने मी थरारून गेलो. बाहेर एवढा गोंधळ चालू असतानाही त्या क्षणासाठी अंतर्मुख झालो. नाहीतर आजपर्यंत सत्याग्रह, मोर्चा, आंदोलने हे शब्द नुसते वाचत किंवा ऐकत आलो होतो, त्याचा थोडा थोडा अर्थ आता कळतोय अस वाटू लागल. चांगल्या गोष्टींसाठी असा हा संघर्ष करणार्यांबद्दल आदर वाटू लागला अन मी नकळत ते गेट जोराने ढकलू लागलो.
साडेसहाच्या सुमारास पोलिसांनी, मुख्यमंत्री तर नाही पण गृहमंत्रालयातील सचिव श्री संगीतराव भेट घेण्यासाठी तयार आहेत असे सांगितले व तुमच्यापैकी कोणीही एकजण भेटू शकता असा निरोप पोलिसांनी आम्हाला सांगितला. पण आम्ही कमीतकमी पाचजणांचे शिष्टमंडळ त्यांना भेटेल या मुद्यावर अडून राहिलो. थोड्याच वेळात तीही परवानगी मिळाली. मुख्यमंत्री मुंबईमध्ये नाहीत तेव्हा संगीतरावना भेटा. ते तुमचे म्हणणे मुख्यमंत्र्यांसमोर मांडतील असे सांगण्यात आले. सचिन, सुरेशकाका अन् आणखी तीघे असे पाचजण सचिवांना भेटण्यास पोलिसांच्या गाडीतून गेले. आम्ही सगळे परत मैदानात येऊन बसलो. तासाभराने शिष्टमंडळ पोलिसांच्याच गाडीतून परत आझाद मैदानावर आले. सचिवांनी निवेदन स्वीकारले होते व ते मुख्यमंत्र्यांना सादर करणार होते. सचिन म्हणाला की “सचिवांनी आम्हाला विशेष काही बोलू दिले नाही, तुम्हीच पुन्हा या विरोधाचा नीट विचार करा या विषयीचा तुमचा अभ्यास नाही” अशी उडवाउडवीची उत्तरे त्यांनी दिली.
एक गोष्ट तर स्पष्ट झाली की एवढ्या सहजासहजी आपले ध्येय साध्य होणार नाहीये, ही तर सुरवात आहे ...आगे आगे देखते है होता है क्या?
Friday, January 29, 2010
सांग सांग भोलानाथ
शेतामध्ये ज्वारी लावून दारु निघेल काय ? ll धृ ll
भोलानाथ ! दुपारी आई झोपेल काय
दारु बाटली घेताना आवाज होईल काय
भोलानाथ ! भोलानाथ !! सांग सांग भोलानाथ
दारु मिळेल काय ll १ ll
भोलानाथ ! भोलानाथ !! खर सांग एकदा
ज्वारीचे पिक येइल कारे तीनदा
भोलानाथ ! भोलानाथ !! सांग सांग भोलानाथ
दारु निघेल काय ll २ ll
भोलानाथ ! उद्या आहें मंत्र्याची बैठक
त्यात माझ्या ज्वारिला मिळेल का रे अनुमोदक
भोलानाथ ! भोलानाथ !! सांग सांग भोलानाथ
दारु निघेल काय ll ३ ll
सांग सांग भोलानाथ l दारु मिळेल काय ?
शेतामध्ये ज्वारी लावून दारु निघेल काय ? ll धृ ll
-अनामिक
Monday, January 18, 2010
कुमार निर्माण निमित्त
-मुक्ता गुंडी
Saturday, January 2, 2010
जनसुनवाई
Friday, January 1, 2010
"धान्यापासून दारू"विषयी गाणे!
(चाल: बिलनची नागीण निघाली)
राजकारणी लोक ही माजली
(यांच्या) स्वार्थाची तुतारी वाजली
वाईट कर्माला बघा ही धजली
लोकांना दारु हो पाजली ॥ध्रु॥
कायद्याची धड माहिती नाही, जनता ही भोळी निघाली
पाहुनी हा ज्ञानाचा अंधार, मंत्र्यांनी हो पोळी भाजली
जनता ही भोळी निघाली
मंत्र्यांनी पोळी हो भाजली
काळ्या धंद्यांना बघुन यांच्या
नैतिकता सुद्धा हो लाजली ॥1॥
देत नाही धान्याला भाव, पिकांची होते नासाडी
उपाय म्हणून त्यावर आता, दारुला देती सबसिडी
म्हणे पिकांची होते नासाडी
कारखांन्यांसाठी सबसिडी
मंत्री आहेत हो हे गारुडी
जनतेला करती दारुडी ॥2॥
दारु पिऊन पिऊन रे बाबा, नाश होईल आयुष्याचा
सर्व पीकं जाईल ह्यात, धोका वाढेल भविष्याचा
नाश होईल आयुष्याचा
धोका वाढेल भविष्याचा
अन्न – पाण्याच्या दुर्भिक्ष्याचा
खाद्यान्नाच्या सुरक्षेचा ॥3॥
स्वार्थाबिना विचार नाही, राजकारणी आहेत हो वल्ली
ह्यांच्यासाठी लोकांनी सगळ्या, दारु पिऊन व्हावे टल्ली
राजकारणी आहेत हो वल्ली
दारुने व्हा म्हणती टल्ली
करी कायद्याची पायमल्ली
स्वार्थासाठी एककल्ली ॥4॥
- अमृत बंग
Wednesday, December 23, 2009
यमगरवाडी बद्दल थोडंसं!!
भटके विमुक्तं विकास प्रतिष्ठातन (BVVP) गेल्या 14 वर्षांपासून विविध समाज प्रश्नां वर काम करते आहे. प्रतिष्ठारनच्याव विविध प्रकल्पांवपैकी यमगरवाडी प्रकल्पव (केशवनगर विद्या संकुल) हा महाराष्ट्राशत उस्मानाबाद जिल्ह्यात, तुलजापूरजवळ नांदुरी येथे राबवण्यात येतोय. हा प्रकल्पं 1993 मध्येण 18 एकर जागेवर श्री रमेश छटुफले यांनी दिलेल्या जमिनीवर 25 भटक्या मुलांना घेऊन सुरु झाला. आज गिरीश प्रभुणे या कल्पाक आणि खंद्या कार्यकर्त्यामुळे यमगरवाडीला निवासी शाळा सुरु आहे. या शाळेत 400 मुले आणि 200 मुली शिकत आहेत. या शाळेत मुख्यित्वेम पारधी समाजातील मुले आहेत. या उपेक्षित समाजातील पालकांमध्येआ जागृतीचं काम करणं, त्यांहच्यात मुलांना एकत्र करुन शिक्षण देणं हे एक आव्हातनात्मचक कार्य आहे, जे गिरीश प्रभुणें करीत आहेत. काही दिवसांपूर्वीच मी अहमदनगरला एका शिबिरात गेलो होतो आणि तिथं मला गिरीश प्रभुणे यांच्या कार्याबद्दल माहिती मिळाली. त्यांाचं कार्य समजून बघणं, समजून घेणं आपल्याचला जमेल त्याक वेळात करायचं असं मी ठरवलं होतं.
