Thursday, October 14, 2010

एका हाकेवर

2 ऑक्टोबर सकाळचे साडेसहा वाजले. चार-पाच तरुण हातात विळे घेऊन हनुमान मंदिराच्या समोरील मैदानात हजर झाले. संख्येने बोटावर मोजण्याइतके असले तरी  गांधी जयंती निमित्त काहीतरी करायला हवं या प्रेरणेने ग्राम स्वच्छतेच्या कामाला लागले. भाषणबाजी पेक्षा प्रत्यक्ष कृती हवी या भावनेने मैदानात उतरले गावात येणार्‍या रस्त्याच्या दुतर्फा असणारं गांजर गवत कापायला सुरुवात केली. एक-एक तरुण या कामासाठी वाढत गेला अन ही संख्या 37 वर पोहचली. नाकाला रुमाल बांधून रस्त्यावर असलेली घाण साफ केली. महिलांनी रस्त्यावर संडासला बसू नये म्हणून रस्त्याच्या बाजूचं उंच-उंच वाढलेलं गवत कापलं. आणि महिलांसाठी संडासला बसण्यासाठी वेगळी जागा उपलब्ध करुन दिली. सर्व रस्त्याच्या कडेचं गवत, गावठाण्यातल्या रिकाम्या जागेवरच गवत तरुणांनी कापलं, आणि पाहता-पाहता तीन तासात गाव स्वच्छ झालं. काही हजार रुपये खर्च करुन ग्रामपंचायत ही स्वच्छता करायला तयार असते पण रस्त्यावर असणार्‍या घाणीमुळे कुणीही मजूर मिळत नाही. पण यावेळी मात्र कुणालाही एक रुपया न देता ही सगळी तरुण मुलं एकत्र आली आणि गाव स्वच्छ केलं. हे काम पाहून गावकर्‍यांना आश्चर्य वाटलं. नंतर गावात ग्रामसभा झाली. या सभेत महिला कुजबुजत होत्या त्यातली एक आजी म्हणाली “ बापा असं सगळ्यांनी एक व्हवून  काम केलं तर गावाचा इकास न व्हयाला काय झाल”

यासाठी आदल्या दिवशी मी मंदिरासमोर बसलेल्या मुलांना गांधी जयंती व स्वच्छता यांचं महत्व सांगितलं होतं. आणि सकाळी फक्त एक हाक मारली ‘चला स्वच्छता करुयात’. या एका हाकेवर हा चमत्कार घडला हे पाहून माझा गावावरचा विश्वास दुणावला.
-संतोष गवळे

2 comments:

BinaryBandya™ said...

मुजरा तुम्हाला अन तुमच्या गावाला ....

AMIT GONDANE said...

konitari suruvat karayachi asate ...