मला आठवतंय, २.२ च्या वेळी केतकर आले होते. आपण त्यांना कित्तीतरी प्रश्न विचारले होते. अपेक्षित होतं की आपण त्यांचं ’बदलते विश्व’ वाचून यावं. मी वाचलं नव्ह्तं. पुस्तकाचा काहीच भाग मी वाचून आले होते. त्यामुळे ते जी काही उदाहरणं देत होते ती मला क्लिष्ट वाटत होती. सिस्टिम विषयी ते बोलले, दहशतवादाविषयी बोलले पण त्याआधी मी त्यांचा ’माणूस दहशतवादी होतो म्हणजे काय?’ हा लेख जर वाचलेला असता तर मला काही गोष्टी नीट कळल्या असत्या. त्या माणसाचा वाचन, अनुभव यांचा अवाका इतका मोठा आहे की त्यांच्यापुढे बसताना मला ''basic logical and analytical power'' वापरून विषय समजावा इतकं तरी मी वाचलेलं असलं पाहिजे!
१) चारित्र्य म्हणजे काय?
२) धैर्य म्हणजे काय?
३) न्याय म्हणजे काय?
४) श्रद्धा म्हणजे काय?
५) औचित्य म्हणजे काय?
६) ’चांगले’ कशाला म्हणावे?
मी हे पुस्तक वाचलेलं नाही. वाचायला आवडेल. पण हे प्रश्न वाचून मनात आलं की त्या काळात विचारल्या गेलेल्या या प्रश्नांची किती उत्तरं आजच्या काळापर्यंत मिळाली आहेत? हे प्रश्न आजच्या काळाशी सुसंगत आहेत का? या प्रश्नांना उत्तरे आहेत का? socrates ला हे प्रश्न का पडले असतील?! यातल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तसं पहावं तर व्यक्तिसापेक्ष बदलणारं आहे.
यातला पहिला प्रश्न वाचला आणि मला आपल्याला २.१ मधे दिलेल्या एका group discussion च्या विषयाची आठवण झाली. ”नदी ओलांडताना” असं त्या कथेचं नाव होतं. माया नावाची गरीब मुलगी आपल्या नदीपलिकडे राहणाऱ्या, आजारी असलेल्या प्रियकराला भेटायला जाऊ इच्छित आहे. त्यासाठी मायाला नाविकाला शय्यासोबत करावी लागणार असते. कारण तिला तिचे नातेवाईक पण मदत करत नाहीत. परंतु तिचा प्रियकर मात्र तिने आपले शरीर विकले हे ऐकून संतापतो व तिला हाकलून देतो. शेवट प्रश्न होता- ”तुमच्या मते यातील सर्वात वाईट व्यक्ती कोण?” यात प्रश्न उभा राहिला होता की ’चारित्र्य’ म्हणजे काय बरं? या एका प्रसंगातून आपण मायाला ”चारित्र्यहीन’’ ठरवणार का? तिनं जे केलं त्याला आपण ”धैर्य” म्हणू शकतो का? जेव्हा प्रश्न विचारला जातो की ”तुमच्या मते वाईट कोण?” तेव्हा नकळत आपल्याला ”चांगले” कोण हेही ठरवावं लागतंच की! बर तिनं जे काही केलं ते त्या परिस्थिती नुसार ”उचित” होतं का? तिच्या प्रियकारानं तिला घरातून हाकलून दिलं, हा तिच्या त्यागाला मिळालेला ”न्याय” होता का? तिनं प्रेमावर आणि प्रियकरावर जो विश्वास ठेवून हे धाडस केलं ती तिची त्यांच्यावर असणारी ”श्रद्धा” चुकीची होती का? कथा एकच- प्रश्न मात्र बरोब्बर ६... socrates चेच प्रश्न.... उत्तरं किती? नाहीच की असंख्य???
२.१ मधे दिलेली एक कथा. त्यावर झालेली घमासान चर्चा... चर्चेतून एक उत्तर निघेल आणि अमुक एक व्यक्ती ”वाईट” एकमतानं ठरेल अशी आशा ठेवणं, हा विनोद आहे. कारण प्रत्येक व्यक्तीच्या जडणघडणीवर, विचारांवर, संस्कारांवर,सामाजिक आणि कौटुंबिक पार्श्वभूमीवर आणि संवेदनशीलतेवर यातल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर अवलंबून आहे. माणूस, काळ, परिस्थिती जशी बदलते तसं त्याचं उत्तरही बदलत जाणार असे हे प्रश्न. म्हणजे फ़क्त व्यक्तिसापेक्ष नव्हेत तर कालसापेक्षसुद्धा!! मी २.१ च्या वेळेला या कथेविषयी विचार करताना खूप गोंधळलेली होते. खरं तर अजूनही आहे. मला ”सर्वात वाईट कोण” ते अजूनही नीट ठरवता आलेलं नाही. म्हणजेच मला या प्रश्नांची उत्तरं सापडलेली नाहीत. आपल्या दैनंदिन व्यवहारामधे आपण याच प्रश्नांना भिडत असतो ना? प्रत्येक प्रश्नाच्या कित्येक छटा आहेत. माझ्यावर होणारा ”न्याय” हा दुसर्या कुणवर कधीतरी ”अन्याय” असू शकतो निदान त्या व्यक्तीला तसं वाटू शकतं. श्रद्धा आणि अंधश्रद्धा यांच्यातली सीमारेषा ठरवताना होणारे वाद आपल्याला माहीत आहेतच. आधुनिक युगामधे ’चारित्र्य’ ही संकल्पना झपाट्यानं बदलत आहे. चांगले कशाला म्हणावे; हा प्रश्न तर रोजच्या जेवणापासून सुरू होतो! भाजी मला ”चांगली” वाटेल.... कुणाला ”बेचव”...! नोकरी सोडून गावात जाऊन काम करणं कुणाला ’धैर्य’ वाटेल, कुणाला ’कर्तव्य’ वाटेल तर कुणाला ’मूर्खपणा’!!! किती साध्यासुध्या गोष्टीतून आपल्याला हे प्रश्न भेटत असतात. पण आपण त्यांची मांडणी socrates सारखी करत नाही.... :)
दररोजच्या व्यवहारात आपण या ६ चाकी प्रश्नांच्या गाडीवर बसलेले असतो. ideal system ती का ज्यात यातील एकही चाक puncture झालेलं नाही...? गाडी इतकी सुरळीत चालण्यासाठी काय बरं करायला हवं...???
’बदलते विश्व’ मनात खूप प्रश्न निर्माण करतं. ”बदला” प्रमाणे ते गतीमान आहेत आणि ”विश्वा”प्रमाणे खूप मोठे आणि अनाकलनीय.........विश्व-बदल झपाट्यानं होतोय... आपल्याला या ६ प्रश्नांची उत्तरं कधी सापडणार आहेत..?
- मुक्ता गुंडी.
No comments:
Post a Comment