आणि नेमकं 15 तारखेला माझा मित्र राजन याचा मला फोन आला की, “यमगरवाडी हा एक अनाथ मुलांकरता (पारधी समाजातील) प्रकल्पत चालतो. तेथील काही मुलांना दरवर्षी दिवाळीकरता पुण्यापत वेगवेगळ्या इच्छुरक लोकांकडे (2-2 किंवा 1-1 मुलांना) रहायला पाठवलं जातं. तर तू तुझ्याकडे एका मुलाला घेऊन जाशील का?” असा मित्राचा प्रश्नय ऐकताच मनात होकार देण्यााची खूप इच्छा् असूनही मी “नाही” म्हीटलं कारण मला त्यामच काळात वाईला जाणं आवश्य क होतं. त्यायवर तो म्हलणाला, “हरकत नाही मात्र ज्यावेळी या मुलांची सहल निघणार आहे त्याहवेळी या मुलांसोबत त्यांणच्याहकडे बघायला म्हजणून नक्कीस ये”. मी “हो” म्हेटलं.
सहलीला निघेपर्यंत माझी अशी कल्प्ना होती की असतील 20-25 मुलं. पण जेव्हाण 20 तारखेला आम्हीी सगळे रात्री एकत्र जमलो तेव्हाप मला कळालं की एक नाही दोन नाही तब्बाल 82 छोटी (43 मुलं आणि 39 मुली) मुलं होती. मला क्षणभर भीतीच वाटली की आता आपलं कसं होणार? एक तर लहान मुलाला सांभांळणं किती जिकिरीचं काम असतं. आणि आपला तर अशावेळी गोंधळच होतो, इथं तर 10-11 वयोगटातली ही मुलं, कसं सगळं सुरळीत पार पडणार ?
20 तारखेला मध्यारात्री 1 वाजता आमची सहल निघाली. सहलीला निघताना मुलं ज्यान पध्द तीनं ऐकत होती, सूचना पाळत होती, लहान मुलांची मोठी मुलं काळजी घेत होती ते सगळं पाहून माझी सुरुवातीची भीती पळाली आणि खात्री झाली की आता सहल छानच होणार. या मुलांमध्ये राहिल्यामुळे वयानं मोठ्ठे ही माझी संकल्परनाच बदलली. खरंच मोठं कोण? लहान सहान कारणांवरुन भांडणारी मोठी माणसं ? की दुस-याला आपला त्रास होऊ नये म्हलणून समजून घेणारी, समजूतदारपणे वागणारी ही लहान मुलं ? (सॉरी, खूप मोठ्ठी मुलं! )
आम्ही 21 तारखेला सकाळी चिपळूण येथे पोहोचलो. माझं हे स्पमष्टीवक्तेपपण कदाचित वाचणा-यांपैकी काहींना आवडणार नाही पण सहलीचं आयोजन चांगल्याा पध्दनतीनं केलं गेलं नाही हे लगेच प्रत्ययास आलं. कारण चिपळूणमध्येे कोणाकडे जायचं हेच नीटसं माहीत नव्हेत. आम्हीे अर्धा तास फिरत राहिलो. शेवटी चितळेहॉल शोधत एका ठिकाणी गेलो तर त्यां नाही काहीच कल्पधना नव्हणती. मात्र पाच मिनिटं या प्रकल्पाठवर बोलल्यागवर ते म्हटणाले, “मला काहीही अडचण नाही. तुम्हीं इथं थांबू शकता”. आणि त्यांलनी काही पुढं न बोलता पाणी तापायला ठेवलं. ब-याच माणसांना मदत करायची, चांगलं काम करण्यााची खूप इच्छाह असते पण काही वेळा ती मदत मागीतलीच जात नाही असंही मला वाटलं. तसंच कोणत्याी हॉलवाल्या नं 110 लोकांची सोय स्वततःची गैरसोय करुन केली असती? आम्हाय सगळ्यांची त्यांकनी उत्तम व्यआवस्थाव केली.
हे सगळं होताच आम्हायला ज्या चितळ्यांकडे जायचं होतं त्यां चा अखेर पत्ता सापडला. आमच्याहतले निम्मेा लोक आम्ही त्यांच्याकडे गेलो. त्यांनी आमची चहा-नाश्याहो ची सोयही केली होती. पण त्यान चितळे (हॉलवाले) ना हे माहीतही नव्ह त तरी त्यांॉनी आमची सोय केली त्यां चा मला अभिमान वाटत होता. अर्थातच आम्हालला अभिप्रेत असलेल्या चितळेंनीही आमची उत्तम व्यअवस्था केली.
सर्व आवरुन आम्ही 11.30 ला शिवसृष्टीअदर्शन येथे जाण्यास निघालो. मी आणि योगेश यांनी 5 नम्बथर गटाची जबाबदारी घेतली. आम्हाला तसं पहाता काहीही करायचं नव्हमतंच. कारण आमच्या गटात 10 जण होते आणि त्यातला अर्जुन हा 8 वर्षाचा मुलगा हा गटप्रमुख होता. लिडर म्हणजे काय, तो कसा सर्वांना समजून घेतो, सर्वांबरोबर सतत असतो, याचे धडे या लहान मुलांकडून घ्यातयला हवे. शिवसृष्टी दर्शन खूपच छान झाले. मला सारखं वाटायचं की आता ही मुलं गोंधळ घालतील आणि मग मला जरा काम मिळेल. पण नाहीच. संपूर्ण प्रवास मुलांनी गोंधळ केलाच नाही.
माझा स्वगतःबददलचा एक पक्का समज होता की आपल्याकला लहान मुलांसोबत अजिबात खेळता येत नाही, बोलता तर अजिबातच येत नाही. काही प्रमाणात हा समज खरा म्हणता येईल. आणि अनेकदा तसा अनुभवही आला आहे पण...
ही सहल इतकी वेगळी होती. दुपारी मी कागदाच्याक काही वस्तू करायला सुरुवात केली आणि काय... लहान, मोठी सगळीच मुलं मला मला करीत एकच गोंधळ सुरु झाला. मला शिकवा, मला पण... अरे बापरे, कोणाकडेही न जाणारी ही मुलं, हातात कॅमेरा (कागदाचा) घेऊन माझ्याकडे धावत सुटली. पक्ष्यां चे पंख फडफडले आणि मुलांचा पुनश्चर गोंधळ सुरु झाला. कागदाच्याु कोल्ह्या ने मुलांची नाकं पकडली आणि मुलांच्याच चेह-यावर हास्य पसरलं. ओरिगामी शिकवणा-या शाळेतल्याय बाई, माझे वडील, काका, काही मित्र, आणि अनिल अवचट या सर्वांचे मी मनातून खूप खूप आभार मानले. हॅट्स ऑफ! की ज्यांभच्याचमुळे मी मुलांच्यात एवढ्या जवळ जाऊ शकलो आणि मुलंही यामुळं माझ्या जवळ आली.
पण वाईट गोष्ट अशी की माझ्याकडे पुरेसे कागद नव्होते. मला खूपच वाईट वाटलं. मी फक्त काहीच मुलांना कागदाच्याव वस्तू. करुन देऊ शकलो. ज्यांनना मला हे देता आलं नाही त्या चं मला टोचणी लागलीच. पण हेही लक्षात आलं की या अनुभवातूनच शिकायचंय. अनुभवासारखा दुसरा गुरु नाही!
संध्यांकाळी 4 वाजता आम्ही समुद्रावर पोचलो. तिथं खूपच धमाल आली. माझ्यातला गुंडपणा उफाळून वर आला. मी एकेकाला धरुन सरळ पाण्यापत बुडवून काढलं. इतरांवरही पाणी उडवत राहिलो. मुलंही मस्तन मजा करीत होती. गुडघाभर पाण्या च्यार पुढं जायचं नाही ही सूचनाही तंतोतंत पाळत आनंद घेत होती. पोरं वाळूत मनसोक्तआ खेळत होती. शंख, शिंपले गोळा करीत होती. माझ्याकडे कॅमेरा नव्ह ता याचं मला अतीव दुःख त्याक्षणी झालं.
सूर्यास्त तर अप्रतिम होता. इतर ठिकाणांपेक्षा हा सूर्यास्ति पहाणं म्ह णजे एक वेगळाच अनुभव होता. बस्सत, फक्त बघतच रहावं, दूर दिसणा-या होड्या, उडणारे पक्षी, समुद्रात हळूहळू बुडणारा सूर्य आणि त्या्चा लालेलाल तेजस्वी पण बघता येइल असा गोल गोळा...व्वा! काही गोष्टी तर शब्दाडत न पकडता येणा-या असतात....
तिथून मात्र आम्ही रत्नागिरीला मुक्काममाला पोहोचलो. तिथं मस्तम गरमागरम पुरीभाजी, शिरा, भात असं जेवण करुन ताणून दिली. रात्री डासांनी आमच्यारवर भरपूर ताव मारला ही गोष्टग निराळी.
दुस-या दिवशी म्हरणजे 22 तारखेला सकाळी आवरुन आम्हीव 11 वाजण्याच्या सुमारास भरपूर नाश्ता करुन व सोबत जेवण घेऊन बाहेर पडलो. वेळणेश्वबर या प्रसिध्दन टेकडीवरील मंदिरामध्येव जाऊन दर्शन घेतलं. आजुबाजूला डोंगराळ भाग आणि मस्तत जंगलाचा परिसर होता. तिथून आम्हीस गणपती पुळे येथे जायला निघालो. मध्येस वाटेत एक बस बंद पडली. मग काय, तासभर वायाही गेला. रस्याग क त स्वाेमी स्वररुपानंद यांचं मंदिर होतं, तिथंही जाऊन आलो. गणपती पुळ्याला पोहोचलो तर उन प्रचंड पडलं होतं. आणि भूकही चांगलीच लागली होती. आणि समुद्रही एकीकडे खुणावत होता. पण आधी जेवण, मग थोडी विश्रांती आणि नंतर समुद्र असा प्राधान्यिक्रम ठरवून आम्ही त्यादप्रमाणेच कृती केली.
मी तर समुद्रावर खूप फिरलो. पाण्या तून विचार करीत करीत इतका चालत गेलो की किती दूर गेलो आहोत याचा अंदाजच आला नाही. आत्ता असं लक्षात येतंय की समुद्राचं हे वैशिष्ट्य च असावं की त्या् पाण्यामतून आपण पुढे चालताना कळतच नसावं. कारण लाटा अलगद आपल्या पायावर येतात, हळूवारपणे आपल्याा पायाखालून वाळू नेतात. परत एक नवीन लाट येते आणि तिच्याअसोबत थंडावा देणारी एक झुळूकही आणि त्याय येणा-या धुंदीतच आपण चालतच रहातो. कितिक वेळ...
जवळपास अर्धा तास चालल्यायवर मला आपण दूरवर आल्यासचं लक्षात आलं. तिथून मंदिर अगदीच छोटं दिसत होतं. आणि परतण्यासाठी फक्त 15 मीनिटं शिल्लक होती. हे लक्षात येताच मात्र मी पाण्याितून अक्षरशः पळत सुटलो. पण पाण्या तून सावकाश चालणं जेवढं आल्हाणददायक तेवढंच पळणं मात्र तापदायक...पण करतो काय ?
धापा टाकत परत पोहोचलो सगळी निघायच्या बेतात होती. मी हुश्शत केलं आणि पुढच्यार वेळी घड्याळाकडे लक्ष ठेवायचं असं मनाला बजावलं. या सगळ्यात जेवण, विश्रांती गेली याचा मात्र जराही पश्चाणताप झाला नाही. कारण माझी ही समुद्रफेरी खूपच छान झाली. (हं बरोबर सोबत कोणी असतं तर अजून खूपच मजा आली असती हेही तितकंच खरं...)
आणि 5 वाजल्यांपासून परतीचा प्रवास सुरु झाला. जरासा कंटाळलोही. मात्र मला गाडी चालवणा-या ड्रायव्हलरकाकांचं खूपच कौतुक वाटलं. दोन दिवसात जवळपास 18-20 तास त्यां नी ड्रायव्हिंग केलं. एक रात्र तर संपूर्ण जाग्रण केलं पण जराही कुरकूर नाही की तक्रार नाही. उलट म्ह णाले, मुलांकडे बघून थकवा येतच नाही. उलट उत्साकह येतो. मी त्यां च्या शी चांगल्याेच गप्पाबही मारल्याव.
या संपूर्ण प्रवासात मी कितीतरी गोष्टीय शिकलो. काही शब्दाीत सांगता येतील आणि काही सांगताही येणार नाहीत अशा... नाव पुढे पुढे न करता नावाशिवाय कामं करणारी, श्रेय न घेणारी, काम महत्वा्चं मानणारी, मुलांच्या आनंदाकरता काम करायचं बाकी गोष्टींवचा बाऊ न करणारी माणसं बघितली. लहान वयात हेवेदावे, भांडणं विसरुन मोठी झालेली मुलंही बघितली. छोट्या छोट्या गोष्टीित आनंद मानणारी मुलं बघितली. आणि विचारात पडलो की आपण तर असं काहीच करत नाहीत. घरात 10-10 जोड कपडे असूनही दिवाळीत नवे कपडे घेतोच, मोठ्या भावाला जास्ती फटाके आणले म्ह,णून भांडणारे भाउ, फराळाला लाडू केले नाही म्हरणून आईवर चिडणारी मुलं हे सगळं कुठे आणि एक चॉकलेट मिळालं की आनंदात त्याआ चॉकलेटच्याम कागदाचीही वस्तू बनवण्याडस उत्सूक असलेली, कोणाच्यातरी कुशीत प्रेमानं झोपता आलं म्हंणून, प्रेमानं कुणी थोपटलं म्होणून आपल्याच ताई-दादांचं ऐकणारी, लहानलहान गोष्टींत सुख शोधणारी ही मुलं कुठे आणि...
पुढच्या दिवाळीत कमीत कमी 5-6 मुलांना तरी मी माझ्या घरी घेऊन येणार हे नक्की, असं ठरवूनच मी सुखानं झोपेच्या स्वाधीन झालो.
-सिद्धार्थ प्रभुणे
Tuesday, December 22, 2009
माहितीचा अधिकार आणि मी
धान्याधारित मद्यार्कनिर्मितीला प्रोत्साहन देण्याचा महाराष्ट्र सरकारचा निर्णय अत्यंत चुकीचा आहे हे कोणालाही पटेल. दारुमुळे बेचिराख, उध्वस्त होणारी माणसं, संसार दिसत असताना सरकारनं दारु निर्मितीला प्रोत्साहन देण्यासाठी सबसिडी द्यावी हे योग्य नाही. एका बाजूनं ग्रामपातळीवर दारुबंदी योजना मांडायची आणि दुस-या बाजूनं फक्त काही धनदांडग्या राजकारण्यांच्या स्वार्थासाठी अशा प्रकारच्या योजनांना सबसिडी देउन त्यांना आणखी धनवान करायचं तेही सर्वसामान्यांच्या पैशातल्या करांतून हे पटत नाही.
ही सबसिडी देण्यामागची सरकारची भूमिका अशी आहे की, ‘गेल्या काही वर्षांमध्ये महाराष्ट्र राज्यात ज्वारीचं दरएकरी उत्पादन व ज्वारीच्या पिकाखालील एकूण क्षेत्रकमी होत आहे. या सबसिडीमुळे दारुच्या निमित्ताने ज्वारीचं उत्पादन वाढेल व शेतक-यांना त्यांच्या मालाला योग्य भाव मिळेल आणि विदर्भ-मराठवाडयातल्या शेतकर्यांच्या आत्महत्या कमी होतील.’ खरं पहाता, विदर्भ-मराठवाड्यातील ज्वारी, बाजरी इ. पिकांचे उत्पादन कमी असण्यामागे सिंचनाचा अभाव, नवीन तंत्रज्ञान, बी-बियाणे यांचा अभाव ही काही प्रमुख कारणं आहेत. द्यायची सबसिडी तर शेतक-यांना द्या. दारुउत्पादकांना का ?
तसंच धान्याधारित मद्यार्क निर्मितीतून किती प्रमाणात पिण्यासाठीची दारु व औद्योगिक वापरासाठीचे अल्कोहोल तयार व्हावे यावरही सरकारने काहीच नियंत्रण ठेवलेलं नाही. यावरुन हेच स्पष्ट होतं की सरकारमधील काही स्वार्थी राजकारण्यांसाठीच ही योजना साकार झाली आहे. सर्वसामान्यांना या योजनेपासून होणा-या दूष्परिणामांना तोंड द्यावं लागू नये यासाठी आपण एकत्रितपणे विरोध केलाच पाहिजे. आणि यासाठी आपल्या हाती एक मोठं शस्त्र आहे. ते म्हणजे माहितीचा अधिकार यानेके RTI !
माझा आरटीआयचा अनुभव ऐकायचाय?
सचिनच्या सांगण्यावरुन 7 नोव्हेंबरला मी धान्याधारित मद्यार्क निर्मितीच्या राज्य उत्पादनशुल्क विभागात आरटीआयचा अर्ज दाखल केला. मला अगदी मनापासून सांगावं वाटतं की अर्ज दाखल करताना मला आरटीआयविषयी काहीही माहिती नव्हती. त्या दिवशी पब्लिक इन्फर्मेशन ऑफिसर हे उपलब्ध नव्हते. मी अर्ज तर दाखल केला आणि वाटलं आता 30 दिवसांत कधीतरी उत्तर येईल. तत्काळ उत्तराची अपेक्षा नव्हतीच.
दोन-तीन दिवसानंतर एका सायंकाळी मला माझ्या मोबाईलवर माहीत नसलेल्या व्यक्तीचा मिसकॉल दिसला. कोणी केला असेल या कुतूहलापोटी मीही मिस कॉल पुनश्च त्या नंबरला दिला. आणि लगेच मला त्या नम्बरवरुन कॉल आला. ती व्यक्ती बोलत होती, “आपण वाकळे ना ? मी उत्पादनशुल्क विभागातून पब्लिक इन्फर्मेशन ऑफिसर पुजलवार बोलतोय. तुम्ही दाखल केलेल्या अर्जाविषयी बोलायचंय....” मी तर एकदम गोंधळूनच गेलो. इतक्या लवकर प्रतिसाद आणि तोही असा एकदम मोबाइलद्वोर म्हणजे मी कल्पनाही केली नव्हती. कसंतरी स्वतःला सावरत मी त्यांच्याशी बोललो. आमची भेटीची वेळ ठरली. त्यांच्याकडे जी कागदपत्रं आहेत ती मी जरुर बघावी असंही त्यांनी सुचवलं.
सरकारी अधिका-याच्या या सौजन्यशील आणि तत्काळ प्रतिसादानं मी जाम सुखावलो. खरंतर त्यांचं अभिनंदनच केलं पाहिजे असंही मला वाटलं. आणि मी दुस-या दिवशी छानशी टवटवीत अशी दोन गुलाबांची फूलं घेऊन त्यांच्या भेटीला गेलो.
दुपारी एकच्या सुमारास मी त्यांना भेटलो. त्यांचं अभिनंदन केलं. मी देऊ केलेली फुलं त्यांनी मनापासून स्वीकारली. पुजलवार हे अधिकारी वयानं 40 ते 45 च्या आसपास असावेत. त्यांच्याकडील पद हे प्रभारी स्वरुपाचं होतं. त्यांनी सरळ मुद्याला धरुनच बोलणं सुरु केलं. ते म्हणाले, “तुम्ही विचारलेली सगळी माहिती आमच्याकडे उपलब्ध नाही ती मुंबई आणि कारखान्यांकडून मागवावी लागेल. पण सध्या काही प्रकल्पांची कागदपत्रं आहेत. ती तुम्ही पाहू शकता”.
मी त्यांनी दिलेल्या फाईल्स बघितल्या. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार सध्या आदित्य ब्रेव्हरिजचं भेंडोळे इथे उत्पादन सुरु झालं आहे आणि प्रणव ऍग्रोटेक यांचंही उत्पादन सुरु होणार आहे.मी त्यांना सध्या उत्पादन घेत असलेले आणि मंजूरी मिळालेले कारखाने यांची कागदपत्रं मला हवी आहेत असं सांगितलं. तसंच उत्पादन सुरु नसलेल्याही कारखान्यांची कागदपत्रं मिळावीत असं सांगितलं. त्यांनी मला त्या कागदपत्रांच्या फोटोकॉपीज दिल्या.
माझ्याशी त्यांनी गप्पाही मारल्या. मी त्यांना लोकसत्तामधली बातमी दाखवली. पण त्यांनी विशेष उत्सुकता दाखवली नाही. येत्या 2-3 दिवसांत मी राहिलेली कागदपत्रं देतो असं त्यांनी सांगितलं. कामासंदर्भात ते काही वेळासाठी बाहेर निघून गेले.
त्यांच्या कार्यालयातील एक सहकारी धुमाळ यांच्यासोबत मी बसलो. मनात विचार करीत होतो, येताना नाही म्हटलं तर एक भीती घेऊनच मी आलो होतो. काय बोलायचं, काय मिळवायचं याचा हिशोब मनात करीत बसलो होतो. इतक्यात समोरनं दोन पोलीस आले आणि ते धुमाळांशी काही बोलू लागले. माझ्या मनात भीतीनं जास्तच ठाण मांडलं. मला एकाएकी 6 नोव्हेंबरला इंडियन एस्प्रेसमध्ये आलेली बातमीच आठवली. 42 harassed; many in jail for seeking into under RTI in Bihar… आठवून अंगाला कापरं सुटलं. वाटलं पुजलवारांनी हे पोलीस आपल्यासाठीच तर नाही ना पाठवले. पण ते सगळे माझ्या मनाचेच खेळ होते. पोलीस धुमाळांशी बोलून निघून गेले. आणि अर्ध्या तासानंतर मला राहिलेल्या कागदपत्रांची झेरॉक्स मिळाली. बाकी माहिती मला 2-3 दिवसांनंतर मिळेल असं त्यांनी सांगितलं हेातंच. मी निघताना झेरॉक्स कागदपत्रांच्या पैशांविषयी विचारणा केली. पण त्यांनी ते घेतले नाहीत. मी मिळालेल्या कागदपत्रांसहित बाहेर पडलो.
असा माझा आरटीआयचा अनुभव मजेशीर राहिला. मला त्यातून माहितीच्या अधिकाराविषयी बरंच शिकायला मिळालं. खरं सांगायचं झाल्यास माझ्यातल्या एका सामान्य नागरिकाला माहितीच्या अधिकाराची ताकद किती आहे याचा एक छानसा अनुभव आला.
अधिक माहितीसाठी: www.foodtoalcohol.wordpress.com
-अमोल वाकळे
Thursday, December 3, 2009
माणगावला भेट
निर्माण फेलोशीपची कार्यशाळा संपवून सकाळी मी आणि सचिन पुण्याहून माणगावला निघालो. वाटेत ताम्हिनी घाट लागला. पावसाळा नुकताच संपलेला असल्यामुळे डोंगर हिरवेगार दिसत होते. घाटातनं प्रवास करत असतांना दोन वर्षांपूर्वी सायकलीवरुन केलेल्या पुणे ते रायगड अशा मुशाफिरीच्या आठवणी मनात जाग्या होत होत्या. गाडीच्या भरधाव वेगामुळे कधी कधी मनाला भीती वाटायची आणि ते (मनातल्या मनात!) ड्रायव्हरला ओरडून सांगायचे, “सावकाश रे बाबा! मला अजून जगायचं आहे. काही करुन दाखवायचं आहे.”
कार्यालयात हळूहळू कार्यकर्त्यांची गर्दी वाढू लागली. त्या दिवशी ‘विधानसभा निवडणूकीत संघटनेची राजकीय भूमिका काय असावी’ या संदर्भात एक मिटींग आयोजित करण्यात आलेली होती. मिटींगला जवळजवळ ७० लोक उपस्थित होते. त्यात ४५ तरी महिला असतील. आदिवासी महिलाही पुढाकार घेऊन स्वतःची मतं मांडत होत्या. त्या कातकरी लोकांच्या चेहर्या वर उंचावलेला आत्मविश्वास (self confidence) तर बोलण्यात राजकीय कृतीशीलता (political activism) स्पष्टपणे जाणवत होती. मिटींग खुपच लोकशाही पद्धतीने झाली. उल्काताई स्वत: कमी बोलत होत्या (जे अनेक नेत्यांना जमत नाही.). संयमाने चर्चा घडवून आणत होत्या.
मिटींगच्या समारोपानंतर उल्काताईंशी बोलायला सुरुवात केली. सामाजिक, आर्थिक, राजकीय शोषणाविरुद्ध संघर्षात्मक काम ही कार्यपद्धती आधीच ठरलेली. जुन्या व्यवस्थेतील सरंजामी आणि नव्या बाजारु, भांडवली अर्थव्यवस्थेतील काही लुटारु प्रवृत्तींविरुद्ध त्यांचा संघर्ष सुरु आहे. त्यात मुख्यत: लोक संघटन, मोर्चा, धरणे, उपोषण, सत्याग्रह, राजकीय पाठींबा, विधीमंडळात प्रश्न उपस्थित करणे इत्यादी पद्धतींचा वापर असतो. शोषणासंबधीचे जसजसे मुद्दे येत गेले, त्यानुसार त्यांचे काम आकारास येत गेले. सुरुवातीलाच त्यांना किमान मजूरीचा प्रश्न महत्त्वाचा वाटला. लोकही त्या बाबतीत बोलायचे. प्रत्यक्षात तो प्रश्न हाताळतांना लोकसहभाग मिळालाच नाही. त्या कारणांचा शोध घेतल्यावर त्यांच्या लक्षात आले की जरी किमान मजूरीचा प्रश्न महत्त्वाचा असला तरी त्या प्रश्नाला इतरही सामाजिक, आर्थिक बाजू आहेत. तो ‘प्रक्षोभक’ मुद्दा लोकांना आणि संघटनेला सुद्धा अगदी सुरुवातीला पेलवणारा नव्हता. मग काही काळ लोकांमध्ये राहून, संवाद साधून दळी जमिनीचा महत्त्वाचा प्रश्न समोर आला. लोकांची ती महत्त्वाची गरज असल्यामुळे उल्काताईंना लोकांचा उत्स्फुर्त सहभाग मिळाला. त्यानंतर संघटनेला लोकांकडे कधी जावे लागले नाही. लोकच संघटनेकडे येवू लागले. प्रश्न निवडताना उल्काताईंची भूमिका स्पष्ट होती, प्रश्न जर लोकांना आपला वाटत असेल आणि जर लोक त्या प्रश्नावर काम करायला तयार असतील तरचं तो प्रश्न निवडायचा. लोकांच्या योग्य प्रश्नाला हात घालणे ही लोकसहभाग मिळवण्याची गुरुकिल्ली आहे असं जाणवलं.
लोक तुकड्या तुकड्यात आयुष्य जगत नसतात. लोकांचे प्रश्न गुंतागुंतीचे असतात. म्हणून लोकांना सहभागी करुन घेण्यासाठी त्यांच्या इतर आयुष्यात सुद्धा आपण सहभागी झाले पाहिजे अशी उल्काताईंची भूमिका. (We can’t see a problem in isolation.) ही भूमिका तत्व म्हणून बरोबर आहे. तिच्या व्यावहारिकते बद्दल मत मांडण्याइतपत मला अनुभव नाही.
या भूमिकेतून जमिनीचे प्रश्न, वनहक्काचे प्रश्न, रेशनिंग, दलितांचे प्रश्न, वेठबिगार, वीटभट्टी कामगारांचे प्रश्न इत्यादी शोषणविषयक विविध प्रश्न त्यांनी हाताळले. काही व्यक्तिगत तक्रार निवारणाच्या स्वरुपाचे प्रश्न सुद्धा हाताळले. असे काही प्रश्न हाताळतांना व्यापक परिमाण असलेले प्रश्न त्यांच्या लक्षात आले.
सर्वहाराचं काम जवळपास ७०० गावं आणि वाडयांमध्ये चालतं. विविध गावशिबिरांच्या माध्यमातून संघटना या गांवातील लोकांना संघटनेशी जोडून ठेवते. या गावशिबिरातील विषय आणि सत्र ही गावनिहाय बदलतात. “या शिबिरांची विशेषता म्हणजे ही शिबीर कृतीशील असतात” उल्काताई सांगत होत्या. “जर रेशनिंगच्या
प्रश्नावर शिबिरात पथनाट्य गावकर्यांशनी सादर केलं असेल तर त्या पथनाट्याचाच एक भाग म्हणून गावातील लोक रॅली करुन गावातील रेशनिंग दुकानावर जातात आणि त्या दुकानावरील तक्रार पुस्तकात आपली तक्रार नोंदवतात. अशा लहान-सहान कृती आम्ही शिबीरातच लोकांकडून करवून घेतो.”
उल्काताईंशी बोलतांना जाणवलं की लोकसहभागासाठी ठराविक, साचेबद्ध पद्धती (thumb rules) नसतात. लोकांशी संबधित वस्तुस्थितींचे योग्य आकलन मात्र अत्यंत महत्त्वाचे (अगदी निर्णायक म्हटले तरी चालेल) असते. निव्वळ लोकांशी संवाद साधून, प्रश्न विचारून लोकांच्या खर्या समस्या कळतातच असे नाही. लोकांचे प्रश्न गुंतागुंतीचे असतात. ते समजून घेण्यासाठी लोकजीवनात प्रत्यक्ष सहभाग, सहवास आणि सहकृती महत्त्वाचे ठरतात. सुक्ष्म निरीक्षण, आजुबाजूला घडणार्याच विविध घटनांचे अन्वयार्थ, आंतरसंबंध समजून घेणे, विश्लेषण करणे ह्यातूनच खर्यान समस्या कळू शकतात. निर्माण फेलोशीपच्या कार्यशाळेत आनंद करंदीकर सुद्धा म्हणाले होते, डोळ्यांना दिसणारी, वरकरणी खरी वाटणारी वस्तुस्थिती ही सहसा फसवी असते. खरी वस्तुस्थिती गुंतागुंतीची असते. म्हणून आपल्या आकलनाला वारंवार तपासून घेणे गरजेचे असते. ‘मला अतिंम सत्य समजले’ अशी गुर्मी आपल्याला चुकीच्या दिशेने नेते.
Monday, November 23, 2009
प्रतिक्रिया
दि. 17 नोव्हेंबर, 2009 रोजी लोकसत्ता मध्ये प्रकशित झालेल्या ‘ह.भ.प. बबनरावांना ‘मोह’ अनावर !’ या बातमीला प्रतिक्रिया म्हणून लिहलेला हा लेख.
---------------
पोषण नको फक्त व्यसन द्या!!!
पुन्हा एकदा महाराष्ट्र सरकारने आदिवासी भागांमध्ये मोहफुलांपासून दारु निर्मिती करण्याचा घाट घातला आहे. पण यावेळी त्याचं ‘कोलीत’ मात्र बबनराव पाचपुत्यांच्या हातात दिलं आहे. आदिवासी विकासाचं खातं हातात आल्या आल्या त्यांनी मोहफुलांपासून दारू निर्मितीची घोषणा ‘हर्बल लिकर’ या गोंडस नावाखाली नुकतीच जाहीर केली.
यापूर्वीचं गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात मंत्रीमहोदय आत्राम यांनी गडचिरोलीत मोहफुलापासून दारू निर्मितीचा कारखाना काढणार असल्याचं जाहीर केलं होत. पण गडचिरोली जन-आंदोलनाद्वारे दारूमुक्त करणारे डॉ. अभय व डॉ. राणी बंग, सेवानिवृत्त न्या. चंद्रशेखर धर्माधिकारी, चंद्रपूरचे माजी खासदार व राज्यामंत्री श्री. शांताराम पोटदुखे, तसेच स्थानिक नेते व बचत गट यांनी केलेल्या जाहीर विरोधामुळे आपण आशा प्रकारच्या कोणत्याचं प्रस्तावाचा विचार करत नसल्याची सारवासारवं शासनाने त्यावेळी केली. कदाचित हातातोंडाशी आलेल्या निवडणुकीच्या काळात ‘जनमता’चा आदर करत असल्याचा धूर्तपणा शासनाने त्यावेळी दाखवला असावा. आता मात्र हे प्रकरण नव्याने डोकं वर काढत आहे.
किमान पाचपुते साहेबांनी आदिवासी विकास खातं हाताला लागल्यानंतर ज्याच्या विकासाचं ‘परमिट’ आपल्याला मिळालय़ं तो आदिवासी कोण, कुठला, काय करतो, कसा जगतो याची माहिती आपलं (की आदिवासींचं) शंभर दिवसांचं ‘टारगेट’ ठरविण्यापूर्वी मिळवायला हवी होती. तसं केलं असतं तर त्यांनी हा निर्णय नक्कीचं घेतला नसता. कारण त्यांना वाटतं त्याप्रमाणे आदिवासी फक्त मोहफुलांपासून दारू काढत नाही, तर आदिवासी मोहफुलांवर आपली भूक भागवतो, मोहफुलं वाळवून साठवूण ठेवतो, आदिवासी बाया मोहफुलांची भाजी बनवतात, मोहफुलांचा भाकरीच्या पीठामध्ये वापर केला जातो. मोहफुलांच्या वापरातून आदिवासींना अनेक पोषणतत्त्वे मिळतात. म्हणूनचं मोहाला आदिवासी मोहामाऊली म्हणतो या गोष्टी त्यांना ज्ञात झाल्या असत्या. एवढचं नव्हे तर मोहाचा संधीवात, बद्धकोष्ठता, मूळव्याध, डोकेदुखी, मधूमेह व स्नायुंवरील ताण कमी करणे या व्याधींवर आयुर्वेदामध्येदेखिल वापर सांगितला आहे.
अशाप्रकारे ‘एक महू, त्याचे गुण बहू’ अशा आदिवासींच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि धार्मिक जीवनात महत्त्वाचे स्थान असणार्याच मोहच्या फुलांपासून होऊ घातलेल्या दारू निर्मितीच्या कारखान्यामुळे झालेच तर आदिवासींचे नुकसानच होईल. सर्व मोहाची फुलं दारू कारखान्याकडे वळवली जातील. आदिवासी मोहाच्या इतर फायद्यांपासून वंचित होईल. मुळातचं कुपोषित असलेला हा वर्ग अधिक कुपोषित होईल. नंदुरबारसारख्या जिल्ह्यात तर सातपुड्यातील सारं जंगल आपण याअगोदरचं आदिवासींकडून ओरबाडून घेतलं आहे. एकही साग आपण तिथे शिल्लक ठेवलेला नाही. आता तर धार्मिकविधीच्या निमित्ताने आदिवासींनी जपून ठेवलेली मोहाची झाडंदेखिल ‘आम जनता की सरकार’ आदिवासींसाठी ठेवणार नाही. त्याची दारू बनवून ती तिथे आदिवासीच्याच गळी उतरवली जाईल आणि मोठ्या प्रमाणात शहराकडे पाठविली जाईल.
या कारखान्यामुळे मोहाची दारू आदिवासी भागात विपुल प्रमाणात उपलब्ध होईल. जागतिक आरोग्य संघटनेच्या निष्कर्षानुसार समाजातील दारुच्या उपलब्धीच्या प्रमाणात समाजातील दारुड्यांची संख्या व व्यसनाचे प्रमाण वाढते. त्यानुसार आदिवासी समाज मोठ्या प्रमाणात या कारखान्यांमुळे विनाशाकडे लोटला जाईल. शासनाला जर आदिवासींचा विकास करायचा असेल, त्यांना रोजगार मिळवून द्यायचा असेल तर मोहफुलांतील पोषणमूल्यांवर आधारित उत्पादने बनवण्यासाठी त्यावरील अधिक संशोधनासाठी शासनाने प्रयत्न करावेत. दारू कारखान्यांव्यतिरीक्त इतर उद्योगांना प्रोत्साहन द्यावे.
माजी पंतप्रधान, स्व. इंदिरा गांधी यांनी पुढाकार घेऊन 1975 मध्ये बनविलेल्या केंद्र शासनाच्या ‘आदिवासी भागांसाठी दारूनीती’ या निर्देशांकानुसार देशाच्या कोणत्याच आदिवासी भागामध्ये दारुची निर्मिती किंवा विक्री करु नये. स्व. शंकरराव चव्हाण मुख्यमंत्री असताना 1977 मध्ये महाराष्ट्र शासनाने ही नीती स्विकारलेली आहे. असे असताना मोहफुलांपासून दारू बनविण्याचा निर्णय घेऊन बबनरावांनी इंदीरा गाधींची ही नीती सोईस्कररीत्या बासनात बाधून ठेवली आहे.
यापूर्वीच एका ‘रावां’नी द्राक्षापासून वाईन बनवून, ‘वाईन ही दारू नाहीच’ असे महाराष्ट्रातील शाळकरी मुलांपासून ते साठी ओलांडलेल्या नागरीकांना शिकविलेले आहे. आता हे नवे ‘राव’ मोहाची दारू म्हणजे दारू नव्हे हर्बल लिकर आहे असं सांगून महाराष्ट्रातील दहा कोटी जनतेच्या गळी उतरविण्याच्या विकासाच्या योजना आखत आहेत. यापूर्वीच शासनाने धान्यापासून दारू निर्मितीला प्रोत्साहन म्हणून कोट्यावधीं रुपयांची सबसिडी दारू उत्पादकांना वाटण्यास सुरुवात केली आहे. गेल्या काही वर्षातील ही ध्येयधोरण बघता ‘जनतेला धान्य नको, पोषण नको फक्त व्यसन द्या’ ही नीती शासनाने स्विकारली आहे असं दिसत आहे. याउपर तुम्ही मात्र ‘घ्या’ आपण मात्र बिलकुल घेत नाही असं धूर्तपणे सांगायला राव मात्र विसरत नाहीत.
-सचिनMonday, November 9, 2009
Ecofest 09
तीन दशकांपूर्वी अंदाजे 8.5 कोटी गिधाडे भारतात होती. आता केवळ 3 ते 4 हजार एवढीच यांची संख्या आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात यांची घट कशी काय झाली याबद्दल सांगणारा हा चित्रपट. 2002 साली पेरिग्राइन ट्रस्ट या संस्थेला पाकिस्तानात संशोधन करत असता असे समजले की याचे कारण डायक्लोफिनॅक (diclofenac) हे रसायन. याचा anti-inflammatory परिणाम जनावरांच्या उपचारासाठी मोठ्या प्रमाणात केला जातो. अशा जनावराच्या मृत्यु नंतर जर गिधाडांनी याचे भक्षण केले तर त्यामुळे विसेरल गौट (visceral gout) तयार होऊन गिधाड मरण पावते.
ओरिसा मध्ये बंदर बांधण्याविरुद्ध इमेल पेटिशन कदाचित तुम्हाला आले असेल. मलाही आले होते. टाटांच्या या प्रकल्पामुळे रिडली कासवांना धोका आहे एवढेच माहिती होते. पण त्या कासवांची कहाणी कुठे माहित होती.
गुजरातच्या किनार्यावर व्हेल शार्क हा मासा वर्षातील काही काळ येतो. हा विशाल मासा 35 फूट लांबी पर्यंत वाढू शकतो. एवढा मोठा मासा पण छोटे छोटे प्लँक्टन मासे खाऊन जगतो. या माशाच्या लिव्हर पासून जे तेल मिळते त्याची बाजारात विक्री केली जाते. परदेशात हा मासा खाण्यातही वापरला जातो. Wednesday, November 4, 2009
पडसाद
या लढ्याला गांधी समुदायाने फारसा पाठिंबा दिला नव्हता, परंतु गांधीजींनी मुळशी प्रकल्पाचं समर्थनसुद्धा केलं नव्हतं. लोक़ांच्या विरुद्ध भूमी संपादन करुन असे प्रकल्प उभे करणं याला गांधीजींचा विरोध होता.
मेधाताईंनी मुळशीचा लढा, नर्मदा बचावं आंदोलन, अशा जनाआंदोलनांच स्वरूप आणि त्यांचे परिणाम याची आपल्या भाषणातून अतिशय सुंदर मांडणी केली. मुळशीच्या आंदोलनाच्या माध्यमातून जरी मावळ प्रांतातले शेतकरी जरी टाटांना या प्रकल्पापासून परावृत करु शकले नसले तरी ते आंदोलन अयशस्वी झालं असं म्हणता येणार नाही. “कोणतही जनाआंदोलन हे यशस्वी की अयशस्वी असं सरळ सरळ मोजता येत नाही.” मेधाताई सांगत होत्या. जनाआंदोलनातून समाजाला एक नवीन विचार मिळतो, तो व्यापक असतो आणि त्यातून राज्यसंस्थेची सुद्धा घडण होतं असते.
मुळशीच्या निमित्ताने काही मुद्दे समोर आले. राष्ट्रीय सुरक्षितता धोक्यात असताना किंवा राष्ट्रावर एखादी नैसर्गिक आपत्ती आली असताना राष्ट्र लोकांकडून कोणत्याही गोष्टींची मागणी करू शकते पण मुळशीच्या संदर्भात असं काहीचं नसताना सर्वसामान्य शेतकर्यांच्या जमिनी कशाच्या आधारावर बळकवल्या जाऊ शकतात. शेती, शेतकरी आणि त्यावर आधारलेली अर्थव्यवस्था कि धरण, उद्योगधंद्यांना लागणारी वीज, त्यातून एका विशिष्ट वर्गाला होणारा फायदा यापैकी काय महत्वाचं आहे असे प्रश्न पहिल्यांदा उपस्थित केले गेले.
मुळशी नंतर सुरु झालेल्या आणि अगदी आतापर्यंतच्या नर्मदा बचाव आंदोलनापर्यंतच्या गेल्या काही वर्षातील चळवळींकडे पाहता, धरणग्रस्तांनी व त्यासंदर्भात काम करणार्या चळवळींनी फक्त आमच्या पुनर्वसनाचे काय? हा एकमेव प्रश्न उपस्थित केला नाही तर अर्थशास्त्राच्या दृष्टीकोनातून धरणं खरीच “फायद्याची” ठरत आहेत का? धरणांमुळे दुष्काळाचा प्रश्न खरचं सुटतो का?. पर्यावरणाच्या दृष्टीने धरणांचं स्थान काय? इथून ते विकासाची खरी व्याख्या काय असावी? विकासाचं नवं ‘मॉडेल’ कसं असावं? विकास प्रक्रियेत लोकसहभाग किती व कसा असावा? सामाजिक संपात्तिचा वापर, पुनर्वापर व त्याच न्याय पद्धतीने समवाटप कस असावं? ते पैशाच्या बळावर वाढलेल्या नैसर्गिक साधनसंपत्तीच्या बेसुमार वापर करुन रुजू पाहणार्या उपभोग्तावादावर नियंत्रण असावे का? असे मूलभूत प्रश्न उपस्थित केले. या चळवळींनी यापैकी काही प्रश्नांवर अभ्यास केला आणि विकासाचे पर्यायी मार्गसुद्धा काही बाबतीत सुचवले. या पुस्तक चर्चेच्या निमित्ताने मेधाताईंनी या मुद्यांवर त्यांच्या ‘खास’ शैलीत विस्तृतपणे बोलल्या.
असं असतानादेखिल नंदीग्राम, सिंगुर, एसईझेड हे प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न आजही तितकेच तीव्रतेने आपल्यासमोर आहेत. माओवाद्यांचे प्रश्न जे अप्रत्यक्षपणे या प्रश्नांशी निगडीत आहेत. वेगवेगळ्या उद्देशांसाठी, वेगळ्या मार्गांनी होणार्या भूसंपादनातून निर्माण होणारे प्रश्न. हे प्रश्न आजही पुरेश्या सहृदयतेने हाताळले जात नाहीत. हे कदाचित उद्योजकांचे वाढते प्रस्थ, नोकरशाही आणि स्वार्थी राजकारणी यांमुळे घडत असावं. अशा परिस्थितीत सर्वसामान्य जनतेचा या प्रश्नांमध्ये सहभाग व त्यांची कृती अधिक महत्त्वाची आहे याची जाणीव झाली.
या महिन्याच्या सुरवातीला उल्का महाजन आणि सर्वहारा जनआंदोलनाची कामे पाहिल्यानंतर, गेल्या आठवड्याभरात बीटी वांग्याबद्दल झालेली चर्चा व त्याला विविध माध्यमातून व स्तरातून जनतेने केलेला विरोध बघितल्यानंतर जनाआंदोलनाचं महत्त्व पुन्हा एकदा माझ्या प्रत्ययास आलं.
