Monday, November 2, 2009

लहानपण देगा देवा


रात्री दहाच्या सुमारास अर्पिताला फोन केला. अनेक दिवसांनी तिच्याशी बोलत होतो. सहज बोलता बोलता जीवनाच्या निरर्थकतेविषया बोलणे चालू झाले. नुकतेच माझ्या आजीशी बोलत असताना मी तिला विचारलं की हे शरीर जर निरर्थक असेल, आत्मा जुन्या कपड्यांसारखा जर ते बदलत असेल तर मग लागतेच कशाला शरीर. आपण सर्व आत्मेच का नसतो? तेव्हा तिनी मला शंकराचा-यांची गोष्ट सांगितली. शंकराचार्य या भौतिक जगाला माया म्हणत. एकदा रस्त्यातून जात असता त्यांच्या मागे एक हत्ती लागला. तो जवळ आला अन् शंकराचार्यांनी धूम ठोकली. हे बघत असलेल्या त्यांच्या मित्रानी त्यांना बरोबर विचारले की हा हत्ती जर माया असेल तर मग तुम्ही का पळालात. तेव्हा शंकराचार्य म्हणाले, की हा हत्ती माया आहेच आणि मी पळालो ती देखील माया होती. अर्पिता आणि मी पाच एक मिनिटे फोन वर हसत होतो. कितीतरी दिवसांनी मी इतका हसलो.

आता झोपावे अशा विचारात होतो आणि जवळच्या मार्केटयार्ड मधल्या गणपती मंदिरातून भजनाचे स्वर आले. घरापासून या मंदिराचे हवेतील अंतर अंदाजे 500 मीटर असेल. मंदिराच्या वरच्या भागात 4 भोंगे लावले आहेत. तिथून थेट आवाज आमच्या सोसायटीत येतो. घरात जो आवाज येतो त्याचा त्रास होतो. हे गाणे अनेकदा बेसूर असते. शब्द तर समजत नाहीतच. तेव्हा रात्रीचे 10:30 वाजले होते. पहिल्यांदा 100 वर फोन केला. नेहमीप्रमाणेच गाडी पाठवतो असे उत्तर मिळाले. गाडी जाणार नाही हे अनुभवातून माहित होते. तरीही फोने केलाच पाहिजे, किमान त्याची नोंद तरी होते या विचाराने मी नेहमी 100 वर फोन करतो.

खाली उतरलो आणि माझी आत्या, शांति आत्या अपेक्षेप्रमाणे त्रस्त होतीच. तिल म्हटलो की आपण जऊन बघू. तिथे पोचल्यावर अपेक्षित चित्र दिसले. काही लोक मंदिरात भजन करत होते. त्या व्यतीरिक्त इतर कोणीही तिथे ऐकायला नव्हते. बाहेर काही लोकांशी बोलायला सुरुवात केली. बोलता बोलता नहेमीच येतात ते वाद प्रत्यवाद चालू झाले. मस्जिदीतून बांग येते ती मात्र तुम्हाला चालते. हिंदू धर्माचे मात्र चालत नाही. ते तुम्ही थांबवून दाखवा मग आमी हे थांबवतो. आता विचार करतो ते गांधींचे 'An eye for an eye makes the whole world blind' आठवते. अम्हाला मंदिरातूनच दोन लोकांचे नंबर मिळाले होते, त्यापैकी मोहोळ सर यांना फोन लावला. यांच्याशी मी आधीही बोललो आहे. मोहोळ सर हे आमचे नेहमी शांत पणे ऐकून घेतात. त्यांच्यावरच सगळा राग काढायला सुरुवात केली. ऐकतायत तर घ्या ओरडून. त्यांच्याशी बोलत असता समजले की त्यांच्या हातातही काही नाही. मग तो प्रयत्न सोडून दिला. बरेच वाद घालून झाल्यावर त्यांनी माइक काढला. भजन चालूच होते आणि भजन चालू असण्याबद्दल आमचा काहीच आक्षेप नव्हता. ते माइक लावून लाऊडस्पीकर वर प्रक्षेपित करण्याबद्दल आक्षेप होता. तरीही मी आणि आत्या समोरच्या पार-यांवर बसलो. मी आत्याला विचारले की त्यांनी माइक तर बंद केलाय आता आपण इथे का बसतोय. आत्या म्हणाली निषेध म्हणून. मग काही लोक म्हणाले की इथे     पाय-यांवर नका बसू, आत जावून बसा. मग आम्ही आत गेलो.

