Tuesday, September 22, 2009

देशमुख जाधव भाई-भाई...

पाण्‍याच्‍या आवाजानं सकाळी पाचलाच जाग आली. थंडी पडलेली.. कम्‍प्‍युटरचा खूप मोह होत असूनही घरातल्‍या कामाला लागले. संध्‍याकाळी आणलेलं किराणा सामान भरुन ठेवायचं होतं. अपूर्वला उठवलं. भराभर आवरलं. ऑफीसला जाण्‍यासाठी दार उघडणार तोच दारावरची बेल वाजली. डेंग्‍यू पेशंट अपूर्व परीक्षेसाठी कॉलेजला गेलेला, कोण असू शकतं यावेळी? जरा आश्‍चर्य वाटून दार उघडताच समोर एक अधिकारी आणि दुसरा त्‍याचा मदतनीस अशी जोडी दिसताच मी ओळखलं ते कोण असावेत. मी त्‍यांना ‘आत या’ म्‍हणत सोफ्याकडे निर्देश केला. दीनानाथ हॉस्पिटलमधून अपूर्वला डिसचार्ज मिळताना डॉक्‍टरांनी सांगितलं होतं की, ‘आठ दिवसाच्‍या आत मनपाचं पथक तुमच्‍या घरी येऊन जाईल. तुमच्‍याकडून सगळी हिस्‍ट्री ते घेतील आणि फवारणी करतील. हॉस्पिटलकडून अशा पेशंटबद्दल त्‍यांना कळवावं लागतं आम्‍ही ते कळवलंय’. मला डॉक्‍टरांनी सांगितलेलं सगळं आठवत होतंच.

मी त्‍यांच्‍यासमोर ऑफीसला उशीर होत असूनही बसले. मनपाचे डेंग्‍यू पथकाचे मुख्‍य कर्मचारी जाधव म्‍हणून होते.

त्‍यांनी मला आपुलकीनं विचारलं,’पेशंट कोण ?’

मी म्‍हटलं,’ माझा मुलगा’

ते म्‍हणाले, “किती वर्षाचा ?”

मी- “19 वं चालू आहे”.

“आता कसा आहे ?”,

मी सांगितलं “आता चांगला आहे. परीक्षा देण्‍यासाठी गेलाय”.

मग त्‍यांनी विचारलं,’ कधी त्रास सुरु झाला?”,

मला 30 ऑगस्‍ट आठवला. त्‍याची थंडी वाजून चढणारा ताप, दुखणारं डोक,अंग, लालेलाल झालेला चेहरा आणि तळहात...ससून हॉस्पिटल...दीनानाथ हॉस्पिटल.. सगळं तारीख आणि वेळेनुसार आठवलं. मी त्‍यांना आवश्‍यक ते सांगत गेले....तो आत्मियतेनं ऐकत होता.

“घरात किती लोकं असता ?”

मी म्‍हटलं, “आम्‍ही दोघंच”,

तो म्‍हणाला, “इथं कधीपासून आहात”.

मी म्‍हटलं, “दोन-तीन महिने झालेत, याआधी मी मुंबईला होते”.

तो म्‍हणाला, “मिस्‍टरांचं नाव?”,

मी सांगितलं. तो म्‍हणाला, “काय करतात ते, मुंबईला असतात ?”

मी म्‍हटलं, “ते नाहीत आता. आम्‍ही दोघंच असतो”.

तो म्‍हणाला, “सॉरी मॅडम”.


Its ok म्‍हणत मीच त्‍याला समजावलं. पण एकूणच मला इतकं छान वाटत होतं. त्‍याचं विचारणं एक गंभीर कोरा चेहरा ठेवून यांत्रिकपणे नव्‍हतं तर इतक्‍या आपुलकीनं तो विचारत होता की तो माझा कुणी नातलग असावा असं मला वाटत होतं. त्‍याला सगळं घर पहायचं होतं. घरात फ्रीज, कुंड्या आहेत का, कुठे पाणी साठलंय का..खूप व्‍यवस्थित काळजीपूर्वक तो सारं पहात होता. बोलत बोलत आम्‍ही बाल्‍कनीत आलो. तो म्‍हणाला, “तुमच्‍या नावाचा खाली सोसायटीत बोर्डही नाही. तुम्‍ही हा फ्लॅट आत्ताचं विकत घेतलाय का ?” त्‍याच्‍या या प्रश्‍नानं “चला घेऊनच टाकूया आता” असा फील मला आला. मी मनाला दटावत आनंदीत झालेला चेहरा जाणीवपूर्वक गंभीर करत “मी इथं रेन्‍टनं, किरायानं रहाते” असं सांगितलं. तो म्‍हणाला, “मॅडम, तुमचा हा फ्लॅट खूप छान आहे !” मी मान डोलावली. त्‍याच्‍यासाठी कांदेपोहे आणि चहा करावा असं मला तीव्रतेने वाटू लागलं. पण ऑफीसला होत जाणारा उशीर बघून मी मनाला पुन्‍हा आवरलं.

त्‍यानं एक पॅम्‍प्‍लेट मला दिलं. त्‍यात डेंग्‍यूबद्दलची माहिती होती. तो स्‍वतःही काय काय काळजी घ्‍यावी याबद्दल मला सविस्‍तर सांगू लागला. त्‍याचं पथकही तितकंच प्रेमळ आणि गुणी होतं. घरात परवानगी घेऊन (जसं शाळेत मुलं “बाई आत येऊ ?”, किंवा “मे आय कमइन?” विचारतात तसंच विचारत ते आत आलं.) सगळीकडे फवारणी करु लागले. मला या सगळ्यांमुळे ‘घर भरल्‍यासारखं वाटतं’ म्‍हणजे काय याचा प्रत्‍यय येऊ लागला. दिवाळी किंवा दसरा साजरा करावा असंही वाटू लागलं. या धावणा-या मनाला काबूत ठेवता ठेवता माझ्या नाकी नऊ (किंवा दहा) येऊ लागले.