खरं काय हे एकदा माहीत झाल्यानंतर आणि ते सरळ सरळ विवेकबुद्धिला पटत असताना देखिल काही विशिष्ट गटाच्या/ वर्गाच्या हितसंबधापोटी जर त्या गोष्टी प्रत्यक्षात येत नसतील तर अशावेळी सर्वसामांन्याची भूमिका महत्त्वाची ठरते. निवडणुकांव्यतिरीक्त ‘आम’ जनतेला विविध मुद्द्यांवर आपली मतं दखल घेतली जातील अशा पद्धतीने मांडण्यासाठी व व्यक्तिगत वा लहान गटांमधून कृती करता येईल अशी व्यासपीठं किंवा संधी उपलब्ध करून देण्याची गरज आहे. त्याचे नवनवीन मार्ग शोधण्याची गरज आहे.
असं घडून आल्यानंतरच विवेक सावंत यांनी सांगितल्याप्रमाणे बदल घडून येण्याच्या प्रक्रियेतील ज्या Information, Interaction, Transaction आणि Transformation या चार पायर्या आहेत, त्यातील Interaction आणि Transaction या पायर्यांना गती मिळेल.
-सचिन
Monday, November 2, 2009
लहानपण देगा देवा
| लहानपण देगा देवा । मुंगी साखरेचा रवा ॥१॥ ऐरावत रत्न थोर । त्यासी अंकुशाचा मार ॥२॥ जया अंगी मोठेपण । तया यातना कठीण ॥३॥ तुका म्हणे बरवे जाण । व्हावे लहानाहून लहान ॥४॥ महापूरे झाडे जाती । तेथे लव्हाळ वाचती ॥५॥ | ||
आत्मीयतेने आणि भक्तीभावाने गात होते. मनापासून. ऐकून शांत वाटायला लागले. हृदयाची गती परत स्थिरावली. घरी परतून आधी मोहोळ सरांना फोन लावला. घडलेल्या प्रसंगाबद्दल सांगितले. रागाच्या भरात काही उलट सुलट बोललो असेन तर क्षमा मागितली. त्यांनीही आम्हाला रोज त्रास होतो याबद्दल दिलगिरी व्यक्त केली. पण त्यांचेही तिथे काही चालत नाही हे यावरून जाणवले. दुस-याला समजून घेणे, जरा आवाज चढवला की ऐकून घेणे ही सज्जनाची लक्षणे त्यांच्यातही होती. आम्ही दोघेही एकाच बोटीत होतो. दुस-या दिवशीही सकाळी 5:30 वाजता काकड आरती चालू झाली. सकाळी योगासन अभ्यासासाठी उठणे हे फार कठीण. पण उठल्या उठल्या या भजनांचे स्वर पडले की असे काही तरी वाटते की परत झोपच येत नाही. कधी विचार येतो की बरंच आहे. त्यानिमित्तानी रोज उठीन तरी. आणि योगासन वर्गात गेलो की सुटलो. आवाजही नाही आणि योगअभ्यासही होतो. दुहेरी लाभ. अडचणीचे रूपांतर संधीत. उठून 5.45 च्या सुमारास परत 100 वर फोन लावला. त्या व्यक्तीशी गप्पा मारल्या. की हा त्रास रोज होतो पण तुम्ही काहीच का करत नाही. त्यांनी सांगितले की पोलिस जाऊन येतात. थोडा वेळ आवाज बंद होतो पण मग परत सुरू होतो. अनेकदा वरून दबाव येतो. याची मला अपेक्षाच नव्हती. आता काय करणार? काहीच सुचेना. येवून तंबोरा लावला आणि चादर डोक्यावर घेऊन परत झोपलो. योगासन वर्ग गेला खड्ड्यात. आता हळू हळू समजते, मोठ्या माणसांमध्ये इतका निराशेचा सूर का असतो ते. बाबा नेहमी मला सांगतात, की कायदा कडक केल्याशिवाय काहीच होणार नाही. डॉ राणी व अभय बंग यांच्या निर्माण उपक्रमात आम्ही विद्यार्थी आहोत. काही वेगळे करूयात, आपल्याभोवतालच्या परीस्थितीत काही चांगला बदल घडवण्यासाठी योगदान देत आपले आयुष्य जगूयात असे स्वप्न बघतो आहोत. आणि अशा लहानशाच प्रसंगातून परीस्थितीचे असे काही निराश विश्वरूप दर्शन घडते की काही समजेनासे होते. (विश्वरूप दर्शन वगैरे सगळे गीता थोडी थोडी वाचायला लागलोय म्हणून). क्षूद्रपणाची जाणीवच नाही तर सिद्धी होते, लहानपण मागावे लागत नाही. अचानक, आधी वाचलेले गांधीजी थोडे थोडे समजत आहेत. अहिंसेचा स्वीकार करून इंग्रजांचा मारा सहन करणा-यांच्या जिद्दीचा अर्थ समजत आहे. अंधळ्या माणसाला रंग म्हणजे काय हे जसे समजू शकत नाही तसे या कल्पनांबद्दल मी आंधळाच होतो. दलाई लामा आणि तिबेट बद्दल कुंडुन नावाचा चित्रपट बघितला. त्यात तिबेट वर चीननी केलेक्या आक्रमणाचे वर्णन आहे. द्लाई लामांना तिबेट सोडून भारतात यावे लागले. 1959 सालापासून यांचा संघर्ष अहिंसक मार्गाने चालू आहे. कार्यरत पुस्तकात कर्नाटकातील चळवळीबद्दल लिहिले आहे. तिथे एका फॅक्टरीमुळे नदी आणि हवेचे प्रदूषण झालेले आहे. प्रत्येक श्वासागणिक लोकांना त्रास होतो आहे. इतर कितीतरी लोकांचे केवढे तरी तीव्र प्रश्न आहेत आणि आपण या छोट्याश्या त्रासाला का एवढे महत्त्व देतो. पण यावर एकच उत्तर सापडले आहे. की मोठा प्रश्न सोडवण्याचे सामर्थ्य काही आपल्यात नाही. जे आपल्या आवाक्यात आहे ते तरी करावे. सकाळी परत मंदिरात गेलो. मोहोळ सरांना भेटलो. सकाळपासून चाललेली आरती संपली होती व भोजन चालू होते. मोहोळ सर लोकांना वाढण्यात मग्न होते. गणेश घुले हे तिकडचे अध्यक्ष यांच्याशी बोलायचा प्रयत्न केला. त्यांच्या म्हणण्यानुसार या मुळे धर्माचा प्रसार होतो. मला विचारले की धर्माच्या प्रसारासाठी मी काय करतो? मग त्यांनी त्यांच्या नेत्यांशी बोलायला सांगितले. प्रवीण चोरबेले. त्यांना समजवायचा प्रयत्न केला की आमचे घर लांब आहे तरीही तिथे थेट आवाज येतो. त्यांनी सांगितले, की तुम्ही दारे खिडक्या बंद करून बसा. कानात कापूस घालून बसा. आणि परत इथे येऊन त्रास देऊ नका. तुमच्या विरुद्ध पोलिस कम्पेंट करू. मग माझे नाव आणि फोन नं लिहून घेतला. मी ही त्यांचे नाव आणि फोन लिहून घेतला. आता काय करायचे याचा विचार चालू आहे. तुम्हाला काही सुचतेय? -प्रियदर्शन |
