Monday, January 18, 2010

कुमार निर्माण निमित्त


कुमार निर्माणचे गडचिरोली मधे पायलट टेस्टिंग करायचे आहे असं कळल्यापासून मी आणि अमृत बरेच उत्साहात होतो. आम्ही आठवड्यातले 2-3 दिवस बसून कुमार निर्माणच्या तयार केलेल्या पुस्तकामधल्या गोष्टी वाचून काढत होतो. त्यावर चर्चा करत होतो. त्याचं गडचिरोलीमधल्या शाळेत पायलट करण्यासाठी परवानगी घेऊन आलो. आणि माणसांची भाषा या गोष्टीचं वाचन करायची प्रॅक्टिस सुरू केली. त्याबरोबरच आम्ही अजून 1-2 गोष्टी लिहिता कशा येतील त्याचाही विचार केला. आणि लिहायला सुरूवात केली. पण हे सगळं बरंच हळूहळू चाललं होतं.

धान्यापासून दारू तयार करण्याच्या प्रस्तावाला विरोध कसा करायचा याचं बोलणं सुरू होतं. निर्माणींनी एक दिवसाचं लाक्षणिक उपोषणाची साखळी तयार करायची आणि निषेध नोंदवायचा असं ठरलं. तेवढ्यात आम्हाला आयडिया सुचली की आपण या ताज्या प्रश्नावर कुमार निर्माण मार्फत मुलांशी बोलू शकतो. आम्ही दोघांनी यावर एखादं छोटंसं नाट्य बसवायचं असं ठरवलं. नंतर मात्र असं जाणवलं की हे सगळं खूप कृत्रिम वाटू शकेल. मुलांपर्यंत तो प्रश्न न पोहोचता त्या नाट्यामधल्या भावना पोहोचतील. दारूड्या माणसामुळे कसा त्रास होतो; हे नाट्यरूपानी दाखवण्याची गरजच नाही कारण ही मुलं आजूबाजूला प्रत्यक्ष ते पहात आहेत. त्यांना त्यात काहीच नवीन वाटणार नाही. 9वी च्या वर्गाशी बोलताना आपण तो प्रश्न जसा आहे तसा आणि त्यांना समजेल अशा पद्धतीनं सांगावा असं आमचं ठरलं. नुसतं सांगून थांबायचं नाही तर काहीतरी कृती कार्यक्रम करायचा असंही ठरलं. हे सगळं करण्यासाठी सगळ्यात उत्तम तारीख होती 7 जानेवारी. कारण त्या दिवशी माझं उपोषण होतं. त्याच दिवशी आपण शाळेत गेलो आणि बोललो तर त्याचा जास्त परिणाम होईल असं आम्हाला वाटलं.

शाळेत 3.30 ला गेलो. तिथे शाळेच्या गच्चीत आमची बसण्याची व्यवस्था केलेली होती. आजूबाजूला छान झाडं होती. सगळी मुलं सतरंजीवर बसली होती. मुलं आणि मुली असे दोन जाणवतील असे ग्रुप होते. आम्हा दोघांसाठी 2 खुर्च्या ठेवलेल्या होत्या. गेल्या गेल्या मुलांनी आमचं टाळ्या वाजवून स्वागत केलं. आम्हाला ते खूप अनपेक्षित होतं. त्यांना आम्ही कुणीतरी ‘’पाहुणे’’ वाटत होतो! आम्ही सहजपणे जाऊन मुलांमधे बसलो आणि मुलामुलींना छान घोळका करून एकत्र बसायला सांगितलं. थोडीशी कुजबूज झाली पण मुलं आमच्या आजूबाजूला घोळका करून बसली. आम्ही ओळख करून दिली आणि त्यांना आमच्या बरोबर दिदी तेरा देवर दिवाना गाणं म्हणायला सांगितलं. मुलं आता जोशात आली होती. त्यांना थांबवून आम्ही केळझरकर काकांनी केलेलं त्याच चालीवरचं ‘’दारू पितो करतो धिंगाणा.. अरे वेड्या हिनं लुटला रे जमाना! हे गाणं गायला लागलो. मुलांना खूप मजा वाटली. धान्यापासून दारूनिर्मितीचा प्रश्न हा त्यांच्या डब्यात मिळणार्‍या भाजीच्या, पोळीच्या धान्याचा आहे, कुण्या तिसर्‍या व्यक्तीच्या आयुष्याचा नाही, हे त्यांना आधी पटवून दिलं. अमृतने त्यांना हा प्रश्न अगदी सोप्या भाषेत समजावून सांगितला. सरकार, दारूचे कारखानदार, दारू पिणारा, आणि सामान्य माणूस हे सारे जण या प्रश्नामधे गुंतलेले आहेत, हे समजावले. सगळे सांगून झाल्यावर आम्ही त्यांना विचारलं की ‘’तुम्हीच सांगा की या पूर्ण गोष्टीमधे गुन्हेगार कोण?’’ मुलांनी आपसुख बोलायला सुरूवात केली. आणि ते खूप मनापासून म्हणाले की‘’आपण सामान्य माणसं पण गुन्हेगार आहोत!’’..... आम्हाला खूप आश्चर्य वाटलं आणि कौतुकही वाटलं. त्या मुलांची प्रश्नाबाबतची समज अतिशय चांगली होती. ‘’आपण हे सगळं होऊ देतो म्हणून होतं”, असं एकजण म्हणाला. त्यांच्याच कडून मागणी आली की आपण काहीतरी केलं पाहिजे. काय करता येईल असं विचारल्यावर त्यांनी सांगितलं की ‘’आम्ही दारू प्यायला नाही पाहिजे’’‘’दुसर्‍यांना दारू पिऊ नाही दिली पाहिजे पण यापलीकडे त्यांना जाता येत नव्हतं. मग आम्ही त्यांना काही आयडिया दिल्या.

त्यादिवशी आम्ही कोर्‍या चिठठ्या घेऊन गेलो होतो. त्या आम्ही त्यांना वाट्ल्या आणि त्यावर आपल्या food to alcohol च्या वेबसाइट चा पत्ता लिहायला सांगितला. चिठ्ठ्यांच्या मागच्या बाजूला धान्य हवे! दारू नको! असं लिहिलेलं होतं. आणि त्या चिठ्ठ्या शाळा संपल्यावर चौकामधे वाटायला आणि लोकांना समजावून सांगायल्या सांगितल्या. मुलांनी ते खूप मनापासून केलं. आम्ही नंतर वर्गामधे जाऊन फळ्यावर एक चित्र काढलं. ज्वारीच्या कणसाच्या देठातून दारूचा पेग बाहेर येत आहे , असे ते होते. मुलांनी ते चित्र त्यांच्या वह्यांमधे काढले. त्यांना शाळेतल्या 7वी आणि 8वीच्या मुलांना हा प्रश्न समजावून सांगायची आयडियापण खूप आवडली. तुम्ही उपोषण करून आमच्या साखळीमधे सहभागी होऊ शकता असं सांगितलं. एका मुलीनं दुसर्‍याच दिवशी करायची तयारी दर्शवली. मुलांनी आमचे फोननंबर घेतले आहेत. पुन्हा या असं सांगितलं आहे. त्यांना अजून आम्ही कुमार निर्माण या कन्सेप्ट बद्दल फार सांगितलेलं नाही. पुढच्या खेपेला जरूर सांगू.

संपूर्ण अनुभवातून मी अमृत बर्‍याच गोष्टी शिकलो. एकतर आम्हाला हा प्रश्न ताजा असल्यामुळे आणि तो अतिशय महत्त्वाचा वाटत असल्याने खूप नैसर्गिक पद्धतीने मुलांना सांगता आला. त्यात प्रश्न समजावण्यासाठी कुठल्याही इतर माध्यमाचा आधार घ्यावा लागला नाही. परंतु मुलांशी संवाद साधण्यासाठी मात्र गाणं, विनोद, गोष्ट, चित्र अशा माध्यमांचा उपयोग झाला. मुलांमधे मुलांसारखंच होऊन गेलं, त्यांच्या छोट्या छोट्या विनोदांमधे आपण सहभागी होऊन गेलो की त्यांना आपण ‘’कुणीतरी पाहुणे न वाटता, त्यांच्यातले वाटू शकतो. आम्ही मुलांना हा प्रश्न जड वाटेल का अशी काळजी करत होतो. पण असं जाणवलं की आजूबाजूला घडणार्‍या घटनांचा ते विचार करत आहेत. कदाचित व्यक्त करत नसतील पण ते अनभिज्ञ नव्हते! त्यांना एखादी कृती करायची आहे म्हटल्यावर उत्साह आला. नाहीतरी काहीतरी बोअर लेक्चर सुरू आहे, असं वाटू शकलं असतं! काही मुलं खूप संवेदनशील होती कारण केलेल्या कृतीला नकारात्मक रिस्पॉन्स मिळाला तर त्यांना त्याचं वाईट वाटलं व त्यांनी तसं येऊन आम्हाला सांगितलं.


अजून खूप काही कराणं गरजेचं वाटतय. मुलांना परत भेटून अधिकाधिक खुलून संवाद साधायचा आहे. कुमार निर्माण अजून पायलट च्या स्टेजला आहे पण खूप उत्साह देणारं आणि अपेक्षा वाढवणारं आहे..... युवा निर्माणच्या रोपाची बीजं काळजीपूर्वक पेरायला हवीत!!  

-मुक्ता गुंडी