या सर्वात माझ्या हृदयाची गती वाढली होती. कशामुळे कुणासठावूक. इतक्या लोकांसमोर वाद घालण्याचा हा तसा पहिलाच अनुभव होता. मध्ये एकानी माझा हात धरून ढकलले ही होते. कदाचित भितीही वाटत असेल. तेवढ्यात कोणी येऊन चला चला भजन सुरू करा असे सांगितले. त्या भजन मंडळीला वाटले की मलाच गायचे आहे. मला फार मोह होत होता गायचा. विठ्ठलाचे भजन. मी आत्याकडे बघितले, ती म्हटली नाही गाता येत असे सांग. शांतपणे डोळे मिटळे, मांडी घातली आणि त्यांनी भजन सुरू केले.



लहानपण देगा देवा । मुंगी साखरेचा रवा ॥१॥
ऐरावत रत्न थोर । त्यासी अंकुशाचा मार ॥२॥
जया अंगी मोठेपण । तया यातना कठीण ॥३॥
तुका म्हणे बरवे जाण । व्हावे लहानाहून लहान ॥४॥
महापूरे झाडे जाती । तेथे लव्हाळ वाचती ॥५॥



आत्मीयतेने आणि भक्तीभावाने गात होते. मनापासून. 

ऐकून शांत वाटायला लागले. हृदयाची गती परत स्थिरावली. घरी परतून आधी मोहोळ सरांना फोन लावला. घडलेल्या प्रसंगाबद्दल सांगितले. रागाच्या भरात काही उलट सुलट बोललो असेन तर क्षमा मागितली. त्यांनीही आम्हाला रोज त्रास होतो याबद्दल दिलगिरी व्यक्त केली. पण त्यांचेही तिथे काही चालत नाही हे यावरून जाणवले.   दुस-याला समजून घेणे, जरा आवाज चढवला की ऐकून घेणे ही सज्जनाची लक्षणे त्यांच्यातही होती. आम्ही दोघेही एकाच बोटीत होतो.

दुस-या दिवशीही सकाळी 5:30 वाजता काकड आरती चालू झाली. सकाळी योगासन अभ्यासासाठी उठणे हे फार कठीण. पण उठल्या उठल्या या भजनांचे स्वर पडले की असे काही तरी वाटते की परत झोपच येत नाही. कधी विचार येतो की बरंच आहे. त्यानिमित्तानी रोज उठीन तरी. आणि योगासन वर्गात गेलो की सुटलो. आवाजही नाही आणि योगअभ्यासही होतो. दुहेरी लाभ. अडचणीचे रूपांतर संधीत. उठून 5.45 च्या सुमारास परत 100 वर फोन लावला. त्या व्यक्तीशी गप्पा मारल्या. की हा त्रास रोज होतो पण तुम्ही काहीच का करत नाही. त्यांनी सांगितले की पोलिस जाऊन येतात. थोडा वेळ आवाज बंद होतो पण मग परत सुरू होतो. अनेकदा वरून दबाव येतो. याची मला अपेक्षाच नव्हती. आता काय करणार?

काहीच सुचेना. येवून तंबोरा लावला आणि चादर डोक्यावर घेऊन परत झोपलो. योगासन वर्ग गेला खड्ड्यात.

आता हळू हळू समजते, मोठ्या माणसांमध्ये इतका निराशेचा सूर का असतो ते. बाबा नेहमी मला सांगतात, की कायदा कडक केल्याशिवाय  काहीच होणार नाही. डॉ राणी व अभय बंग यांच्या निर्माण उपक्रमात आम्ही विद्यार्थी आहोत. काही वेगळे करूयात, आपल्याभोवतालच्या परीस्थितीत काही चांगला बदल घडवण्यासाठी योगदान देत आपले आयुष्य जगूयात असे स्वप्न बघतो आहोत. आणि अशा लहानशाच प्रसंगातून परीस्थितीचे असे काही निराश विश्वरूप दर्शन घडते की काही समजेनासे होते. (विश्वरूप दर्शन वगैरे सगळे गीता थोडी थोडी वाचायला लागलोय म्हणून). क्षूद्रपणाची जाणीवच नाही तर सिद्धी होते, लहानपण मागावे लागत नाही.

अचानक, आधी वाचलेले गांधीजी थोडे थोडे समजत आहेत. अहिंसेचा स्वीकार करून इंग्रजांचा मारा सहन करणा-यांच्या जिद्दीचा अर्थ समजत आहे. अंधळ्या माणसाला रंग म्हणजे काय हे जसे समजू शकत नाही तसे या कल्पनांबद्दल मी आंधळाच होतो. 



दलाई लामा आणि तिबेट बद्दल कुंडुन नावाचा चित्रपट बघितला. त्यात तिबेट वर चीननी केलेक्या आक्रमणाचे वर्णन आहे. द्लाई लामांना तिबेट सोडून भारतात यावे लागले. 1959 सालापासून यांचा संघर्ष अहिंसक मार्गाने चालू आहे. कार्यरत पुस्तकात कर्नाटकातील चळवळीबद्दल लिहिले आहे. तिथे एका फॅक्टरीमुळे नदी आणि हवेचे प्रदूषण झालेले आहे. प्रत्येक श्वासागणिक लोकांना त्रास होतो आहे. इतर कितीतरी लोकांचे केवढे तरी तीव्र प्रश्न आहेत आणि आपण या छोट्याश्या त्रासाला का एवढे महत्त्व देतो. पण यावर एकच उत्तर सापडले आहे. की मोठा प्रश्न सोडवण्याचे सामर्थ्य काही आपल्यात नाही. जे आपल्या आवाक्यात आहे ते तरी करावे. 

सकाळी परत मंदिरात गेलो. मोहोळ सरांना भेटलो. सकाळपासून चाललेली आरती संपली होती व भोजन चालू होते. मोहोळ सर लोकांना वाढण्यात मग्न होते. गणेश घुले हे तिकडचे अध्यक्ष यांच्याशी बोलायचा प्रयत्न केला. त्यांच्या म्हणण्यानुसार या मुळे धर्माचा प्रसार होतो. मला विचारले की धर्माच्या प्रसारासाठी मी काय करतो? मग त्यांनी त्यांच्या नेत्यांशी बोलायला सांगितले. प्रवीण चोरबेले. त्यांना समजवायचा प्रयत्न केला की आमचे घर लांब आहे तरीही तिथे थेट आवाज येतो. त्यांनी सांगितले, की तुम्ही दारे खिडक्या बंद करून बसा. कानात कापूस घालून बसा. आणि परत इथे येऊन त्रास देऊ नका. तुमच्या विरुद्ध पोलिस कम्पेंट करू. मग माझे नाव आणि फोन नं लिहून घेतला. मी ही त्यांचे नाव आणि फोन लिहून घेतला. आता काय करायचे याचा विचार चालू आहे. तुम्हाला काही सुचतेय?

-प्रियदर्शन 


12 comments:

siddhya said...

hehee. i think 'tyacha maan vaLavNe' is your best shoot. confrontation, as you mostly know, will lead you nowhere. see if you can somehow pull him to an intellectual level and reason with him, not about shutting the speaker off, but about hindu religion, geeta and perhaps gandhi's eye for an eye philosophy ;)

N said...
This comment has been removed by the author.
N said...

I am ready to provide any kind of possible help against noise pollution.
I feel that judiciary is the least rotten pillar of the democracy and we need to file court cases against them.

Here are my counterarguments to the arguments offered by the noise makers:
1
Noisemakers: Stop noise from mosques.
Me: No mosque noise reaches my home. Nevertheless I am ready to co-sign your police complaints.

2
Noisemakers: We have right to propagate our religion.
Me: (a) It is subject to my right to dignity. To spend sleepless nights is undignified. (b) I have right to spread rationalism. Just like you try to spread religion by noise, I believe that rationalism spreads by silence. Your noise is hampering my right to spread my rationalism. Go figure!

N said...

As an aside, Ganesh Ghule is mentioned in a 6 year old news.

Priyadarshan Sahasrabuddhe said...

मंडळी,

एक प्रयत्न करून बघत आहे. जवळ पासच्या लोकांना भेटतोय. किती लोकांना त्रास होतो ते मोजतो. प्रत्येकाला छोटी कृती कशी करता येईल ते शोधतो.
पुढच्या वेळेस आवाज आला की सगळे 100 ला फोन करू.

Ashish Malshe said...

Second thought: I think a beginner like us must start his/her social activities with some constructive work instead of any confrontation with people. The people with whom you are in conflict are not criminals or selfish businessmen or indifferent govt. officials. They may not be intentionally creating nuisance to disturb or trouble you for their vested interests. They are just common men unaware or you may call illiterate in terms of social behavior.
As a beginner I must find any constructive work / service by which people around me will trust me and my intentions. As and when I will get a reputation as an honest activist among a few people around me, I will easily get their support to handle such matters. Take the example of Anna Hajare. He had exert himself to setup an ideal village in Ralegan-siddhi and then started his movement against corruption.

Ashish Malshe said...

In my previous comment, I assumed that you are a beginner as a social activist. If this is not the case, as a first step, you can take signatures of all the 'Bhajan-grast' people on a letter and send it to the concerned authorities of temple and nearby police station.

N said...

The people we have to deal with do have shady backgrounds, unlike suggested by Ashish Malshe. Some of them are also businessmen or in govt.

Also, I don't like the idea that only a reputed social worker should fight. Even a noob common man has LEGAL rights.

Safe levels of noise pollution are not decided by a popularity contest. So we do not have to find out how many neighbors wish to co-operate. Police are legally bound even if a single person files FIR.

Dk said...

hmmm upaay kaay? te nakki mahit naahi pan may be roj sakalee / raatree jamel tase devlaat jaaun tya lokaanshee vaad n ghaalta!!! deva/devi samor "praarthna" karne as kelywar kadhi na kadhi taree te lok vichartil ki tu kaay kartoys etc. tar tenvha saangne ki mi devajavl tumhala maaf karaav ashii prarthna kartoy! see i know this is not the solution! i am ready to help u in any way i can je aata suchle te lihiley :)

Abhishek Ashtekar said...

hi Priyadarshan,

Aaplya area madhye aahech haa traas. Malaa suddha 2 velaa similar anubhav aala hota Engg. la asataana.
1) Nisarga Mangal aani Sant Namdeo shaalet lagnaachya diwashi faar joraaney gaani laaavtaat. Mee aaplyaa yetheel corporator chya ghari gelo. Tyaanchya bahininey malaa tyaanchya Bibwewaditlya flat war jaun abhyaas kar, atta chavi dete, asey sangitley.
2) Ratri 11 wajun gele tari Nisarga Mangal madheel gaani chaalu hotee. Police station laa kalavle pan kahi aawaj thamblaa naahee. Shevti amche Baba tikdey gele. Marriage party she namrapaney bolaley. Tey mhanaaley, karto karto banda, Kaka pan nidaan IceCream tar khaavun jaa !!!

Aso....Me sadhyaa tikde naahi aahe. Pan aalo ki nakki joraat chalval karu.

Abhishek Ashtekar

Priyadarshan Sahasrabuddhe said...

@ आशिष
अरे.. या बद्दल विचार केला. कुठल्या कामापासून सुरुवात करावी? कोणता प्रश्न निवडावा. एक विचार असा आहे की हा त्रास तसा फार मोठा नाही. मग याला किती महत्त्व द्यावे...

करून बघितल्यावरच कळेल... :)

@ अभिषेक
नुकताच मी निसर्ग वरून चालत येत असताना याची अनुभुती झाली. तुझा अनुभव वाचून जाणवले की कार्यालये हे ही अनेक लोकांना त्रासाचे प्रकरण बनले आहे. आमच्या सोसायटीच्या मागेच तलेरा गार्डन आहे. त्यामुळे बिस्मिल्ला खाँ ची शेहनाई सारखीच ऐकायला मिळते. असे कार्यालय ग्रस्त आणि इतर लाउडस्पीकर ग्रस्त आपण एकत्र कसे यायचे? सह्या करणे, पत्रे, इ. पारंपारिक पद्धती वापरूच. पण या नवीन तंत्रज्ञानाचा उत्तम उपयोग कसा करता येईल एकत्र येण्यास?

Anonymous said...

मलाही हाच प्रश्न पडला आहे. पण अडचण वैयक्तिक आहे. आणि त्याचे ग्लोबल सोलूषन आहे हे आता कळते आहे जे कि खूपच अवघड आहे.

मी होस्टेल मध्ये राहते. रूम मेट रात्री १२-१-२ वाजेपर्यंत फोन वर बोलत राहते. घर मालकांना सांगितले तर ते म्हणतात इतके कडक नियम केल्यावर आमच्याकडे कुणी राहायला येणार नाही.
मी तिचे मन वळवू शकत नाही कारण २ महिन्यापूर्वीच मी तिच्याशी बोलणे सोडले आणि तिथेच मी चुकले - आपण चुकतो असे आता वाटते आहे.

मी व्यायामासाठी रोज पाहते ५ ला उठते. मी नवीन ह्या रूम मध्ये राहायला आल्यावर तिलाही उठवायचे. (तीच्याशी मैत्री व्यावी म्हणून नाही तर एका रूम मध्ये राहतोय तर गोडीगुलाबीने राहावे म्हणून. ती भ्रष्टाचारी, स्वार्थी, आळशी आहे हे मी ओळखले होते. संबध चांगले व्हावेत , राहावेत म्हणून मी २ ३ महिने वेगवेगळ्या प्रकारे पुढाकार घेत राहिले.) साधारण १ महिना तीला मी उठवायचे, व्यायामाच्या आधी नंतर काय खा काय नको ते सांगायचे. ती तिच्या कामाच तेवढ ऐकून घ्यायची बाकी फक्त माझी टर उडवायची मला टोमणे मारायची. २ ३ महिने सहन केल्यावर मी बोलणे तोडले.

आता असे वाटते कि जर मी तसेच प्रेमाने वागत गेले असते तिला पाहते ५ ला उठवत गेले असते तर तिला आत्तापर्यंत रात्री लवकर झोपायची सवय लागून गेली असती आणि तिच्या या उशिरापर्यंत फोन वर बोलण्यामुळे माझी झोपमोड झाली नसती. तिचे आरोग्य पर्यायाने तिचे विचार चांगले झाले असते(!?).

तर प्रेम हाच अंतिम उपाय आहे का? समोरचा वाईटच वागत असताना आपण चांगलेच वागत राहायचे हा स्वतहा वर अन्याय नाही का? का मी दुसरी मुलगी कशी असेल ह्या भीतीने सिंगल रूम मध्ये एकटे एकटे राहत जायचे?