Thursday, May 13, 2010

त्याला इलाज नाही

धिक्करिली तरीही सटवीस लाज नाही
श्रद्धा न पाठ सोडी त्याला इलाज नाही

देवातुनी जगाला ज्याने विमुक्त केले
त्यालाच देव करिती त्याला इलाज नाही

लढवून बांधवांना संहार साधणारा
गीता खुशाल सांगे त्याला इलाज नाही

तत्त्वज्ञ आणि द्रष्टे खंडून एकमेका
कथिती विरुद्ध गोष्टी त्याला इलाज नाही

ते भूत संशयाचे ग्रासून निश्चितीला
छळते भल्याभल्यांना त्याला इलाज नाही

विज्ञान ज्ञान देई निर्मी नवीन किमया
निर्मी न प्रेम शांती त्याला इलाज नाही

बुरख्यात संस्कृतीच्या आहे पशू दडून
प्रगटी अनेक रुपे त्याला इलाज नाही

असतो अशा जिवाला तो ध्यास मूल्यवेधी
अस्वस्थता टळेना त्याला इलाज नाही

ज्यांना अनेक छिद्रे असल्याच सर्व नावा
निर्दोष ना सुकाणू त्याला इलाज नाही

वृद्धापकाल येता जाणार तोल थोडा
श्रद्धा बनेल काठी त्याला इलाज नाही

-विंदा करंदीकर 

एवढे लक्षात ठेवा

उंची न अपुली वाढते फारशी वाटून हेवा
श्रेय ज्याचे त्यास द्यावे एवढे लक्षात ठेवा

ती पूर्वजांची थोरवी त्या पूर्वजांना गौरवी
ती न कामी आपुल्या एवढे लक्षात ठेवा

जाणती जे सांगती ते ऐकूनी घ्यावे सदा
मात्र तीही माणसे एवढे लक्षात ठेवा

चिंता जगी या सर्वथा कोणा न येई टाळता
उद्योग चिंता घालवी एवढे लक्षात ठेवा

विश्वास ठेवावाच लागे व्यवहार चाले त्यावरी
सीमा तयाला असावी एवढे लक्षात ठेवा

दुप्पटीने देत असे जो ज्ञान आपण घेतलेले
तो गुरूचे पांग फेडी एवढे लक्षात ठेवा

माणसाला शोभणारे युद्ध एकच या जगी
त्याने स्वत:ला जिंकणे एवढे लक्षात ठेवा

-विंदा करंदीकर