Friday, June 12, 2009

नसत्या इंगळ्या डसल्या नसत्या.......

दया पवार- अर्थात ’दगडू मारुती पवार’. (१९३५-१९९६). स्वत:च्या ’दगडू’ या नावापासूनच त्यांनी आपल्या अस्तित्वाचा शोध घ्यायला सुरुवात केली. ते दलित साहित्य चळवळीतले एक महत्वपूर्ण लेखक. जन्म धामणगावातला (अकोला). १०वी पर्यंतचं शिक्षण संगमनेर इथल्या शाळेत. नोकरीच्या शोधात त्यांनी मुंबई गाठली. परळ इथल्या पशुवैद्यक महाविद्यालयात त्यांनी सहाय्यक म्हणून काम पहायला सुरुवात केली आणि त्यातून मिळणाऱ्या कमाईवर आपले शिक्षण पुढे चालू ठेवले. anatomy department मधे काम करताना मेलेल्या प्राण्यांची कातडी सोलून त्यांची body preserve करण्यासाठी त्यांच्या शिरांमधे अल्कोहोलचं इंजेक्शन देण्याचं काम त्यांच्या वाट्याला आलं. एका संवेदनशील माणसाला हे काम करताना काय वेदना झाल्या असतील...

त्यांचं बलुतं हे आत्मचरित्र नुकतच वाचून झालं. ’दगडू’नं दयाला सांगितलेलं हे आत्मकथन.जणू स्वतःलाच स्वतःची जुनी ओळख दिल्यासारखं. ”आयुष्यात किमान एकाला तरी घडलेलं सगळं सांगावं” या आईनं दिलेल्या शिकवणीशी प्रामाणिक राहून घडलेलं ’सगळं’ त्यांनी सांगितलं आहे. सगळ्यात शेवट मग ’दया’नं लिहिलेलं एक मनोगत आहे. ही कथा कुण्या ’हिरो’ची नाही. यात आयुष्यात काही ’कर्तबगारी’ करून दाखवलेला कुणी ’पुढारी’सुद्धा नाही. कुठल्याही एकाच कडव्या विचारानं यात बाजी मारलेली नाही. यात एक साधं विश्लेषण आहे. आलेले अनुभव, विचारांचं उठलेलं मोहोळ, जीवनाच्या पटावर भेटलेली टोकाची माणसं.... या साऱ्या भूतकाळाकडे बघणारं एक संवेदनशील मन. स्वतःच्या झालेल्या चुकांवर पांघरूण घालायचा कुठे केविलवाणा प्रयत्न नाही. नरेंद्र जाधव यांनी ”आम्ही आन आमचा बाप” मधे जशी ग्रामीण बोली वापरली आहे तशी बलुतं मधे दया पवारांनी वापरली असती तर ते जास्त जिवंत वाटलं असतं का, असा मनात विचार आला. असो.

आश्चर्य एकाच गोष्टीचं वाटत राहतं की या माणसाचं मन इतक्या भयंकर जीवनानुभवानंतरही इतकं संवेदनशील राहिलंच कसं? दारू आणि स्पिरिट च्या व्यसनी लागलेला बाप, काबाडकष्ट करून नवरा गेल्यानंतरही मुलांना शिकवण्यासाठी कष्ट उपसणारी आई, समाजात सतत वाट्याला येणारी उपेक्षा, शिक्षणामुळे येत असलेलं सामाजिक भान पण ते व्यक्त करत असताना होणारी घालमेल, आजूबाजूच्या स्त्रियांचं हलाखीचं जिणं, लहान वयात पाहिलेले, अनुभवलेले भयंकर प्रसंग या सगळ्यात ’दगडू’ हरवला कसा नाही? किंवा तो नावाप्रमाणे ’दगड’ कसा झाला नाही?? आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर त्यांची सत्वपरीक्षा घेतली गेली जणू. त्यांच्या एका कवितेत ’चिलया’ बाळाच्या कथेचा उल्लेख येतो.

”देव एवढे का दुष्ट असतात..

चिलयाचे रक्त,मांस मागतात...?”


...... दया पवारांनी आयुष्यात कधी चिलया बाळाचे तर कधी त्या चिलया बाळाच्या आई-बापाचे अनुभव घेतले.... या कथेला आपण ”भाकड कथा” का म्हणतो?

बलुतंची पहिली edition १९७८ सालची. त्या काळातलं हे साहित्य ’विद्रोही’ म्हणावं का. खरं पाहता बलुतं ने प्रस्थापिताला धक्का दिला पण तरीही ते ’आत्मकथना’च्या पठडीत जास्त चपखल बसणारं आहे. वाट्याला आलेल्या दुःखाचं त्यात शेअरिंग आहे. दुःखाकडे ’अन्याय’ म्हणून बघण्याची त्यात द्रुष्टी दिसत असली तरी ती तितकी ’विद्रोही’ स्वरूपात व्यक्त मात्र होत नाही. ती खरी व्यक्त झाली आहे त्यांच्या ’कोंडवाडा’ या काव्यसंग्रहामधे. बलुतं च्या निमित्तानं मी कोंडवाडा सुद्धा वाचलं. यातल्या कविता दुःख आणि अन्याय या दोन्ही पातळ्यांवर व्यक्त होणाऱ्या आहेत. आंबेडकरांच्या विचारांचा प्रभाव, महार समाजाच्या उन्नतीसाठीची आतून व्यक्त होणारी तळमळ, दलित समाजाला, तरुणांना प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे केलेलं आवाहन आणि अंतर्मुख होऊन मांडलेला अनुभवांचा लेखाजोखा; हे सारं त्यांच्या कवितेतून व्यक्त होतं. कोंडवाड्यामधे आणि बलुतं मधे केवळ सामाजिक बाह्य संघर्ष नाही. यात सामाजिक संक्रमणाबरोबर आंतरिक संघर्षही आहे. शिकल्यामुळे होणारं white collar मन आणि त्यातूनच आपल्या समाजापासून तुटल्याची येणारी भावना यात वेळोवेळी व्यक्त झाली आहे.

कोंडवाडाचं मुखप्रुष्ठ बोलकं आहे. त्याचा ३/४ भाग हा दगड-विटांनी बांधलेल्या (एकही खिडकी नसलेल्या) कोंडवाड्याची भिंत आहे. त्या शेजारून एक ठिपक्याएवढा दिसणारा माणूस (ज्याचा चेहरा दिसत नाही. खांद्यावर झोळी आहे. अंगावर कपडे चांगले आहेत) चालला आहे. दया पवार यांची कविता ही त्यांच्या आयुष्याच्या कोंडवाड्यातून बाहेर पडण्यासाठी त्यांना सापडलेली पायवाट होती. त्यांनी कष्टानं घेतलेलं शिक्षण, केलेलं वाचन एका अर्थानं त्याना मोकळा श्वास घ्यायला शिकवत होतं तर कधी त्यांच्या वेदनांच्या खपल्या उघडणारं होतं. त्यांनी कोंडवाडा कवितेत म्हटलं आहे-


”कशाला झाली पुस्तकांशी ओळख? बरा ओहोळाचा गोटा..

गावची गुरे वळली असती, असल्या इंगळ्या डसल्या नसत्या..”


दया पवारांची कविता वास्तवदर्शी आहे. ”मला निसर्गात रमणं आणि त्यावर कविता करणं कधीच जमलं नाही.” असं त्यानी म्हटलं आहे. किडे-मुंग्यांकडे कौतुकानं बघण्याची त्यांची मानसिकता नव्हती. ते शक्यही नव्हतं. इथे किड्याना खायला रव्याचा दाणा मिळू शकतो पण आमच्यासारख्या माणसांना एक वेळचं खायला मिळेल याची शाश्वती नाही, हे त्यांचं वाक्यच त्यांची मनःस्थिती सांगतं. बलुतं मधे जरी त्यांनी म्हटलं असलं की ही कथा माझ्या पराभवाची आहे तरी तसं पूर्णपणे खरं नाही. ’दगडू’ ते ’दया’ हा प्रवासच मुळी त्यांच्यातला सकारात्मक बदल दाखवतो. कोंडवाडामधे त्या कोंडलेल्या जीवनातून बाहेर येऊन ते म्हणूनच आवाहन करतात-


”प्रखर तेजाने तळपणारा सूर्य केव्हाच अस्तास गेला आहे

ज्या काजव्यांचा तुम्ही जयजयकार केलात

ते केव्हाच निस्तेज झाले आहेत

आता तुम्हीच प्रकाशाचे पुंजके व्हा

अन क्रांतीचा जयजयकार करा.”
सुरक्षित जगात जगलेल्या माझ्यासारख्या मुलीला बलुतं आणि कोंडवाडा हादरवून सोडतं.......

- मुक्ता गुंडी.

No comments: