Tuesday, June 9, 2009

वाचले... so what??

निर्माण विशेषांकाची ओळख करून देणारा एक लेख लिहिण्याचं काम मी मध्यंतरी केलं. त्या निमित्तानी आपला विशेषांक अगदी नीट आणि त्यातल्या जाहिरातींसकट पुन्हा वाचला. हे काम करत असताना मला माझ्यातल्या काही त्रुटी खूप जाणवल्या. ते तुम्हाला सांगावसं वाटलं. २.२ च्या वेळी अंक हातात घेतला. चाळला.. मग त्यातले काही लेख नीट वाचले. काही राहून गेले. दत्ता काकांनी हा लेख लिहायची आयडीया देईपर्यंत मी ते राहिलेले लेख काही पुन्हा काढून वाचले नव्हते. विसरून गेले होते. किंवा त्याकडे दुर्लक्ष केलं, असं पण म्हणू शकतो आपण... लेख लिहायला घेतला आणि पवन च्या चित्रापासूनच अडायला सुरुवात झाली! त्याला फोनवर चित्राचा अर्थ विचारला आणि अंकातला इन्टरेस्ट वाढला. २.२ मधे त्यानी त्या चित्रा विषयी सांगितलं होतं खरं पण लिहायला लागल्यावर मला काही सुचेना! अंक वाचताना मला मी तो जणू काही पहिल्यांदाच वाचत आहे असं वाटलं! अंक तोच होता, मी पण तीच होते पण माझी भूमिका बदलली होती. आधी मी एक त्रयस्थ वाचक होते पण आता मात्र त्या अंकाविषयी इतरांना काही सांगू पाहणारी त्याच अंकाची आणि गटाची सभासद. आता मोघम वाचून चालणार नव्हतं ना!
लेखानिमित्त श्वेता आणि चारुताशी बोलले. त्याना हा अंक काढताना कसं सगळ्यांना ’पुश’ करावं लागलं आहे याचा अंदाज आला. मनुष्यबळ कसं कमी होतं. हा अंक निर्माणचं मुखपत्र होऊ नये यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न यांचा अंदाज आला. लेख निवडण्यामागे त्यांची काय भूमिका होती हे समजलं. या सगळ्या गोष्टींपासून मी आधी किती आलिप्त होते!कुठलेही पुस्तक वाचताना मी अशी आलिप्तच असते का? वाचन करताना पुस्तकात व्यक्त केलेल्या भावनांचा, भूमिकांचा, माहितीचा मी एक ’छापील मजकूर’ म्हणून विचार करते की त्यापलीकडेही ती पुस्तकं मला ”त्रास” देतात? हो! त्रास देतात का मला पुस्तकं? पुस्तक संपल्यावर मला किती वेळ अस्वस्थ व्हायला होतं? झालेच अस्वस्थ तर मी ते बाजूला सारून पुढे जाते की त्याची नीट शहानिशा करते? अस्वस्थ हा शब्द नकारार्थी नाही हं. एखादं आनंददायी पुस्तक मला किती काळासाठी आनंद देतं? माझ्या असं लक्षात आलं आहे की मी कित्येक वेळा पुस्तक वाचताना ’passive' असते. मी वाचते- अस्वस्थ होते- सोडून देते. ही प्रोसेस अतिशय धोकादायक आहे, नाही का? अस्वस्थतेचं काहीच प्रोसेसिंग होणार नसेल तर पुस्तक वाचून मी वेळ वाया घालवत आहे. असं दर वेळेला होत नसलं तरी हे पूर्णपणे टाळायला मला आवडेल. विचार करण्याचा actively प्रयत्न करायला लागतो. त्यातून analyse करून काही एका निर्णयाप्रत यावं लागतं, निर्णय नाही तरी निदान एक प्रोसेस सुरू व्हावी लागते. मी याचा कंटाळा करते असं मला वाटलं.. पुस्तक वाचून त्यविषयी मी कुणाला तरी काही सांगू शकले तर मलाच ते पुस्तक जास्त चांगलं समजेल. आणि ही प्रोसेस सुरू होईल, मझीच नाही, त्या ऐकणार्‍या व्यक्तीची पण!

निर्माणच्या पुढच्या अंकासाठी मी नक्की मदत करीन. वाचन जास्त अर्थपूर्ण करता यावं यासाठी मला प्रयत्न करायचे आहेत. हे मला हा लेख लिहिताना समजलं.

-मुक्ता गुंडी

No comments: