Sunday, May 31, 2009

मोर्चा...

मोर्चा...

काही दिवसांपूर्वी आम्ही एका मोर्चात भाग घेतला.छ्त्तीसगड शासनाने त्याच्या निषेध करण्यासठी दर सोमवारी रायपूर ला सत्त्याग्रह करण्यात येतो.6 एप्रिल च्या सत्त्याग्रहात भाग घेण्यासाठी पुण्यातून एक तुकडी जाणार होती.त्यानिमित्त्याने रॅली आणि जाहीर सभा होती.आमचा मोर्चा हा त्याचाच एक भाग होता.

संध्याकाळी 5 वजता रॅलीला सुरूवात झाली होती.त्या आधी आम्ही सगळे मुक्ता च्या घरी जमलो.आणि आम्ही लक्ष्मी रोड वर रॅली गाठली.ऊन बरच होतं.तरी रॅली मधे सत्तर ते ऐंशी लोकं होते.आम्ही देखिल चालायला आणि घोषणा द्यायला सुरूवात केली. आपण काहीतरी वेगळं आणि भन्नाट करतोय असं सारखं वाटत होतं. नुकताच ‘हजारो ख्वाहीशे ऐसी’पाहिला होता..त्याचा प्रभाव अजून कायम होता.त्यात सिद्धार्थ ची भूमिका करणारा के के मेनन असाच मोर्चात भाग घेऊन स्वतःला अटक करून घेतो.शाळेत असताना आम्ही प्रभात फेरीत जायचो.त्यानंतर कुठल्याच रॅलीत भाग घेतला नव्हता.त्यामूळे या मोर्चाबद्दल खूप एक्साईटमेंट होती.

आजपर्यंत अशा निदर्शनांबद्दल केवळ ऐकून आणि वाचून माहिती होती.प्रत्यक्ष मोर्चात भाग घेण्याचा अनुभव खरच वेगळा.सगळ्यांच्या नजरा आपल्यावर खिळून आहेत याची सतत जाणीव होत असते.रस्त्यावरचे लोक बॅनरकडे,पाट्यांकडे,त्यावरील मजकूराकडे पाहात असतात.एवढ्या ऊन्हात आरडाओरडा करत, घोषणा देत फिरण्यामागचं कारण काय आहे हे कुतूहलाने आणि गमतीने पाहात असतात.

’’लोकशाही जिंदाबाद,
हुकूमशागही मुर्दाबाद’’

म्हणत आम्ही मोठमोठ्याने घोषणा देत होतो.प्रत्येक चौकात ट्राफिक पोलीस तत्परतेने पुढे होऊन लोकांना अडवत होटल आणि मोर्चाला वाट करून देत होते.आमच्या हातातल्या पाट्या वाचून विषय समजून घेत होते.अनोळखी लोकांकडे पाहून मोठ्याने ओरडताना मजा वाटत होती.आणि आम्हां मूठभर लोकांच्या घोषणांनी छत्तीसगड शासनाला काय ढेकळं धक्के बसणारेत,असाही विचार मनात येत होता.

आपल्या सगळ्यांमधे ही खूमखूमी असतेच.अन्यायाविरूद्ध आरडाओरडा करण्याची.पण कधी निषेध करून,कधी बोलून,संतापून,फार फार तर दोन शिव्या घालून आपण शासन व्यवस्थेविरूद्ध बोलतो.पण असं जाहिरपणे रस्त्यावर मोठ्याने ओरडून निषेध व्यक्त करण्याची संधी क्वचितच मिळते.आम्ही त्या संधीचं सोनं करत होतो.लोकशाही नावाची जकाही तरी व्हर्च्युअल गोष्ट असते असं एवढे दिवस वाटायचं.मोर्चा काढून निषेध व्यक्त करता येणं हा त्याच लोकशाहीचा भाग आहे हे आता कळत होतं! घोषणा देत असताना खोट्या सौजन्यशीलतेपलीकडे जाऊन आपण ओरडतोय हे लक्षात येत होतं.मोकळं वाटत होतं.
खरं तर मोर्चातल्या लोकांच्या संख्येपेक्षा निषेध महत्वाचा.

शिव्या घालून मोकळं होण्यापेक्षा दोन पावलं चालून,थोडे कष्ट करून लोकांपर्यंत हा निषेध पोहचवला पाहिजे. असं केलं नाही तर जे काही सुरू आहे ते आम्हांला मान्य आहे असचं वाटत राहणार. या सगळ्यात एक्साईटमेंट अर्थातच होती.मोर्चा आणि घोषणा रोमांचकारी असतातच.पण नायना म्हणतात त्याप्रमाणे यातून लर्निंग काय झालं तेही तपासून पाहायला हवं.

महत्वाचं म्हणजे या निमित्त्याने डॉ.बिनायक सेन आणि त्यांचं काम वाचण्यात आलं.1980 पासून छ्त्तीसगड मधे लोक स्वतंत्रता संघटना (PUCL) नागरी हक्कांसाठी काम करते.खासगीकरणामुळे विस्थापनाला विरोध असणारय्रा आदिवासींसाठी ही संस्था काम करते.जमीन हस्तगत करण्याच्या सरकारच्या धोरणाविरूद्ध आवाज उठवणाय्रा आदिवासींना नक्षलवादी ठरवून त्यांना छत्तीसगड स्पेशल पब्लिक सेक्युरिटी ऍक्ट (CSPSA) खाली अटक करण्याच्या विरोधात डॉ.सेन यांनी सक्रिय सहभाग घेतला होता. तुरूंगातल्या नक्षलवादी नेते नारायण संन्याल यांना भेटून त्यांना पत्र लिहीण्याच्या आरोपावरून छत्तीसफगड शासनाने बिनायक सेनांवर नक्षलवाद्यांचे साथीदार असल्याचा आरोप केला आणि त्यांना अटक केली. स्पेशल सेक्युरिटी अँक्ट खाली गेल्या 22 महिन्याँपासून डॉक्टर बिनायक सेनांना तुरूंगात डांबून ठेवलं आहे.

माओवाद्यांच्या विरोधात शांततामय मार्गाने ‘सलवा जुडूम’ मोहीम सुरू आहे म्हणत शासन स्वतः च्या आर्थिक लाभासाठी त्याचा उपयोग करून घेत आहे. सलवा जुडूम ची मोहीम आणि तिचा शासनातर्फे झालेला गैरवापर याविरोधात सेन यांनी आवाज ऊठवला होता. त्यांना स्थानिक आदिवासी लोकांचा पाठिंबा होता आणि अजूनही आहे.अनेक नोबेल पुरस्कार विजेत्यांसह वैद्यकीय आणि सामाजिक क्षेत्रातील नामवंत व्यक्तींनी,सामाजिक संस्थांनी,व्रुत्तपत्रांनी डॉ.सेन यांच्या सुटकेची मागणी केली आहे.सर्वोच्च न्यालयालयानेही सलवा जुडूमला विरोध करून डॉ.सेन यांना नैतीक पाठिंबा दिला आहे.

या निमित्त्याने ‘ माओवाद ’ नेमका काय आहे,सलवा जुडूम मोहीम नेमकी काय आहे हेही वाचले.(Key Concepts in Politics: Andrew Heywood) फ्री बिनायक सेन कॅंपेन या त्यांच्या साईट वरूनही बरीच माहिती मिळाली. एखादा विषय कसा नीट पेटवता येतो हेही या निमित्त्याने लक्षात येत होतं.तिथल्या कार्यकर्त्यांच्या कामाची पद्धत लक्षपूर्वक पाहात होतो.मोर्चा,सत्याग्रह,जाहीर सभा,ग्रुहमंत्र्यांना पत्र या सगळ्या गोष्टी खूप पद्धतशीरपणे पार पाडल्या जात होत्या. मोर्चा नेण्यासाठी ताशा आणि माईक पासून ते दोन चार तगड्या आवाजाची माणसं आणि आकर्षक घोषणा देखिल लागतात हे कळालं.एवढे लोकं एकत्र जमतात आणि शिस्तीत काम करतात तेंव्हा त्यांची तयारी आणि कमिटमेंट खरच ग्रेट असणार हे जाणवत होतं. हा मोर्चा शेवटी निवारा व्रुद्धाश्रमाजवळ येऊन जाहीर सभेत विसर्जित झाला.

आपल्या निर्माण च्या मूलांना सुद्धा मोर्चा काढता यायला हवा हे डोक्यात घेऊनच आम्ही तिथून बाहेर पडलो.मोर्चा हा प्रकार आऊटडेटेड झाला असं वाटायचं.पण त्याच मोर्चाने खूप काही शिकवलं.

-सागर जोशी

No comments: