Monday, November 9, 2009

Ecofest 09


7 आणि 8 नोव्हेंबर 2009 ला काही उत्कृष्ट लघु चित्रपट बघण्याची संधी मिळाली. फोलिएज या संस्थेनी आयोजित केलेल्या इकोफेस्ट या पर्यावरण विषयक लघु चित्रपट स्पर्धे निमित्त.
Do You… ?
मोजून 59 सेकंदांचा हा अनुभव. सहज आपल्याला कृतीशील होण्यास उद्युक्त करणारा. जे कळतंय ते वळण्यासाठी काय करायचे असा नेहमीच प्रश्न पडतो. पर्यावरणाच्या अवाढव्य अशा प्रश्ना बद्दल आपल्याला आता माहिती आहे, सगळं कळत आहे पण तरीही वळत नाहिए. तर हे कळल्यापासून कृतीपर्यंत नेण्य़ासाठीचा एक मार्ग या चित्रपटामुळे शिकलो. आणि तो म्हणजे अगदी सहज पणे आपल्याला हृदयाला साद घालणारे भावनिक आव्हान. याला आपले हृदय प्रतिसाद देते आणि आपल्या बुद्धीला, आळसाला आणि प्रश्नाच्या भव्यतेमुळे आलेल्या अगतिकतेला बाजूला सारून मी काहीतरी करणार, मला जे येतं त्यापासून सुरुवात करणार इथपर्यंत पोहोचवते. केवढी ताकत आहे आपल्याच हृदयात.
संयोग मोहिते यांनी केलेल्या या लघु चित्रपटाला पहिले बक्षीस मिळाले.
Vanishing Vultures
तीन दशकांपूर्वी अंदाजे 8.5 कोटी गिधाडे भारतात होती. आता केवळ 3 ते 4 हजार एवढीच यांची संख्या आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात यांची घट कशी काय झाली याबद्दल सांगणारा हा चित्रपट. 2002 साली पेरिग्राइन ट्रस्ट या संस्थेला पाकिस्तानात संशोधन करत असता असे समजले की याचे कारण डायक्लोफिनॅक (diclofenac) हे रसायन. याचा anti-inflammatory परिणाम जनावरांच्या उपचारासाठी मोठ्या प्रमाणात केला जातो. अशा जनावराच्या मृत्यु नंतर जर गिधाडांनी याचे भक्षण केले तर त्यामुळे विसेरल गौट (visceral gout) तयार होऊन गिधाड मरण पावते.
2006 मध्ये भारत सरकार ने निर्णय घेतला की जनावरांसाठी वापर करण्यासाठी डायक्लोफिनॅकचा वापर बंद व्हावा. यासाठी पर्याय म्हणून मेलॉक्सिकॅम (meloxicam) नावाचे रसायन वापरले जाऊ शकते. याच बरोबर गिधाडांची संख्या वाढवण्यासाठी केंद्रे स्थापन करण्यात येत आहेत. याची अम्मलबजावणी कशी होते यावर आता गिधाडांचे भवितव्य अवलंबून आहे.
एका रसायनामुळे एक अख्खी प्राणीजातच नष्ट होऊ शकते हे भीषण वास्तव आहे. या बाबतीत आपण त्याचा थेट संबंध लावू शकलो म्हणून त्यावर मार्ग सापडला. अशी किती रसायने आपण वापरतो आणि त्यामुळे कोणत्या प्राण्यावर काय काय परिणाम होत असतील कोणास ठाऊक. सध्या बीटी वांग या विषयावर चर्चा चालू आहे. अशा नवनवीन तंत्रज्ञानाचा कशावर कसा परिणाम होईल कोणास ठाऊक? नवीन तंत्रज्ञान कधी आणि कसे स्वीकारायचे हे आजच्या जगासमोरचे कठीण आव्हान आहे.
The Ridley’s Last Stand
ओरिसा मध्ये बंदर बांधण्याविरुद्ध इमेल पेटिशन कदाचित तुम्हाला आले असेल. मलाही आले होते. टाटांच्या या प्रकल्पामुळे रिडली कासवांना धोका आहे एवढेच माहिती होते. पण त्या कासवांची कहाणी कुठे माहित होती.
ओरिसा च्या सागर किना-यावर दर वर्षी एक चमत्कार घडतो. दूर श्रीलंकेच्या दक्षिण भागातून हजारोच्या संख्येनी रिडली कासवे हजरो कोलोमिटरचा प्रवास करत येतात. पाण्यामध्येच मेटिंग करून मादी जमीनीवर अंडी घालायला येते. अंडी घालून निघून जाते. काही दिवसांनी लाखो कासवे अंड्यातून बाहेर येतात आणि पाण्याच्या दिशेनी चालत जातात. मादी अंडी घालताना चे चित्रिकरण शेखर दत्तात्रे यांनी केले आहे. अंड्यातून बाहेर आल्यावर या लहान लहान कासवांच्या सागरात बसून या नैसर्गिक चमत्काराचेही चित्रीकरण फार सुंदर आहे. एक सागर दुस-या सागराला जाऊन भिडतो आहे असा भास होतो.
परंतु मासेमारीमुळे कासवांचे भवितव्य धोक्यात येत आहे. मोठ्या जाळ्याचा उपयोग केल्यामुळे त्यात कासवेही अडकतात व मरण पावतात. Turtle Excluder Device (TED) या उपकरणाचा उपयोग जाळ्यात केला तर कासवे यातून सुटू शकतात. कासवासोबत 5 टक्के माशांनाही सुटका मिळते. परंतु या 5 टक्के तोटाही सहन करण्याची कंत्राटदारांची तयारी नाही. या प्रश्नाचे इतरही पैलू आहेत. जसे की किना-यावार केलेली कॅशुरीना ची लागवड. किनार्‍याचा परिसर जर सपाट नसेल आणि त्यात छोटे आडथळे जरी असले तरी नुकत्याच जन्म झालेल्या कासवांना ते ओलांडून सागरापर्यंत पोहोचता येत नाही. जवळच्या परिसरात दिवे असतील तर पिल्ले दिव्याच्या दिशेनी जातात आणि पाण्यापर्यंत न पोहोचल्यामुळे मरून जातात.
हा प्रश्न सोडवण्यासाठी देखील अनेक नियम बनवले गेले आहेत. पण अम्मलबजावणीतच सगळं गाडं आडतं.
Shores of Silence – Whale Sharks in India
गुजरातच्या किनार्‍यावर व्हेल शार्क हा मासा वर्षातील काही काळ येतो. हा विशाल मासा 35 फूट लांबी पर्यंत वाढू शकतो. एवढा मोठा मासा पण छोटे छोटे प्लँक्टन मासे खाऊन जगतो. या माशाच्या लिव्हर पासून जे तेल मिळते त्याची बाजारात विक्री केली जाते. परदेशात हा मासा खाण्यातही वापरला जातो.
यात सर्वात क्लेशकारक असा प्रसंग म्हणजे या माशाची शिकार करण्याची पद्धत. यासाठी फारच साधी उपकरणे वापरली जातात. एक दोरी, एक आकडा (हुक) आणि दोन हवाबंद प्लॅस्टिक्ची पिंप. हे मासे वरच्या भागत असतात आणि सहज दिसतात. वरच्या थरातल्या गरम पाण्यात आणि उन्हात न्हात बसलेले असतात. मासा दिसला की आधी आकडी टोचतात. आकडीला दोरीनी दोन पिंप लावलेली असतात. आकडी लागताच मासा घाबरून खोल जातो. पण हवाबंद पिंप त्याला सतत वर खेचत राहतात. शेवटी थकून मासा वर येतो. मग त्याच्या शेपटीला दोरीनी बांधून किनार्‍यावर ओढून आणतात आणि मरेपर्यंत वाट बघतात.
हा लघुचित्रपट बनवण्यासाठी या प्रश्नाच्या विविध पैलूंचा माइक पांडे यांनी अभ्यास केला आहे. स्थानिक लोकांसोबत शिकारीला जाऊन, पॅट्रोल बोटीत कोस्ट गार्डच्या लोकांसोबत, मासा मारल्यानंतरची प्रक्रिया, लिव्हर पासून तेल बनवण्याची प्रक्रिया या सर्वाचे चित्रिकरण केले आहे.
2001 साली व्हेल शार्क च्या शिकारीवर बंदी आली. यामुळे रोजगार गमावलेल्यांना हेच व्हेल मासे दाखवून पर्यटनानून रोजगार मिळवून देण्याचे प्रयत्न चालू आहेत असे नेट वरून समजले.
आयोजना बद्दल
फोलिएज च्या आयोजनही उत्तम होते. कार्यक्रम वेळेत सुरू झाला. मुळात अशा प्रकारची स्पर्धा आयोजित करणे हीच एक उत्तम कल्पना आहे. पर्यावरणाबद्दल काम करत याची व्यवहारीक बाजू कशी सांभाळतात हे समजून घ्यावे लागेल. स्पर्धेतील चित्रपटांची सीडी बनवून ती कागदाच्या पिशवीत सर्वांना दिली. कार्यक्रमादरम्यान चहा कॉफी नव्हती :) त्यामुळेही भरपूर प्लॅस्टिक कप वाचले असतील. आपल्याला कधी उगीचच चहा कॉफी प्यायची सवय लागली आहे.
पडलेले प्रश्न
1. या सर्वच प्रश्नांच्या बाबतीत असे जाणवले की पर्यावराबद्दल जागृत असलेले लोक भरपूर प्रयत्न करून, सरकार वर दबाव आणून नियम बदलून घेतात. यात भरपूर वेळ, परिश्रम घ्यावा लागतो.  त्यानंतर जी सक्त अम्मलबजावणी करावी लागते त्यावर मात्र आपले काही नियंत्रण नाही. इतर सर्वत्र जाणवते ती कमजोर कडी इथेही जाणवते.
2. पर्यावरणाच्या प्रश्नांशी जेव्हा स्थानिक लोकांचे पोट अवलंबून असते तेव्हा काय करायचे? याला पर्याय शोधावाच लागतो आणि तो सापडतोच असे नाही.
3. आपल्या जीवशैलीचा पर्यावरणाच्या हानीशी आपण थेट संबंध लावू शकत नाही आणि म्हणून मला समजतही नाही की मी काय करू. जसे की व्हेल शार्क वाचवण्यासाठी मी काय करू? या प्रश्नांशी थेट संबंध लावता आले पाहिजे.  
या निमित्तानी Wild Life संबंधित डॉक्युमेंट्री हे नवीन विश्व उघडले. त्यात किती परिश्रम घ्यावे लागतात. माइक पांडे यांनी व्हेल्स वर 3 वर्ष डॉक्युमेंट्री बनवत होते. आणखीन म्हणजे खूप लोक या विषयी संवेदनशील आहेत. हे सगळे एकत्रित कसे आणायचे या दिशेनीही प्रयत्न केले पाहिजेत.   

-प्रियदर्शन

1 comment:

Unknown said...

Priyadarshan, you are great. best wishesh to your work in Melghat with madhu, Ram and Chandu.