Wednesday, December 22, 2010

मरून पडलेला पांडुरंग

वक्तशीर मुलगा
पाठीवर दप्तर घेऊन
शाळेत वेळेवर पोहोचतो
तसा येऊन पोहोचला पाऊस,
एखादं आदिम तत्त्वज्ञान रूजवावं
तसं शेतकऱ्यानं बी पेरून दिलं
जमिनीच्या पोटात

मग भुरभुर वारा सुटला...
छोट्या स्टेशनवर न थांबता
एक्सप्रेस गाडी
धाड धाड निघून गेल्याप्रमाणे
काळे ढग नुस्तेच तरंगत गेले,
वाटचुकल्या भ्रमिष्ट माणसासारखा
अचानक पाऊस बेपत्ता झाला

बियाच्या पोपटी अंकुरानं
जमिनीला धडका मारून
वर येण्यासाठी रचलेले मनसुभे
दिवसागणिक वाळून गेले,
जन्मताच दगावलेल्या पोराचा बाप
दवाखान्यातल्या व्हरांड्यात
विमनस्क फेऱ्या मारतो
तसा शेतकरी धुऱ्यावर उभा

लांबवर टाळ मृदंगाच्या गजरात
पंढरपुराकडे निघालेली दिंडी
आणि इथं काळ्या शेतात
मरून पडलेला हिरवा पांडुरंग!

कवी - दासू वैद्य

Thursday, October 14, 2010

एका हाकेवर

2 ऑक्टोबर सकाळचे साडेसहा वाजले. चार-पाच तरुण हातात विळे घेऊन हनुमान मंदिराच्या समोरील मैदानात हजर झाले. संख्येने बोटावर मोजण्याइतके असले तरी  गांधी जयंती निमित्त काहीतरी करायला हवं या प्रेरणेने ग्राम स्वच्छतेच्या कामाला लागले. भाषणबाजी पेक्षा प्रत्यक्ष कृती हवी या भावनेने मैदानात उतरले गावात येणार्‍या रस्त्याच्या दुतर्फा असणारं गांजर गवत कापायला सुरुवात केली. एक-एक तरुण या कामासाठी वाढत गेला अन ही संख्या 37 वर पोहचली. नाकाला रुमाल बांधून रस्त्यावर असलेली घाण साफ केली. महिलांनी रस्त्यावर संडासला बसू नये म्हणून रस्त्याच्या बाजूचं उंच-उंच वाढलेलं गवत कापलं. आणि महिलांसाठी संडासला बसण्यासाठी वेगळी जागा उपलब्ध करुन दिली. सर्व रस्त्याच्या कडेचं गवत, गावठाण्यातल्या रिकाम्या जागेवरच गवत तरुणांनी कापलं, आणि पाहता-पाहता तीन तासात गाव स्वच्छ झालं. काही हजार रुपये खर्च करुन ग्रामपंचायत ही स्वच्छता करायला तयार असते पण रस्त्यावर असणार्‍या घाणीमुळे कुणीही मजूर मिळत नाही. पण यावेळी मात्र कुणालाही एक रुपया न देता ही सगळी तरुण मुलं एकत्र आली आणि गाव स्वच्छ केलं. हे काम पाहून गावकर्‍यांना आश्चर्य वाटलं. नंतर गावात ग्रामसभा झाली. या सभेत महिला कुजबुजत होत्या त्यातली एक आजी म्हणाली “ बापा असं सगळ्यांनी एक व्हवून  काम केलं तर गावाचा इकास न व्हयाला काय झाल”

यासाठी आदल्या दिवशी मी मंदिरासमोर बसलेल्या मुलांना गांधी जयंती व स्वच्छता यांचं महत्व सांगितलं होतं. आणि सकाळी फक्त एक हाक मारली ‘चला स्वच्छता करुयात’. या एका हाकेवर हा चमत्कार घडला हे पाहून माझा गावावरचा विश्वास दुणावला.












-संतोष गवळे

Friday, September 24, 2010

जानने का हक

मेरे सपनो को जानने का हक रे
क्यों सदियों से टूट रही है
इनको सजने का नाम नहीं

मेरे हाथों को जानने का हक रे
क्यों बरसों से खली पड़ी हैं
इन्हें आज भी ककम नहीं है

मेरी पैरों को यह जानने का हक रे
क्यों गाँव गाँव चलना पड़ा रे
क्यों बस की निशान नहीं

मीर भूक को जानने का हक रे
क्यों गोदामों में सड़ते हैं दाने
मुझे मुट्ठी भर दाना नहीं

मेरी बूढी माँ को जानने का हक रे
क्यों गोली नहीं सुई दवाखाने
पट्टी टाकने का सामान नहीं

मेरे खेतों को यह जानने का हक रे
क्यों बाँध बने हैं बड़े बड़े
तो भी फसल में जान नहीं

मेरे जंगलों को यह जानने का हक रे
कहाँ डालियाँ वोह पत्ते टेल मिटटी
क्यों झरनों का नाम नहीं

मेरे नदियों को यह जानने का हक रे
क्यों ज़हर मिलाये कारखाने
जैसे नदियों में जान नहीं

मेरे गाँव को यह जानने का हक रे
क्यों बिजली न सदके न पानी
खुली राशन की दुकान नहीं

मेरे वोटों को यहे जानने का हक रे
क्यों एक दिन बड़े बड़े वाडे
फीर पांच साल काम नहीं

मेरे राम को यह जानने का हक रे
रहमान को यह जानने का हक रे
क्यों खून बह रहे सड़कों में
क्या सब इन्सान नहीं

मरी ज़िन्दगी को यह जानने का हक रे
अब हक के बिना भी क्या जीना
यह जीने के समान नहीं

Sunday, September 19, 2010

पर्यावरणीय गणेश उत्सव

गणेश उत्सवातील वाढते प्रदुषण आपल्याला नवीन नाही! पाण्याचं, नद्यांचं, प्रदुषण, ध्वनी प्रदुषण, प्लास्टिक, थर्मोकोल यामुळे हवेचं प्रदुषण ... अनेक प्रकार! मात्र काही वर्षांपासून हे प्रदुषण कमी करण्यासाठी प्रयत्न करणार्यांची संख्याही वाढतीये! अनेक ठिकाणी अनेक संस्था - संघटना, वेगवेगळे गट आणि महापालिकाही विविध पातळ्यांवर हे प्रयत्न करत असतात.  त्यात मातीच्या गणपतीच्या मूर्ती बनवणे, पर्यावाराणीय आरास, मूर्तीदान, निर्माल्य दान आशा गोष्टींचासमावेश असतो. नाशिकमध्ये गोवर्धन - गंगापुर गावातले काही गावकरी आणि निर्मल ग्राम निर्माण केंद्र गेल्या काही वर्षांपासून पर्यावरणीय गणेश उत्सव साजरा करतो. गेल्या वर्षी इतर काही गटांकडून प्रेरणा मिळाली आणि निर्माल्य दान अभियानाही घेतलं.

या सगळ्या उपक्रमांमधले काही अनुभव.
मातीच्या मूर्ती

7-8 वर्षांपासून गोवर्धन गावातली काही मुलं मातीच्या गणेश  मूर्ती बनवतात.  निर्मल ग्राम निर्माण केंद्रात ही कार्यशाळा होते. नंतर सर्वजण आपापल्या मूर्ती घरी नेऊन बसवतात. पूर्वी हे गणपती शाडूच्या मातीचे बनवायचो. मात्र तिला काही स्थानिक पर्याय शोधावा असा विचार आला. मग शेतातली काळी माती आणि शेण एकत्र भिजवून, मळून त्यापासून मूर्ती बनवू लागलो. ते साध्या पोस्टर कलर्सने रंगवतो. जसजसा सराव झाला तसा मुलांच्या मूर्तींचा आकार वाढू लागला, मूर्ती अधिक सुबक, देखण्या होऊ लागल्या. शिवाय स्वत: बनवलेला गणपती घरी आणून बसवण्यातला आनंद  वेगळाच !