माझ्या शेजारी कोण रहातं याची त्‍यांनी चौकशी केली. मग प्रत्‍येक फ्लॅटमध्‍ये जाऊन फवारणी करत ते पॅम्‍प्‍लेट देत माहिती देऊ लागले. काय करावं याबद्दल सांगू लागले. घरात ज्‍या बारकाईनं ते त्‍या डेंग्‍यूला शोधत होते. मलाही कुतूहल वाटू लागलं. यांना तो डेंग्‍यू डास कसा सापडणार, कळत नव्‍हतंच. मी विचारताच ते म्‍हणाले, “सापडेल. फ्रीजमागं, कुठंही कोप-यात..” मग ते टेरेसवरही गेले. तिथे त्‍यांना एका अर्धवट पाण्‍यानं भरलेल्‍या बादलीत डासांची अंडी दिसली. ती गील नावाच्‍या आमच्‍या फ्लॅटधारकाची होती. विजयी मुद्रेनं त्‍याचा नायनाट करीत ते फ्लॅटच्‍या खाली लिफ्टचा वापर न करता पाय-यानं उतरले. मला आठवलं. काहीच म्‍हणजे पंधरा दिवसांपूर्वी मी आणि अपूर्व लिफ्टमध्‍ये अडकलो होतो. म्‍हणजे लिफ्टचं दार उघडतच नव्‍हतं. मग खालीवर करत टेरेसवर पोहोचून ते शटर उघडण्‍याचा आटोकाट प्रयत्‍नही केला होता. आणि लाईट गेल्‍यामुळे आता लिफ्ट खालीदेखील जाऊ शकत नव्‍हती. टेरेसवरुन ओरडूनही कोणालाही आवाज ऐकू जाणं शक्‍य नव्‍हतं. त्‍यावेळी चावला असेल का हा डेंग्‍यू डास ? त्‍यावेळी त्‍या गील महोदयांनीच अनेक क्‍लुप्‍त्‍या करीत आम्‍हाला लिफ्टच्‍या बाहेर काढण्‍यास मदत केली होती. मी जाधवांना ही माहितीही पुरवली. ते म्‍हणाले, “लिफ्टमध्‍ये अडकण्‍याची भीती मलाही फार वाटते त्‍यामुळे मी आपला पाय-या चढत उतरतच कामं करतो”.

खाली येताच निरीक्षण करणारे इतर कर्मचारी बघून मी त्‍यांच्‍याशी बोलती झाले. ते कर्मचारी मला सांगत होते. “सोसायटीचं चेअरमन कोण आहे ?” अर्थातच माझ्या स्‍मरणशक्‍तीनं याही वेळेस मला दगा दिला. मला आठवेचना. खरं तर मेन्‍टेनन्‍स द्यायला मी त्‍यांच्‍याकडे गेले होते. मग मला जरावेळानं एकदम नाव आठवलं. “कुर्तकोटी..”.मी ओरडले. तो म्‍हणाला, “बघा ना, पिण्‍याच्‍या पाण्‍याची टाकी आणि झाकणं तुटलेलं, किती कचरा आत जात असणार, डासांची अंडीही या उघड्या पाण्‍यात होणार...शिकलेल्‍या लोकांनी ही काळजी घेऊ नये का ? तुम्‍ही बघाच. म्‍हणजे तुम्‍ही काळजीनं त्‍यांना सांगू शकाल. एक झाकण करुन घ्‍या ताबडतोब”. तो अतिशय मृदू आवाजात मला सांगत होता. सरकारी किंवा कुठलेली कर्मचारी ज्‍या दमदाटीच्‍या आवाजात गुरकावतात आणि आपण गुन्‍हेगार आहोत असं वाटण्‍याचा न्‍यूनगंड आपल्‍याला देतात त्‍यापेक्षा हे सगळं उलटंच चित्र होतं.

तो म्‍हणाला, “तुम्‍हाला उशीर होतोय का, तुम्‍ही जाऊ शकता ऑफीसला..आमचं काम चालू राहील. आम्‍ही उद्याही येऊ”. आसपासही ते फवारणी करत होतेच. मला त्‍या सगळ्या पथकाचाच अभिमान वाटला. इतकी जागरुकता, आणि कामाला दिलेला माणुसकीचा चेहरा मला थक्‍क करुन गेला. मी अक्षरशः तरंगतच आफीसला येऊन पोहोचले. या आनंदाचं काय करावं हे कळत नव्‍हतंच. मग मी जरबेराची छानशी केशरी रंगाची दोन फुलं घेतली. जरबेरासारख्‍याच असणा-या पॅट्रिशा मॅडमच्‍या केबिनचं दार ठोठावत त्‍यांना दिली. त्‍यांनीही “Thank you, how is your son ?” म्‍हणत ती स्‍वीकारली. मी तशीच तरंगत माझ्या जागेवर आले. सागर जोशी प्रसन्‍न चेह-यानं माझ्याजवळ आला होता. त्‍याच्‍या हातात माझ्यासाठी आणलेली दोन जरबेराची टवटवीत फुलं होती. मी ती हातात घेतली. असं वाटलं जोरदार आवाजात म्‍हणावं,

देशमुख जाधव भाई भाई....

-दीपा देशमुख


No comments: