Friday, January 1, 2010

"धान्यापासून दारू"विषयी गाणे!

(चाल: बिलनची नागीण निघाली)

राजकारणी लोक ही माजली
(यांच्या) स्वार्थाची तुतारी वाजली
वाईट कर्माला बघा ही धजली
लोकांना दारु हो पाजली ॥ध्रु॥

कायद्याची धड माहिती नाही, जनता ही भोळी निघाली
पाहुनी हा ज्ञानाचा अंधार, मंत्र्यांनी हो पोळी भाजली
जनता ही भोळी निघाली
मंत्र्यांनी पोळी हो भाजली
काळ्या धंद्यांना बघुन यांच्या
नैतिकता सुद्धा हो लाजली ॥1॥

देत नाही धान्याला भाव, पिकांची होते नासाडी
उपाय म्हणून त्यावर आता, दारुला देती सबसिडी
म्हणे पिकांची होते नासाडी
कारखांन्यांसाठी सबसिडी
मंत्री आहेत हो हे गारुडी
जनतेला करती दारुडी ॥2॥

दारु पिऊन पिऊन रे बाबा, नाश होईल आयुष्याचा
सर्व पीकं जाईल ह्यात, धोका वाढेल भविष्याचा
नाश होईल आयुष्याचा
धोका वाढेल भविष्याचा
अन्न – पाण्याच्या दुर्भिक्ष्याचा
खाद्यान्नाच्या सुरक्षेचा ॥3॥

स्वार्थाबिना विचार नाही, राजकारणी आहेत हो वल्ली
ह्यांच्यासाठी लोकांनी सगळ्या, दारु पिऊन व्हावे टल्ली
राजकारणी आहेत हो वल्ली
दारुने व्हा म्हणती टल्ली
करी कायद्याची पायमल्ली
स्वार्थासाठी एककल्ली ॥4॥

- अमृत बंग

No comments: