Wednesday, November 4, 2009

पडसाद

काल सायंकाळी मेधातांईना प्रत्यक्ष ऐकायला मिळालं. निमित्त होतं The Word’s First Anti-Dam Movement या प्राध्यापक वोरा लिखित पुस्तकावर फर्ग्युसन कॉलेजच्या राजशास्त्र विभागाने आयोजित केलेल्या चर्चेचं. ‘धरण, धरणग्रस्तांचे प्रश्न आणि त्यासंदर्भातील चळवळी काही आपल्याला नवीन नाहीत’ कार्यक्रमाच्या सुरवातीला सुहास पळशीकर सांगत होते. जगामध्ये अशा प्रकारच्या चळवळी विविध स्तरावर चालू आहेत. पण जगात प्रथमचं अशा प्रकारच्या चळवळींची सुरुवात पुण्याच्या मुळशी धरणापासून सुरु झाली. त्यापूर्वी धरणग्रस्तांच्या तक्रारी होत्या पण धरणग्रस्तांनी संघटीतरीत्या आपली राजकीय भूमिका मांडणारा लढा प्रदीर्घ काळ लढल्याची नोंद इतिहासात नाही. हा मुळशीचा लढा लढला गेला होता १९२१ ते १९२४ च्या कालवधीत टाटा उद्योगसमूहाच्या विरुद्ध. त्याचं नेतृत्व केलं होतं सेनापती बापटांनी.

या लढ्याला गांधी समुदायाने फारसा पाठिंबा दिला नव्हता, परंतु गांधीजींनी मुळशी प्रकल्पाचं समर्थनसुद्धा केलं नव्हतं. लोक़ांच्या विरुद्ध भूमी संपादन करुन असे प्रकल्प उभे करणं याला गांधीजींचा विरोध होता.

मेधाताईंनी मुळशीचा लढा, नर्मदा बचावं आंदोलन, अशा जनाआंदोलनांच स्वरूप आणि त्यांचे परिणाम याची आपल्या भाषणातून अतिशय सुंदर मांडणी केली. मुळशीच्या आंदोलनाच्या माध्यमातून जरी मावळ प्रांतातले शेतकरी जरी टाटांना या प्रकल्पापासून परावृत करु शकले नसले तरी ते आंदोलन अयशस्वी झालं असं म्हणता येणार नाही. “कोणतही जनाआंदोलन हे यशस्वी की अयशस्वी असं सरळ सरळ मोजता येत नाही.” मेधाताई सांगत होत्या. जनाआंदोलनातून समाजाला एक नवीन विचार मिळतो, तो व्यापक असतो आणि त्यातून राज्यसंस्थेची सुद्धा घडण होतं असते.

मुळशीच्या निमित्ताने काही मुद्दे समोर आले. राष्ट्रीय सुरक्षितता धोक्यात असताना किंवा राष्ट्रावर एखादी नैसर्गिक आपत्ती आली असताना राष्ट्र लोकांकडून कोणत्याही गोष्टींची मागणी करू शकते पण मुळशीच्या संदर्भात असं काहीचं नसताना सर्वसामान्य शेतकर्‍यांच्या जमिनी कशाच्या आधारावर बळकवल्या जाऊ शकतात. शेती, शेतकरी आणि त्यावर आधारलेली अर्थव्यवस्था कि धरण, उद्योगधंद्यांना लागणारी वीज, त्यातून एका विशिष्ट वर्गाला होणारा फायदा यापैकी काय महत्वाचं आहे असे प्रश्न पहिल्यांदा उपस्थित केले गेले.

मुळशी नंतर सुरु झालेल्या आणि अगदी आतापर्यंतच्या नर्मदा बचाव आंदोलनापर्यंतच्या गेल्या काही वर्षातील चळवळींकडे पाहता, धरणग्रस्तांनी व त्यासंदर्भात काम करणार्‍या चळवळींनी फक्त आमच्या पुनर्वसनाचे काय? हा एकमेव प्रश्न उपस्थित केला नाही तर अर्थशास्त्राच्या दृष्टीकोनातून धरणं खरीच “फायद्याची” ठरत आहेत का? धरणांमुळे दुष्काळाचा प्रश्न खरचं सुटतो का?. पर्यावरणाच्या दृष्टीने धरणांचं स्थान काय? इथून ते विकासाची खरी व्याख्या काय असावी? विकासाचं नवं ‘मॉडेल’ कसं असावं? विकास प्रक्रियेत लोकसहभाग किती व कसा असावा? सामाजिक संपात्तिचा वापर, पुनर्वापर व त्याच न्याय पद्धतीने समवाटप कस असावं? ते पैशाच्या बळावर वाढलेल्या नैसर्गिक साधनसंपत्तीच्या बेसुमार वापर करुन रुजू पाहणार्‍या उपभोग्तावादावर नियंत्रण असावे का? असे मूलभूत प्रश्न उपस्थित केले. या चळवळींनी यापैकी काही प्रश्नांवर अभ्यास केला आणि विकासाचे पर्यायी मार्गसुद्धा काही बाबतीत सुचवले. या पुस्तक चर्चेच्या निमित्ताने मेधाताईंनी या मुद्यांवर त्यांच्या ‘खास’ शैलीत विस्तृतपणे बोलल्या.

असं असतानादेखिल नंदीग्राम, सिंगुर, एसईझेड हे प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न आजही तितकेच तीव्रतेने आपल्यासमोर आहेत. माओवाद्यांचे प्रश्न जे अप्रत्यक्षपणे या प्रश्नांशी निगडीत आहेत. वेगवेगळ्या उद्देशांसाठी, वेगळ्या मार्गांनी होणार्‍या भूसंपादनातून निर्माण होणारे प्रश्न. हे प्रश्न आजही पुरेश्या सहृदयतेने हाताळले जात नाहीत. हे कदाचित उद्योजकांचे वाढते प्रस्थ, नोकरशाही आणि स्वार्थी राजकारणी यांमुळे घडत असावं. अशा परिस्थितीत सर्वसामान्य जनतेचा या प्रश्नांमध्ये सहभाग व त्यांची कृती अधिक महत्त्वाची आहे याची जाणीव झाली.

या महिन्याच्या सुरवातीला उल्का महाजन आणि सर्वहारा जनआंदोलनाची कामे पाहिल्यानंतर, गेल्या आठवड्याभरात बीटी वांग्याबद्दल झालेली चर्चा व त्याला विविध माध्यमातून व स्तरातून जनतेने केलेला विरोध बघितल्यानंतर जनाआंदोलनाचं महत्त्व पुन्हा एकदा माझ्या प्रत्ययास आलं.

खरं काय हे एकदा माहीत झाल्यानंतर आणि ते सरळ सरळ विवेकबुद्धिला पटत असताना देखिल काही विशिष्ट गटाच्या/ वर्गाच्या हितसंबधापोटी जर त्या गोष्टी प्रत्यक्षात येत नसतील तर अशावेळी सर्वसामांन्याची भूमिका महत्त्वाची ठरते. निवडणुकांव्यतिरीक्त ‘आम’ जनतेला विविध मुद्द्यांवर आपली मतं दखल घेतली जातील अशा पद्धतीने मांडण्यासाठी व व्यक्तिगत वा लहान गटांमधून कृती करता येईल अशी व्यासपीठं किंवा संधी उपलब्ध करून देण्याची गरज आहे. त्याचे नवनवीन मार्ग शोधण्याची गरज आहे.

असं घडून आल्यानंतरच विवेक सावंत यांनी सांगितल्याप्रमाणे बदल घडून येण्याच्या प्रक्रियेतील ज्या Information, Interaction, Transaction आणि Transformation या चार पायर्‍या आहेत, त्यातील Interaction आणि Transaction या पायर्‍यांना गती मिळेल.


-सचिन

1 comment:

Priyadarshan Sahasrabuddhe said...

लोकशाही प्रक्रियेत मतदाना व्यतिरीक्त कसे सहभागी व्हायचे? याचा नीटच शोध घेतला पाहिजे. नाहीतर निवडून दिलेली हुकूमशाही होते.

RTI, blogs, विकी, twitter... (हे twitter आजून गूढच आहे) तरीही... यांचा या उद्देशानी उपयोग करूयात.