पर्यावरणीय विसर्जन

गावात ज्यांच्या मूर्ती मातीच्या आहेत असे बहुतेक सर्वजण अनंत चतुर्दशीला विसर्जनासाठी एकत्र येतात,  गणपतीच्या मूर्तींचे  मोठ्या ड्रममध्ये विसर्जन करतात. जिथून मूर्ती बनवण्यासाठी माती घेतली तिथेच ती पुन्हा मिळते !

निर्माल्य दान अभियान

निर्मल ग्रामकडे येणारा रस्ता पुढे गंगापुर धरणाकडे जातो. रस्त्यात नदीवर एक पूल आहे. नाशिक शहरातली अनेक गणेश मंडळे, कुटुंबं गणपती विसर्जनासाठी येतात. मूर्तींसोबत १० दिवसांचे निर्माल्यही नदीत सोडतात! गेल्या वर्षी आम्ही सर्व रस्त्यावर थांबलो आणि येणार्‍या गाड्यांना आडवून लोकांना निर्माल्य आमच्याकडे देण्याचे आवाहन केले. खूप छान प्रतिसाद मिळाला 'निर्माल्य नदीत टाकून नदीचे व निर्माल्याचेही पावित्र्य कमी करू नका, आपले निर्माल्य वृक्षदेवतेच्या चरणी अर्पण करण्यासाठी दान करा' असे भावनिक आवाहन करणारी पोस्टर्सही लावली होती.  आम्ही फक्त  तीन - साडेतीन  तास हे काम केलं पण प्रचंड निर्माल्य जमा झालं.

 हा कार्यक्रम खूप ऐनवेळी घेतला. त्यामुळे निर्माल्याचें लगेच वर्गीकरण करणे शाक्य झाले नाही. या सर्व निर्माल्याचे ख़त करायचे होते, पण दुसर्या दिवशी जेव्हा त्याचं वर्गीकरण केलं तेव्हा त्यात काय काय निघालं ?

 १. पानं, फुलं, दूर्वा इ.  - ३०० किलो.
 २. नेवैद्य / प्रसाद        - २० किलो
 ३. नारळे                   - ३९
 ४. खोबर्‍याच्या वाट्या - ३०
 ५. धान्य                   - २ किलो
 ६.  फळे                    - १५ किलो
 ७. वस्त्रे                    - ४५
 ८. प्लास्टिक             - २५ किलो
 ९. देवांचे फोटो   
१०. मातीचे बैल
११. मूर्ती
१२. कापराच्या डब्या, अत्ताराच्या बाटल्या, वातींचे पुड़े, कात्री, चाकू, टूथब्रश 


ही यादी पाहिली आणि आपण किती बेजबाबदारपणे या सर्व गोष्टी नदीत टाकतो, याचा प्रत्यय आला !! आपल्याकड़े धान्याचा तुटवडा असताना, आपण खाऊ शकू आशा वास्तु,  ताजी फळं हे सगळं सरळ नदीत टाकतो? आपल्या धार्मिक संकल्पना काय आहेत? असे प्रश्नही पडले! आणि एवढा तरी कचरा आपण नदीत जाण्यापासून वाचवला याचं सगळ्यांनाच खूप समाधान वाटलं !

यंदा हे अभियान अधिक मोठ्या स्तरावर घ्यायचे आहे. आपण सगळेच यात सहभागी होऊ शकतो, आपापल्या भागात अशी अभियानं राबवू शकतो. बर्याच ठिकाणी मूर्ती दानाचेही उपक्रम राबवले जातात. त्यांच्यात सहभागी होऊ शकतो. नदी वाचवणं हे  आपलं सगळ्यांचं  काम आहे !!

-मुक्ता नावरेकर, 
निर्मल ग्राम निर्माण केंद्र, 
नाशिक 
muktasn1@gmail.com

Thursday, May 13, 2010

त्याला इलाज नाही

धिक्करिली तरीही सटवीस लाज नाही
श्रद्धा न पाठ सोडी त्याला इलाज नाही

देवातुनी जगाला ज्याने विमुक्त केले
त्यालाच देव करिती त्याला इलाज नाही

लढवून बांधवांना संहार साधणारा
गीता खुशाल सांगे त्याला इलाज नाही

तत्त्वज्ञ आणि द्रष्टे खंडून एकमेका
कथिती विरुद्ध गोष्टी त्याला इलाज नाही

ते भूत संशयाचे ग्रासून निश्चितीला
छळते भल्याभल्यांना त्याला इलाज नाही

विज्ञान ज्ञान देई निर्मी नवीन किमया
निर्मी न प्रेम शांती त्याला इलाज नाही

बुरख्यात संस्कृतीच्या आहे पशू दडून
प्रगटी अनेक रुपे त्याला इलाज नाही

असतो अशा जिवाला तो ध्यास मूल्यवेधी
अस्वस्थता टळेना त्याला इलाज नाही

ज्यांना अनेक छिद्रे असल्याच सर्व नावा
निर्दोष ना सुकाणू त्याला इलाज नाही

वृद्धापकाल येता जाणार तोल थोडा
श्रद्धा बनेल काठी त्याला इलाज नाही

-विंदा करंदीकर 

एवढे लक्षात ठेवा

उंची न अपुली वाढते फारशी वाटून हेवा
श्रेय ज्याचे त्यास द्यावे एवढे लक्षात ठेवा

ती पूर्वजांची थोरवी त्या पूर्वजांना गौरवी
ती न कामी आपुल्या एवढे लक्षात ठेवा

जाणती जे सांगती ते ऐकूनी घ्यावे सदा
मात्र तीही माणसे एवढे लक्षात ठेवा

चिंता जगी या सर्वथा कोणा न येई टाळता
उद्योग चिंता घालवी एवढे लक्षात ठेवा

विश्वास ठेवावाच लागे व्यवहार चाले त्यावरी
सीमा तयाला असावी एवढे लक्षात ठेवा

दुप्पटीने देत असे जो ज्ञान आपण घेतलेले
तो गुरूचे पांग फेडी एवढे लक्षात ठेवा

माणसाला शोभणारे युद्ध एकच या जगी
त्याने स्वत:ला जिंकणे एवढे लक्षात ठेवा

-विंदा करंदीकर

Wednesday, March 31, 2010

मुन्नी इस्कूल जाएगी . . .

मै ना जानु पढ़ना लिखना,
लेकिन मुन्नी को हे पढ़ना,
अच्छी शिक्षा पाएगी
जब मुन्नी इस्कूल जाएगी . . .

रोज मजूरी कितनी मिलती,
मै ना जानु कोई गिनती
वो मुझसे गिनवाएगी
जब मुन्नी इस्कूल जाएगी . . .

दूर कभी चिठ्ठी हो देनी
मेरी बात लिखेगी मुन्नी
ख़त मे वो छाजाएगी
जब मुन्नी इस्कूल जाएगी . . .

हर मुश्किल से उसको लढना
कुछ भी हो आगे हे बढ़ना
अच्छे नंबर लाएगी
जब मुन्नी इस्कूल जाएगी . . .

जीवन कटा हे सहेते सहेते
थोडा हसते थोडा रोते
वो गीत खुशीके गाएगी
जब मुन्नी इस्कूल जाएगी . . .

Monday, March 29, 2010

पोटा-पाण्यासाठी

गेले दीड वर्ष रोजगार हमी योजना हा विषय घेऊन निर्माण फेलोशिप अंतर्गत शिक्षण, काम चालू आहे. आपल्या देशातील सद्य परिस्थिती बघता अशा उपक्रमांची नितांत गरज आहे. ग्रामीण भागात राहून उत्पादक कार्य करायचे असेल तर पाणी हे अत्यंत महत्त्वाचे ठरते. रोजगार हमीतून पाण्याचे व्यवस्थापन करण्यासाठीची पायाभून कामे करून या पाण्याच्या आधारे स्थानिक रोजगार निर्मिती व्हावी असा याचा उद्देश.

एका बाजूला हे काम चालू आहे. सरकारी योजना जशी चालते त्या कार्यक्षमतेनी ही देखील योजना चालू आहे. मधे विवेक सावंतांशी चर्चा करत असताना असा विषय निघाला की आजच्या सरकारी योजनेंमध्ये माणसाच्या बुद्धीला, उद्योजकतेला चालना मिळेल असे पैलू नसतात आणि त्यामुळे यात लोकांच्या बाजूने ओढा नाही दिसत. सरकार करेल तर आम्ही येवू असा एक भाव असतो. यातून मार्ग कसा काढायचा? माझ्या पायावर उभा राहण्यासाठी धडपड करण्याच्या वृत्तीला चालना मिळेल आणि अशा धडपड्या व्यक्तीला मदत म्हणून सरकार पाठीशी उभे असेल अशा योजना कशा बनवता येतील?

या चर्चेनंतर जमेल तिथे लोकांशी संवाद करत असताना अशी काही स्वयंरोजगाराची, उद्योजकतेची वेगळीच उदाहरणे बघायला मिळाली ती मांडण्याचा इथे प्रयत्न करत आहे.

पेठ नाशिक रस्त्यावर वाटेत एक घाट आहे. घाटातून परतत असताना एका बाईक वर भरपूर भंगार वाटावे असे सामान घेऊन जाताना एक माणूस दिसला. मला वाटलं जाऊन विचारवं की एवढे कुठे घेऊन जाताय, पण ते काही जमले नाही. थोडे पुढे एक मारुती चे छोटेसे देऊळ आहे. तिथे तो माणूस थांबला. मग मी ही थांबलो आणि त्याच्याशी गप्पा मारल्या... त्याचा विडियो खाली आहे. यात बहुतेक गोष्टी आलेल्या आहेत. 

Saturday, March 27, 2010

माझे मत


हे माझे मत आहे. आपली लोकशाही आहे म्हणून हे मांडत आहे.
धान्यापासून मद्य निर्मिती चे कारखाने हे शेतकर्‍यांना लाभ होण्यासाठी उघडलेले नाहीत. आपणंच निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींनी स्व:चे खिसे भरण्यासाठी, वैयक्तिक लाभासाठी हे कारखाने सुरू केले आहेत. लोकशाही व्यवस्थेत लोकप्रतिनिधींना दिलेल्या अधिकाराचा हा गैरवापर आहे असे मला वाटते. लोकशाहीचा रूपांतर धंद्यात होत चालल्याचे हे द्योतक आहे. सर्व जनतेनी भरलेल्या करातून स्वत:चे खिसे भरण्याचा हा प्रयत्न आहे.
ग्रामीण भागातील शेतकर्‍याचे जीवन कठीण आहे. पाऊस अनियमित आहे. पर्यावरणातील बदलामुळे पावसाची अनिश्चिती वाढत आहे. यासाठी मद्य निर्मिती हा मार्ग नाही. राळेगण सिद्धी मध्ये 30 वर्षापूर्वी 25 दारूचे गुत्ते होते. आज या गावाची परिस्थिती आपण जाणतो. ही प्रगती याच दारूच्या गुत्त्यांमुळे आहे असा गैरसमज मद्याच्या आधारे प्रगती होईल असे मानणार्‍यांचा होऊ शकतो. परंतु हे 25 गुत्ते बंद करून पाणी व्यवस्थापनाचे काम या गावानी केले. यातून पावसाच्या पाण्याच्या अनियमिततेवर या गावानी मात केली. पूर्ण महाराष्ट्रात सर्वात कमी पाऊस म्हणजे 30 ते 40 से.मी. पाऊस पडणार्‍या प्रदेशातले हे गाव आहे. जर या गावाला हे शक्य झाले तर इतर गावांना का नाही होणार. आज महाराष्ट्रातील अनेक समृद्ध गावांच्या प्रगतीचे हेच कारण आहे. जसे की
* म्हसवंडी (जि. अहमदनगर)
* हिवरेबाजार (जि अहमदनगर)
* पारडा (ता. जि. हिंगोली)
* पारडी (ता. आसरा, जि. वाशिम)
* खापरी (ता. हिंगणघाट जि. वर्धा)
* पुसेगाव (जि. सातारा)
* निढळ (ता.खटाव जि. सातारा)
* लोधवडे (जि. सातारा.)
* घाटपिंप्री (जि. उस्मानाबाद)
* बोरकरवाडी (ता. बारामती, जि. पुणे)
* टाकळी बंधारा (ता. हिमायतनगर, जि. नांदेड)
या गावांकडून शिकून पाण्याचे व्यवस्थापन केल्यामुळे पावसाच्या अनियमिततेवर मात करणे शक्य आहे. ही आपल्या कार्यासाठीची दिशा असावी असे मला वाटते. मद्य नको, पाण्याचे व्यवस्थापन हवे!
ही योजना आपल्या आजारी लोकशाहीचे लक्षण आहे. लोकशाही व्यवस्थेत लोकांच्या, माझ्या असहभागाचे प्रतीक आहे. लोकशाहीचे रुपांतर धंद्यात झाल्याची खूण आहे. ही योजना आपल्यातील मानवी स्वार्थाने मर्यादे पलीकडे गेल्याचे द्योतक आहे. म्हणून माझा याला विरोध आहे.
विरोध धान्यापसून मद्य निर्मितीचा... शोध बळकट लोकशाही व योग्य लोक प्रतिनिधींचा !!
सलग  समतल चर खणून पाण्याचे उत्तम व्यवस्थापन करता येते. उतारावरचे पाणी आडवून, गती कमी करून जिरवणे हे याच्यामुळे शक्य होते. असे केल्यामुळे पाणी जमिनीखालून वाहते आणि पाऊस संपल्यानंतरही उपलब्ध होते. हे पाणी व्यवस्थापनाचे उत्तम तंत्र आहे. अशा सारख्या इतर अनेक उपाययोजना आहेत व त्यांचा योग्य वापर केल्यास पाण्याचे उत्तम नियोजन करता येते. 
सलग समतल चरांमध्ये आडलेले पाणी 
चरांमध्ये झाडे लावण्याचे शास्त्रशुद्ध तंत्र आहे. तशी झाडे लावल्यास त्यांची जगण्याची शक्यता वाढते 


गावा मागच्या  डोंगरात सलग समतल चर केले आहे. त्यामुळे उपलब्ध झालेल्या पाण्याच्या आधारे केलेकी शेती दिसत आहे. हा पावसाळ्यानंतरचा काळ आहे.













-प्रियदर्शन 

Thursday, March 25, 2010

Subsidy Aali

सब्सिडी आली
(चाल: अप्सरा आली)

म्हणे शेतीची दैना
पाहावेना नयना
योजना काढली भारी

ऊसही ‘मळ’ले
द्राक्षही पिळले
वापरु मका अन ज्वारी

सर्व मिळुनी साव
रचिला डाव
पैशाची मोठी हाव

कसा मिळेल राव
ज्वारीला भाव
मंत्रीच मारतील ताव

सब्सिडी आली...
सरकारी खिशातून
दारु निघाली...
ज्वारीच्या कणसातून
तिजोरी भरली...
मंत्र्यांची पैशातून
शेतकरीन रडली...
उपाशी पोटातून
SSS

- अमृत बंग

Wednesday, March 3, 2010

German Bakery

They smile through the massacre
I look on, numbed by the shock.
They see death, coercion, Justice
I see nothing; I’m still in trauma you see?
They move on, planning another
I move on, forget.

‘Life goes on. Time heals all wounds.
Turn a blind eye.’
Bad clichés. Bad clichés.

Them. Me.
Blood-lust vs. apathy,
Hate and indifference.
They watch, and I watch.
Tell me then,
what is the difference?

‘Walk a mile in a victim’s shoes. My heart,
it bleeds for you. A penny for your thoughts?’
Good clichés. Good.

I can remember. Everything, always.
I can -
Hurt. Talk. Feel. Write.

They are willing to die for their cause,
I can at least live for mine -
Be alive. Be human.

-Mukta Patil

Wednesday, February 17, 2010

केली मी आत्महत्या


भेकड म्हणेल कुणी मला
मुर्ख किंवा बेजबाबदार सुद्धा
पण भिती उरली नाही आता कुणाची
हो, केली मी आत्महत्या ।।

रडताहेत बघा आता कसे
ते घरचे अन् शेजारचे
पण कधी दोन मार्क कमी मिळाले
तर अक्षरशः लचके तोडायचे.
शाळा, कॉलेज, क्लास, CET
चा घोळ कधी संपलाच नाही
स्पर्धेचा चक्रव्युह अभिमन्युलासुद्धा
भेदता आलाच नाही ॥

म्हणे बालपण निरागस असतं
आपल्याला कुठे ठाऊक होतं
साला अर्धा वेळ शाळा
अन उर्लेला वेळ homework खातं.
पप्पा म्हणायचे, दादाला बघ
कसा engineer  झाला मोठा
95 टक्क्यांहून कमी मिळाले
तर पाठीत ठरलेला रट्टा.
प्रत्येक पायरी चढता चढता
स्पर्धा सुद्धा वाढत गेली
एकएका गुणासाठी मारामार
ही काय साली जिंदगी झाली?
निघालो होतो कुठल्या दिशेने
प्रवाहाने आणून फेकलं कुठे
उमज आली खूप उशीरा
आता मागे फिरणं नव्हे ।।

मग उचललं एक दिवस rat-kill
किंचित थरथरला हात
घडू दे चंगली अद्दल म्हणून
गिळलं एका झटक्यात.
आठवण आली फक्त आईची
जिचा तुटायचा माझ्यासाठी जीव
माझ्या आकांक्षा, स्वप्नांची
फक्त तिलाच होती जाणीव.
विचलीत झालं माझं मन
तिच्यासाठी क्षणात त्या
पण मेलो होतो कधीच मी 
फक्त आज केली आत्महत्या ॥ 

-तन्वी देशपांडे 

Tuesday, February 16, 2010

आझाद मैदानावरील धरणे

दोन वाजताची वेळ ठरलेली होती. मी, सचिन, गणेश अन संजय धावपळ करतच आझाद मैदानावर सव्वादोनच्या सुमारास पोहचलो, आम्हाला वाटलं उशीर झालाय आणि कदाचित कार्यक्रम सुरूही झाला असेल. निर्माणसह रेशनिंग कृती समिती, स्त्री मुक्ती संघटना, महिला मंडळ फेडरेशन, महाराष्ट्र महिला परिषद या सारख्या महाराष्ट्रातील २८ संघटना आझाद मैदानावर शासनाच्या धान्यापासून दारू बनवण्याच्या धोरणा विरोधात महात्मा गांधी पुण्यतिथी दिवशी धरणे धरणार होत्या. आत्तापर्यंत अमुक संघटनेने, अमुक ठिकाणी, काही मागण्यांसाठी किवा विरोध दर्शवण्यासाठी धरणे धरले, मोर्चा काढला वगैरे गोष्टी मी फक्त वर्तमानपत्रातून वाचत ऐकत आलो होतो. आज मात्र प्रत्यक्ष मी हे सगळं अनुभवणार होतो. आम्हाला पोहचायला उशीर होण्यााचं कारण सकाळपासून आम्ही वाशीच्या ऑफिसमध्ये धरण्यासाठी लागणारी पोस्टर्स बनवत होतो. तर सचिन मुख्यमंत्र्यांना द्यावयाच्या निवेदनावर शेवटचा हात फिरवत होता. आम्ही चौघांनी ऑफिसात नुसता गोंधळ घातला. पोस्टर बनवायला पेपर आहे, तर स्केच पेन नाही प्रिंटर बिघडलाय, पेनड्राईव चालत नाहीये, अशा अडथल्याना पार करत पाच-सहा पोस्टर्स बनवली.

आझाद मैदानावर पोहचलो तेव्हा आम्ही चौघे सोडून आणखी फक्त चार-पाच जणं जमली होती अन कार्यक्रम सुरुच काय पण आणखी काही तयारीही झाली नव्हती, माझा खरंतर मूड ऑफ झाला. आझाद मैदानावर एक दुसराच कार्यक्रम चालू होता त्यासाठी बरीच जनता आली होती. त्यामुळे आम्ही एका कोप-यात जाऊन थाबलो. हळूहळू एक एक जण येत होता. मागे झालेल्या धान्यापासून दारू विरोधी परिषदेमुळे बरेच चेहरे ओळखीचे वाटत होते. ब-याचजणांनी पोस्टर्स आणली होती. मग आम्ही ती भिंतीवर लावण्यालस सुरुवात केली. एकीकडे माइक व स्पीकर्सची व्यवस्था होत होती. तीन वाजेपर्यंत ३००-३५० जनता जमा झाली. बहुतांशी महिला होत्या. आम्ही पन्नास एक पुरुष मंडळी असू. माईकची व्यवस्था झाल्यावर चळवळीतील गाणी व दारू विरोधात घोषणा सुरु झाल्या. आता जरा काहीतरी घडते आहे असा वाटू लागलं. गणेश व सुनील ने "सांग सांग भोलानाथ दारू मिळेल का?" हे गाण म्हटलं. त्यानंतर गोरक्षभाऊनी आपण इथे का जमलो आहोत याची सर्वांना कल्पना दिली. या धरण्यामधे सहभागी असलेल्या विविध संघटनांनी मागील काही दिवसात धान्यापासून दारू विरोधात स्वाक्षरी व पोस्टकार्ड मोहिमा राबवल्या होत्या. त्यात निर्माणच्या वतीने आम्हीही वाशी व ठाणे इथे अशाप्रकारचे काम केले होते. तर या सर्व स्वाक्ष-या व धान्यापासून दारूविरोधी अभियानाच्या मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्र्यांची भेट घेवून त्यांना द्यावयाचे असे धरण्याचे स्वरूप ठरले.

जेव्हा एखादी संघटना आझाद मैदानावर काही मागण्या घेवून धरणे धरते किंवा मोर्चा काढते, तेव्हा तेथे उपस्थित असणा-या पोलीस अधिका-यांची ही जबाबदारी असते की त्यांनी मंत्रालयातील संबंधित मंत्र्यांशी किंवा अधिका-यांशी संपर्क साधून जनतेच्या मागण्या/मते त्यांच्यापर्यंत पोहोचवाव्यात. जर आपणास त्या संबधित मंत्र्यांची/अधिका-यांची भेट हवी असेल तर तशी व्यवस्था होऊ शकते. अर्थात या गोष्टी मला माहीत नव्हत्या. या आधी कितीदातरी मी या मैदानासमोरून गेलो असेन पण या गोष्टीची मला कल्पना नव्हती.

आता घोषणा व भाषणे यांमुळे धरण्याचा रंग चढू लागला होता. उल्काताई तर खूप छान बोलल्या. सुरेशकाकांनी आपल्या मागण्या म्हणजे मुख्यमंत्र्यांची भेट घेणे व त्यांना २३००० सह्या असणारे मागण्यांचे निवेदन देणे पोलिसांसमोर ठेवल्या. अर्थात त्यांनी काही फारसे लक्ष दिले नाही. एकीकडे घोषणा चालू होत्याच. संध्याकाळी पाच वाजून गेल्यानंतरही काहीच होत नाहीये असे दिसल्यावर आम्ही पोलिसांना इशारा दिला की जर आम्हाला थोड्यावेळात भेट मिळाली नाही तर जमलेले सर्व चारशे लोक मंत्रालयात जाऊन स्वतः मुख्यमंत्र्यांची भेट घेतील. यावरही पोलिसांनी चालढकलपणा व दूर्लक्ष केलं. मग आम्ही मंत्रालयात सत्याग्रहाच्या मार्गाने जाण्याचे ठरवले व दोन-दोनच्या रांगा करून, हातात पोस्टर्स घेवून आझाद मैदानाच्या गेटकडे जाण्यास सज्ज झालो. आम्ही उत्साही तरुण पुढच्या रांगेत जाऊन उभा राहिलो, तेव्हा भारतीताईनी काही महिलांना पुढे उभे केले.

समोर महात्मा गांधींचा फोटो घेवून दोन महिला होत्या. त्यांच्या मागे दोन-दोनच्या रांगा करून आम्ही सर्वजण आझाद मैदानाच्या गेटकडे निघालो. हा आमचा पवित्रा पाहून पोलिसांमधेही हालचाल दिसू लागली. आता पोलिसांची संख्या वाढलेली होती, जवळपास ५०-६० पोलीस आझाद मैदानाच्या गेट वर आम्हाला अडवण्यासाठी जमा झाले होते. मागे पाच-सहा पोलीस व्हॅानही होत्या. बहुदा अटक करावी लागलीच तर कामी येतील असा त्यांजचा विचार असावा. आम्ही गेटकडे चालू लागलो, सर्वांनाच पुढे काय होणार याची उत्सुकता होती अन थोडी भीतीही वाटत होती. पोलीस, मोर्चा, धरणे या अश्या गोष्टी मी तरी पहिल्यांदाच अनुभवत होतो, आपण काहीतरी वेगळं अनुभवतोय असा वाटत होतं. आम्ही सगळे गेटला भिडलो व पोलिसांनी बंद केलेले गेट उघडण्याचा प्रयत्न करत होतो. तर ते आम्हाला मागे रेटत होते. सगळे आझादमैदान घोषणांनी भरून गेले होते. - "बडी शरम कि बात है पुलिसभी उनके साथ है" अन "एक रुपयाचा कडीपत्ता, मुख्यमंत्री बेपत्ता".

काही वेळातच वातावरण चांगलेच तापले, पोलीस अन कार्यकर्त्यांमध्ये रेटारेटी सुरु झाली. पाच-सहा पोलीस गोरक्षभाऊंना घेरून त्यांच्याशी बाचाबाची करू लागले. त्यांच्यावर उगारलेली काठी सुनीलने हातात पकडून ठेवली. मग पोलिसांनी सुनीलला बाहेर काढले अन गाडीत टाकले. आता मात्र सगळाच जमाव उसळला व घोषणांचा जोरही वाढला. मला त्या क्षणाला एक गोष्ट जाणवली की आपणच निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींना भेटण्यासाठी व त्यांच्यासमोर आपल्या मागण्या ठेवण्यासाठी जर एवढा संघर्ष करावा लागत असेल तर गांधींना 'इंग्रजांनो देश सोडा' असे म्हणतांना किती संघर्ष करावा लागला असेल. एका क्षणासाठी त्या कल्पनेने मी थरारून गेलो. बाहेर एवढा गोंधळ चालू असतानाही त्या क्षणासाठी अंतर्मुख झालो. नाहीतर आजपर्यंत सत्याग्रह, मोर्चा, आंदोलने हे शब्द नुसते वाचत किंवा ऐकत आलो होतो, त्याचा थोडा थोडा अर्थ आता कळतोय अस वाटू लागल. चांगल्या गोष्टींसाठी असा हा संघर्ष करणार्यांबद्दल आदर वाटू लागला अन मी नकळत ते गेट जोराने ढकलू लागलो.

साडेसहाच्या सुमारास पोलिसांनी, मुख्यमंत्री तर नाही पण गृहमंत्रालयातील सचिव श्री संगीतराव भेट घेण्यासाठी तयार आहेत असे सांगितले व तुमच्यापैकी कोणीही एकजण भेटू शकता असा निरोप पोलिसांनी आम्हाला सांगितला. पण आम्ही कमीतकमी पाचजणांचे शिष्टमंडळ त्यांना भेटेल या मुद्यावर अडून राहिलो. थोड्याच वेळात तीही परवानगी मिळाली. मुख्यमंत्री मुंबईमध्ये नाहीत तेव्हा संगीतरावना भेटा. ते तुमचे म्हणणे मुख्यमंत्र्यांसमोर मांडतील असे सांगण्यात आले. सचिन, सुरेशकाका अन् आणखी तीघे असे पाचजण सचिवांना भेटण्यास पोलिसांच्या गाडीतून गेले. आम्ही सगळे परत मैदानात येऊन बसलो. तासाभराने शिष्टमंडळ पोलिसांच्याच गाडीतून परत आझाद मैदानावर आले. सचिवांनी निवेदन स्वीकारले होते व ते मुख्यमंत्र्यांना सादर करणार होते. सचिन म्हणाला की “सचिवांनी आम्हाला विशेष काही बोलू दिले नाही, तुम्हीच पुन्हा या विरोधाचा नीट विचार करा या विषयीचा तुमचा अभ्यास नाही” अशी उडवाउडवीची उत्तरे त्यांनी दिली.

एक गोष्ट तर स्पष्ट झाली की एवढ्या सहजासहजी आपले ध्येय साध्य होणार नाहीये, ही तर सुरवात आहे ...आगे आगे देखते है होता है क्या?
 
- त्रिशूल कुलकर्णी

Friday, January 29, 2010

सांग सांग भोलानाथ

सांग सांग भोलानाथ l दारु मिळेल काय ?


शेतामध्ये ज्वारी लावून दारु निघेल काय ? ll धृ ll

भोलानाथ ! दुपारी आई झोपेल काय

दारु बाटली घेताना आवाज होईल काय

भोलानाथ ! भोलानाथ !! सांग सांग भोलानाथ

दारु मिळेल काय ll १ ll

भोलानाथ ! भोलानाथ !! खर सांग एकदा

ज्वारीचे पिक येइल कारे तीनदा

भोलानाथ ! भोलानाथ !! सांग सांग भोलानाथ

दारु निघेल काय ll २ ll

भोलानाथ ! उद्या आहें मंत्र्याची बैठक

त्यात माझ्या ज्वारिला मिळेल का रे अनुमोदक

भोलानाथ ! भोलानाथ !! सांग सांग भोलानाथ

दारु निघेल काय ll ३ ll

सांग सांग भोलानाथ l दारु मिळेल काय ?

शेतामध्ये ज्वारी लावून दारु निघेल काय ? ll धृ ll

-अनामिक

Monday, January 18, 2010

कुमार निर्माण निमित्त


कुमार निर्माणचे गडचिरोली मधे पायलट टेस्टिंग करायचे आहे असं कळल्यापासून मी आणि अमृत बरेच उत्साहात होतो. आम्ही आठवड्यातले 2-3 दिवस बसून कुमार निर्माणच्या तयार केलेल्या पुस्तकामधल्या गोष्टी वाचून काढत होतो. त्यावर चर्चा करत होतो. त्याचं गडचिरोलीमधल्या शाळेत पायलट करण्यासाठी परवानगी घेऊन आलो. आणि माणसांची भाषा या गोष्टीचं वाचन करायची प्रॅक्टिस सुरू केली. त्याबरोबरच आम्ही अजून 1-2 गोष्टी लिहिता कशा येतील त्याचाही विचार केला. आणि लिहायला सुरूवात केली. पण हे सगळं बरंच हळूहळू चाललं होतं.

धान्यापासून दारू तयार करण्याच्या प्रस्तावाला विरोध कसा करायचा याचं बोलणं सुरू होतं. निर्माणींनी एक दिवसाचं लाक्षणिक उपोषणाची साखळी तयार करायची आणि निषेध नोंदवायचा असं ठरलं. तेवढ्यात आम्हाला आयडिया सुचली की आपण या ताज्या प्रश्नावर कुमार निर्माण मार्फत मुलांशी बोलू शकतो. आम्ही दोघांनी यावर एखादं छोटंसं नाट्य बसवायचं असं ठरवलं. नंतर मात्र असं जाणवलं की हे सगळं खूप कृत्रिम वाटू शकेल. मुलांपर्यंत तो प्रश्न न पोहोचता त्या नाट्यामधल्या भावना पोहोचतील. दारूड्या माणसामुळे कसा त्रास होतो; हे नाट्यरूपानी दाखवण्याची गरजच नाही कारण ही मुलं आजूबाजूला प्रत्यक्ष ते पहात आहेत. त्यांना त्यात काहीच नवीन वाटणार नाही. 9वी च्या वर्गाशी बोलताना आपण तो प्रश्न जसा आहे तसा आणि त्यांना समजेल अशा पद्धतीनं सांगावा असं आमचं ठरलं. नुसतं सांगून थांबायचं नाही तर काहीतरी कृती कार्यक्रम करायचा असंही ठरलं. हे सगळं करण्यासाठी सगळ्यात उत्तम तारीख होती 7 जानेवारी. कारण त्या दिवशी माझं उपोषण होतं. त्याच दिवशी आपण शाळेत गेलो आणि बोललो तर त्याचा जास्त परिणाम होईल असं आम्हाला वाटलं.

शाळेत 3.30 ला गेलो. तिथे शाळेच्या गच्चीत आमची बसण्याची व्यवस्था केलेली होती. आजूबाजूला छान झाडं होती. सगळी मुलं सतरंजीवर बसली होती. मुलं आणि मुली असे दोन जाणवतील असे ग्रुप होते. आम्हा दोघांसाठी 2 खुर्च्या ठेवलेल्या होत्या. गेल्या गेल्या मुलांनी आमचं टाळ्या वाजवून स्वागत केलं. आम्हाला ते खूप अनपेक्षित होतं. त्यांना आम्ही कुणीतरी ‘’पाहुणे’’ वाटत होतो! आम्ही सहजपणे जाऊन मुलांमधे बसलो आणि मुलामुलींना छान घोळका करून एकत्र बसायला सांगितलं. थोडीशी कुजबूज झाली पण मुलं आमच्या आजूबाजूला घोळका करून बसली. आम्ही ओळख करून दिली आणि त्यांना आमच्या बरोबर दिदी तेरा देवर दिवाना गाणं म्हणायला सांगितलं. मुलं आता जोशात आली होती. त्यांना थांबवून आम्ही केळझरकर काकांनी केलेलं त्याच चालीवरचं ‘’दारू पितो करतो धिंगाणा.. अरे वेड्या हिनं लुटला रे जमाना! हे गाणं गायला लागलो. मुलांना खूप मजा वाटली. धान्यापासून दारूनिर्मितीचा प्रश्न हा त्यांच्या डब्यात मिळणार्‍या भाजीच्या, पोळीच्या धान्याचा आहे, कुण्या तिसर्‍या व्यक्तीच्या आयुष्याचा नाही, हे त्यांना आधी पटवून दिलं. अमृतने त्यांना हा प्रश्न अगदी सोप्या भाषेत समजावून सांगितला. सरकार, दारूचे कारखानदार, दारू पिणारा, आणि सामान्य माणूस हे सारे जण या प्रश्नामधे गुंतलेले आहेत, हे समजावले. सगळे सांगून झाल्यावर आम्ही त्यांना विचारलं की ‘’तुम्हीच सांगा की या पूर्ण गोष्टीमधे गुन्हेगार कोण?’’ मुलांनी आपसुख बोलायला सुरूवात केली. आणि ते खूप मनापासून म्हणाले की‘’आपण सामान्य माणसं पण गुन्हेगार आहोत!’’..... आम्हाला खूप आश्चर्य वाटलं आणि कौतुकही वाटलं. त्या मुलांची प्रश्नाबाबतची समज अतिशय चांगली होती. ‘’आपण हे सगळं होऊ देतो म्हणून होतं”, असं एकजण म्हणाला. त्यांच्याच कडून मागणी आली की आपण काहीतरी केलं पाहिजे. काय करता येईल असं विचारल्यावर त्यांनी सांगितलं की ‘’आम्ही दारू प्यायला नाही पाहिजे’’‘’दुसर्‍यांना दारू पिऊ नाही दिली पाहिजे पण यापलीकडे त्यांना जाता येत नव्हतं. मग आम्ही त्यांना काही आयडिया दिल्या.

त्यादिवशी आम्ही कोर्‍या चिठठ्या घेऊन गेलो होतो. त्या आम्ही त्यांना वाट्ल्या आणि त्यावर आपल्या food to alcohol च्या वेबसाइट चा पत्ता लिहायला सांगितला. चिठ्ठ्यांच्या मागच्या बाजूला धान्य हवे! दारू नको! असं लिहिलेलं होतं. आणि त्या चिठ्ठ्या शाळा संपल्यावर चौकामधे वाटायला आणि लोकांना समजावून सांगायल्या सांगितल्या. मुलांनी ते खूप मनापासून केलं. आम्ही नंतर वर्गामधे जाऊन फळ्यावर एक चित्र काढलं. ज्वारीच्या कणसाच्या देठातून दारूचा पेग बाहेर येत आहे , असे ते होते. मुलांनी ते चित्र त्यांच्या वह्यांमधे काढले. त्यांना शाळेतल्या 7वी आणि 8वीच्या मुलांना हा प्रश्न समजावून सांगायची आयडियापण खूप आवडली. तुम्ही उपोषण करून आमच्या साखळीमधे सहभागी होऊ शकता असं सांगितलं. एका मुलीनं दुसर्‍याच दिवशी करायची तयारी दर्शवली. मुलांनी आमचे फोननंबर घेतले आहेत. पुन्हा या असं सांगितलं आहे. त्यांना अजून आम्ही कुमार निर्माण या कन्सेप्ट बद्दल फार सांगितलेलं नाही. पुढच्या खेपेला जरूर सांगू.

संपूर्ण अनुभवातून मी अमृत बर्‍याच गोष्टी शिकलो. एकतर आम्हाला हा प्रश्न ताजा असल्यामुळे आणि तो अतिशय महत्त्वाचा वाटत असल्याने खूप नैसर्गिक पद्धतीने मुलांना सांगता आला. त्यात प्रश्न समजावण्यासाठी कुठल्याही इतर माध्यमाचा आधार घ्यावा लागला नाही. परंतु मुलांशी संवाद साधण्यासाठी मात्र गाणं, विनोद, गोष्ट, चित्र अशा माध्यमांचा उपयोग झाला. मुलांमधे मुलांसारखंच होऊन गेलं, त्यांच्या छोट्या छोट्या विनोदांमधे आपण सहभागी होऊन गेलो की त्यांना आपण ‘’कुणीतरी पाहुणे न वाटता, त्यांच्यातले वाटू शकतो. आम्ही मुलांना हा प्रश्न जड वाटेल का अशी काळजी करत होतो. पण असं जाणवलं की आजूबाजूला घडणार्‍या घटनांचा ते विचार करत आहेत. कदाचित व्यक्त करत नसतील पण ते अनभिज्ञ नव्हते! त्यांना एखादी कृती करायची आहे म्हटल्यावर उत्साह आला. नाहीतरी काहीतरी बोअर लेक्चर सुरू आहे, असं वाटू शकलं असतं! काही मुलं खूप संवेदनशील होती कारण केलेल्या कृतीला नकारात्मक रिस्पॉन्स मिळाला तर त्यांना त्याचं वाईट वाटलं व त्यांनी तसं येऊन आम्हाला सांगितलं.


अजून खूप काही कराणं गरजेचं वाटतय. मुलांना परत भेटून अधिकाधिक खुलून संवाद साधायचा आहे. कुमार निर्माण अजून पायलट च्या स्टेजला आहे पण खूप उत्साह देणारं आणि अपेक्षा वाढवणारं आहे..... युवा निर्माणच्या रोपाची बीजं काळजीपूर्वक पेरायला हवीत!!  

-मुक्ता गुंडी

Saturday, January 2, 2010

जनसुनवाई

            गेल्या आठवड्यात नंदूरबार जिल्ह्यातल्या डनेल गावातलं रो.ह.यो.चं सोशल ऑडीट बघण्यासाठी मी आणि पीडी पुण्याहून निघालो होतो. पुण्याहून शहादा आणि तिथून पुढे धडगाव, मोलगी मार्गे डनेल.
अक्कलकूवा तालूक्यातले डनेल गाव. मध्य प्रदेश आणि गुजरात ही तिन्ही राज्ये इथून अगदी जवळ. नर्मदा या गावाजवळून वाहात जाते.
धडगाव ते डनेल जेमतेम तीस पस्तीस किलोमीटरचा रस्ता. पण इतका कच्चा की पोहचायला तब्बल अडीच तास लागणार होते. आदल्या रात्री पीडी पुढे गेला आणि मी योगीनीला मदत करण्यासाठी धडगावी थांबलो. रात्री उशीरापर्यंत काही कामे पूर्ण केली आणि पहाटे लवकर उठून डनेलला निघालो.
रस्त्यात मोलगीला काही वेळ थांबावं लागलं. नर्मदा बचाव आंदोलनाच्या एका कार्यकर्त्याला जबर मारहाण झाली होती. डॉक्टर त्याच्यावर उपचार करायला तयार नव्हते. तो सगळा गुंता सोडवून मोलगीहून निघायला दहा वाजले.
सोशल ऑडीट साठी आलेले शासकीय अधिकारी, योगीनी आणि गीतांजली या नर्मदा आंदोलनाच्या कार्यकर्त्या, पोलिसांची एक जीप, मिडियाची मंडळी, सोशल ऑडीट म्हणजे काय हे पाहायला जालन्याहून आलेली नाटकातली कलाकार मंडळींची एक गाडी आणि आम्ही, अशा सहा गाड्यांची वरात निघाली.
डनेल गावाला जाण्यासाठी या आधी रस्ताच नव्हता. सध्याचा रस्ता आहे तोसुद्धा दोन वर्षांपूर्वी झाला. पूर्वी सगळा प्रवास पायीच. रस्ता म्हणजे फक्त जेसीबीने करून ठेवलेला काय तेवढाच. डांबरीकरण नाही की खडी नाही. धक्के खात आजूबाजूचा सातपूडा पाहात आम्ही जात होतो. रस्ता संपला आणि डनेल गावात पोचलो तो पावसाला सुरूवात झाली.
सोशल ऑडीटसाठी गावात पेंडॉल टाकले होते. लोकांची बसायची व्यवस्था केली होती. आणि हळूहळू गावातली लोकं जमू लागली होती. काही लोकं नदीपलीकडून बार्जमधून येणार होती. ती आली की ऑडीटला सुरवात होणार होती. रो.ह.यो.अंतर्गत या भागात रस्त्याची काही कामं झाली होती. पण त्यात बराच भ्रष्टाचार झाला होता. त्याचंच आज सोशल ऑडीट होणार होतं.
रोजगार हमी योजना कायद्या अंतर्गत, गावात एखादं काम झालं असेल तर गावातल्या लोकांना झालेल्या कामाची तपासणी करण्याची मागणी करता येते. आतापर्यंत असं होतं की जर कामात घोटाळा किंवा भ्रष्टाचार झालाय अशी शंका आली तर गावातले लोक संबधित खात्यात तक्रार दाखल करू शकायचे. त्यानंतर पुढचा तपास आणि कारवाई करायचे सर्वाधिकार त्या संबंधित शासकिय अधिकार्‍यालाच असायचे.
मात्र झालेल्या कामाच्या संबंधित कागदपत्रांची मागणी आता लोकांना शासनाकडे करता येते आणि शासनाला ती पुरवावी लागते. हे सर्व शासनाच्या संबंधित अधिकार्‍याच्या आणि लोकांच्या उपस्थितीत घडून येतं. म्हणून ही जनसुनवाई. सध्या हा अधिकार रो.ह.यो. पुरता मर्यादीत असला तरी लवकरच शासनाच्या सगळ्या कामांच्या बाबतीत अशी मागणी करता येणे शक्य होईल.
बामणी, मोखाडा आणि चिमलखेडा अशा डनेल गावातील तीन ग्रामपंचायती मधे झालेल्या रोहयोच्या कामाचं हे सोशल ऑडीट होतं.
डेप्युटी कलेक्टर ( रो.ह.यो.), त्या गावचा बीडीओ, डेप्युटी इंजीनीअर, ग्राम रोजगारसेवक आणि ज्यांच्या आशिर्वादाने हा भ्रष्टाचार झाला तो राजकीय पुढारी, या तीन गावांतील मजूर आणि नर्मदा बचाव आंदोलनाची मंडळी अशी सगळी फौज उपस्थित होती.

मजूराचं नावं, त्याचे कामाचे दिवस आणि त्याला मिळालेली मजूरी मस्टरमधून वाचून प्रत्यक्ष लोकांकडून त्याची पडताळणी, असं ऑडीटचं स्वरूप होतं.
मस्टर वाचनाला सुरूवात झाली आणि पहिल्याच स्टेटमेंटला ऑब्जेक्षन घेत योगीनी ताईने पद्धतशीरपणे एकेक पुरावा सादर करायला सुरूवात केली. काही लोकांची नावे भलत्याच गावात दाखवली होती. खोटी नावे, खोटी जॉब कार्ड्स असा सगळा प्रकार होता.
शासनाची गोची अशी होती की झालेल्या कामाचा सगळा रीपोर्ट एन.आर.ई.जी. एस.च्या वेबसाईटवर टाकणं त्यांना बंधनकारक झालयं. त्यामूळे केंद्राकडून मिळालेली रक्कम आणि झालेल्या खर्चाची जुळवाजुळव करता करता त्यांची तारांबळ उडते. कारण बरीचशी कामे झालेलीच नसतात.
तपशीलवार रीपोर्ट बनवून वेबसाईटवर अपलोड करणे बंधनकारक असल्याने भ्रष्टाचार झालाय की नाही हे तपासणं आता आपल्याला फारच सोपं झालयं. अगदी एखाद्या मजूराचा जॉब कार्ड नंबर घेऊंन त्याचा दोन वर्षांचं रेकॉर्ड ट्रॅक करणेदेखिल शक्य आहे. पण त्या अडाणी मजूराला जिथे लिहितावाचताच येत नाही तो इंटरनेटवरून माहिती कशी काढणार..?
म्हणूनच नर्मदा बचाव आंदोलनातल्या योगिनी आणि गितांजली ताई लोकांना हे सगळं समजून देत होत्या. कसं आणि काय बोलायचं, काय प्रश्न विचारायचे तेही सांगत होत्या. जनसुनवाईमधे लोकांनी बोलावं हीच अपेक्षा असते.

मुद्दलात हा भ्रष्टाचार झालाय हे अगदी उघड गुपित होतं. सगळ्यांना ते माहितही होतं. पण ते सिद्ध करणं गरजेचं होतं. मग साक्षी पुरावे आणि सगळा गोंधळ सुरू झाला.
इंटरनेटवरील माहिती आणि मस्टर यांचा ताळमेळ जुळेना. कारण सगळं मस्टरच चूकीचं होतं. फॉरेस्ट डिपार्टमेंट आणि डेप्युटी इंजीनिअरने गावात प्रत्यक्ष रस्ता न बांधता, तो बांधलाय असं दाखवून सगळा खर्च खिशात घातला होता. किती शांतपणे आणि पद्धतशीरपणे ही मंडळी भ्रष्टाचार करू शकतात ते आम्ही डोळ्यांसमोर पाहात होतो.
नुकतीच पेपर मधे या भ्रष्टाचाराबद्द्ल बातमी येऊन गेले होती. संबंधित व्यक्ती मयत असूनही दोन वर्षे तिला कामावर दाखवून मजूरी दिल्या गेली होती. ही बातमी पेपरमधे आल्यानंतर त्या मयताच्या विधवा बायकोचं अपहरण केलं गेलं. आंदोलनाच्या कार्यकर्त्यांना खूनाच्या धमक्या आल्या. एकंदरच या भ्रष्टाचाराचा आवाका बराच मोठा होता.
पाच दिवसांच्या बाळंतिनीला सहा दिवस काम केल्यावर या लोकांनी एक रूपयाचीसुद्धा मजूरी दिली नव्हती. अशा अनेक संतापजनक गोष्टी उघड होत होत्या आणि लोकांचा संयम सुटत होता. नियम वाकवून, मोडून - तोडून पैसा गडप केला होता.
शेवटी शेवटी तर लोकं भलतीच संतापली. भाषा समजत नसली तरी त्यांचा राग आणि संताप मात्र समजत होता. कितीही ठरवलं, तरी तटस्थ राहून ते सगळं पाहाणं शक्य होत नव्हतं.
यथावकाश जनसुनवाई संपली. प्रोसिडिंग लिहून घेण्याच्या कामाला सुरूवात झाली आणि गावाहून आलेले मजूर लोक जेवायला बाहेर पडले. गावातल्या लोकांनीच जेवणाची व्यवस्था केली होती. आम्हीही तिथून उठलो आणि बाहेर पडलो.
सातपूड्यातलं हे डनेल नावाचं छोटसं गाव. गाव कसलं, छोट्या छोट्या पाड्यांचा समूह. पिडी म्हणाला, या गावात जिथे रस्ताच पोहचत नव्हता तिथे शासनाच्या योजना कशा पोहचणार? हे कळत होतं पण पटत नव्हतं. शासनाच्या योजना पोचल्या नव्हत्या पण भ्रष्टाचार मात्र पोहचलेला दिसत होता. सगळंच अस्वस्थ करणारं होतं.
आमच्याच वयाच्या रामसिंग नावाच्या गावातल्या एका तरूणाशी आम्ही बोलत होतो. जनसुनवाई सुरू असताना गावातली तरूण मंडळीसुद्धा बोलत होती, जनसुनवाईच्या परीणामांची कल्पना असूनही प्रश्न विचारत होती. डनेलमधलाच रणजीत वकिल झाला होता. तोही तावातावाने मूद्दे मांडत होता. गावात पुन्हा रोहयोची कामं होणं आता अवघड आहे हे माहित असूनही रामसिंग बोलत होता कारण ते सगळं सहन करून शांत बसणं त्यांना शक्यच नव्हतं.
शासनाकडून रोहयोच्या अंमलबजावणीची अपेक्षा करण्यापेक्षा गावातच रोजगार निर्मिती करून या व्यवस्थेला पर्याय उभा करणं मलाही पटत होतं. पण त्या परिस्थीतीत विरोध करणं गरजेच होतं.
डोकं भंजाळून टाकणारी ही परिस्थिती. नर्मदेवरचं ते धरण, त्यासाठी झालेलं आंदोलन सगळं डोळ्यापुढून सरकत होतं. नर्मदा बचाव आंदोलनाबद्दल ऐकून होतो. त्यामूळे त्यांच्या कामाच्या पद्धतीबद्दल खूपच उत्सुकता होती.


शासनाने निर्णय घ्यायचे आणि लोकांनी ते भोगायचे. मग ते धरण असो किंवा धान्यापासून मद्यनिर्मितीचा उद्योग. खरं तर त्या धरणाचे फायदे कोणाला, तर शहरातल्या लोकांना. जमीन पाणलोटाखाली आणून शेती वाढवणं हे खरं तर दूय्यम कारण. खरं कारण शहरांना पाणी आणि वीज मिळायला हवी. त्यापायी नर्मदेच्या खोर्‍यातल्या कित्येक गावांना नुकसान भोगावं लागलं. अजूनही त्याचे परिणाम ही लोकं भोगतचं आहेत.

लोकं आक्रमक का होतात, शस्त्र हातात का घेतात हे आता थोडं फार कळू शकत होतं. डनेल गावाचे सरपंच आणि उपसरपंच दोघही गैरहजर होते. कारण या भ्रष्टाचारात त्यांचेही हात बरबटलेले होते. गावातल्या लोकांना तोंड देणं त्यांना शक्य झालं नसतं.
मला हे खूप महत्वाचं वाटलं. सध्या राज्यकर्त्यांना कुठलाच धाक उरला नाहीये. बी.डी.ओ. किंवा डेप्युटी इंजीनिअर जरी पुन्हा गावात येणार नसला किंवा त्यांचा गावाशी संबंध उरणार नसला तरी सरपंच मात्र गावातलाच होता. त्याला गावातच राहायचं होतं. त्याला असा धाक बसणं हे त्या जनसुनवाईचं खरं फळ होतं.
एकीकडे जनसुनवाईतून असा संघर्ष करत राहाणं आणि दूसरीकडे रचनात्मक कामं उभी करणं दोन्ही महत्वाचं. मेधाताईंच्या प्रयत्नांनी उभ्या राहिलेल्या जीवनशाळेत शिकलेला रामसिंग आज तिथल्याच आश्रमशाळेत शिक्षक बनून लहान मूलांना शिकवतोय. गावातल्या भ्रष्टाचाराविरूद्ध बोलतोय. त्यालाही पुढे शिकायचयं पण दूर्गम भागामूळे पुढच्या शिक्षणासाठी अडचणी येताएत.
त्याच्याशी गप्पा मारताना त्याच्या स्वप्नातलं त्याचं गाव कसं असावं हेही त्याने आम्हांला सांगितलं. या दूर्गम भागात काय करता येऊ शकेल जेणेकरून शासनावर अवलंबून राहावं लागणार नाही? याची चर्चा आम्ही करत होतो. या सगळ्यातून त्याने स्वतःच मार्ग काढायला हवा हे तर खरच आहे, पण त्याला राजकीय इच्छाशक्तीची जोड मिळाली तर मार्ग नक्कीच सोपा होईल.
रामसिंगचं राहतं घर असलेला पाडा तिथून बराच दूर होता. त्याने तोही दाखवला. तिथे पोहचायला एक छोटी दरी ओलांडून जावं लागतं. त्या दरीवर मधला पूल न बांधता दोन्ही बांजूंना रस्ता बांधल्याचं या भ्रष्ट अधिकार्‍यांनी दाखवलं होतं.
या निमित्त्याने रोजगार हमी योजना जवळून पाहायला मिळाली. जॉब कार्ड, फॉर्म चार आणि पाच अशा बाबी गडचिरोलीत काम करताना काही प्रमाणात समजल्या होत्या. या ऑडीटच्या निमीत्त्याने या सगळ्याची टेक्निकल बाबी,एन.आर.ई.जी.ए.ची वेबसाईट नीट पाहायला मिळत होती. योगीनी ताई स्वतः वकील असल्याने कायद्याच्या कचाट्यात या अधिकार्‍यांना कसं अडकवता येऊ शकतं तेही कळालं.
पण केवळ शासनाशी भांडून भ्रष्टाचार बाहेर काढणं पुरेसं नाही. त्याचबरोबर जीवनशाळेसारखे उपक्रमसुद्धा राबवावे लागतात. कारण त्या गावातल्या लोकांना कामं मिळणं महत्वाचं.
आम्ही कुठल्याही प्रश्नाचं उत्तर शोधायचयं म्हणून हे ऑडीट पाहायला गेलो नव्हतो. पण संघर्ष करण्यासाठी सोशल ऑडीट हे किती प्रभावी माध्यम ठरू शकत ते जाणवलं. वेगवेगळ्या ठिकाणी अशी कामं करणार्‍य़ा योगीनी आणि गीतांजली ताईसारख्या मंडळींना एकमेकांचा किती उपयोग होतो ते समजत होतं. अगदी युनिकोड सारखं सॉफ्टवेअर इंस्टॉल करून देणं सुद्धा किती मदत करून जातं..!
आता रो.ह.यो. मधे पुढे काय करता येईल ते बघायचयं.



- सागर जोशी,
निर्माण.
sagarnjoshi@gmail.com

Friday, January 1, 2010

"धान्यापासून दारू"विषयी गाणे!

(चाल: बिलनची नागीण निघाली)

राजकारणी लोक ही माजली
(यांच्या) स्वार्थाची तुतारी वाजली
वाईट कर्माला बघा ही धजली
लोकांना दारु हो पाजली ॥ध्रु॥

कायद्याची धड माहिती नाही, जनता ही भोळी निघाली
पाहुनी हा ज्ञानाचा अंधार, मंत्र्यांनी हो पोळी भाजली
जनता ही भोळी निघाली
मंत्र्यांनी पोळी हो भाजली
काळ्या धंद्यांना बघुन यांच्या
नैतिकता सुद्धा हो लाजली ॥1॥

देत नाही धान्याला भाव, पिकांची होते नासाडी
उपाय म्हणून त्यावर आता, दारुला देती सबसिडी
म्हणे पिकांची होते नासाडी
कारखांन्यांसाठी सबसिडी
मंत्री आहेत हो हे गारुडी
जनतेला करती दारुडी ॥2॥

दारु पिऊन पिऊन रे बाबा, नाश होईल आयुष्याचा
सर्व पीकं जाईल ह्यात, धोका वाढेल भविष्याचा
नाश होईल आयुष्याचा
धोका वाढेल भविष्याचा
अन्न – पाण्याच्या दुर्भिक्ष्याचा
खाद्यान्नाच्या सुरक्षेचा ॥3॥

स्वार्थाबिना विचार नाही, राजकारणी आहेत हो वल्ली
ह्यांच्यासाठी लोकांनी सगळ्या, दारु पिऊन व्हावे टल्ली
राजकारणी आहेत हो वल्ली
दारुने व्हा म्हणती टल्ली
करी कायद्याची पायमल्ली
स्वार्थासाठी एककल्ली ॥4॥

- अमृत बंग