Saturday, September 5, 2009

Sayano Sushenskaya catastrophe and PPP

17 ऑगस्ट 09 ला रशियातील सर्वात मोठ्या जल विद्युत प्रकल्पात अपघात घडला. टरबाईनचे झाकण तुटून रोटर हवेत उडाले आणि सर्वत्र पाणी शिरले. यात 75 कर्मचारी दगावले. चेर्नोबिल नंतर हा रशियातील सर्वात मोठा तांत्रिक अपघात असे मानले जात आहे.

Sayano Sushenkaya प्रकल्प

रशिया मध्ये बोरिस येस्ल्टिन राष्ट्रपती असताना सरकारी यंत्रणा आणि उद्योजक यांमध्ये सलगी निर्माण झाली ज्याला पुटिन च्या काळातही बढावा मिळाला ज्यामुळे भ्रष्ट आर्थिक व्यवस्था निर्माण झाली, ज्याला burness म्हणजे bureaucratic business असा वाक्प्रचार वापरला जातो. याचेच फलरूप सयानो च्या प्रकल्पात दिसत होते. ओलेग डेरिपास्का या उद्योजकाचे क्रेमलिन शी घनिष्ट संबंध होते. रसअल (RusAl) ही त्याची कंपनी ही जगातील सर्वात जास्त ऍल्युमिनियम बनवणारी कंपनी आहे. सयानो प्रकल्पात गेले काही महिने क्षमतेला ताण देवून वीज निर्मिती होत होती. त्यापैकी 75 टक्के वीज ही रसअल सवलतीच्या खरेदी करत होती. रशिया मध्ये वीजेचा दर सरकार ठरवते. इतर ग्राहक व घरगुती वीज पुरवठा दरापेक्षाही कमी दरानी रसअल ला वीज विकली जात होती. रसअल ला झालेल्या नफ्यामध्ये सरकारचा काहीच वाटा नव्हता. या नफ्यातून काही रक्कम ही सयानो च्या दुरुस्ती साठी वापरता येवू शकली असती.

2005 ते 2008 या दरम्यान नेब्रिसाका यांना सरकारकडून $8.2 बिलियन डिविडंट म्हणून मिळाले. मंदी येताच बेलआऊटची मागणी नेब्रिसाका यांनी केली आणि त्यांना सरकारनी $4.5 बिलियन डॉलर देऊ केले. अर्थतज्ञ डेल्यागिन यांनी याचे वर्णन ‘Privatization of profit and nationalization of loss’ असे केले आहे!

भारतातही PPP चे प्रयोग आता चालू झाले आहेत. PPP म्हणजेच Public Private Partnership. याचे फायदे आणि दुष्परिणाम अनेक ठिकाणी आपल्याला दिसून येते. कंत्राटदार राज म्हणजेच काँट्रॅक्टर राजचा एक जमाना होता. NREGA मध्ये कंत्राटदाराला काढून सरकार नी सर्व जबाबदारी घेतली आहे. दुसर्‍या बाजूला PPP च्या तत्त्वावर चालणारी cleartrip.com याची सेवा सरकारी irctc.co.in च्या पेक्षा कितीतरी चांगली आहे.

PPP मधल्या Public मुळे प्रचंड ताकत येते (आर्थिक, पायाभूत सुविधा, व्याप्ती) आणि Private मुळे कार्यक्षमता आणि उद्योजकता येते. पण या दोघांचे संगन्मत होवून लुबाडणारे लुटारू लोक निर्माण होण्यापासून थांबवण्यासाठी कोणती व्यवस्था तयार करायची हे मोठे आव्हान आहे.

MKCL हा PPP च्या एक पाऊल पुढे जाऊन यातील तोटे कमी करण्याचा एक प्रयोग आहे. पण त्याबद्दल अभ्यास करून मग लिहीन.

या निमित्त काही आकडेवारी

1979 मध्ये बांधलेला सयानो सुशेंकया प्रकल्प हा वीज निर्मिती क्षमतेनुसार जगातील सहाव्या क्रमांकाचा व एशियातील प्रथम क्रमांकाचा जल विद्युत प्रकल्प आहे. इथे अंदाजे 6700 MW वीज निर्मिती होते. रशिया च्या एकूण वीज निर्मिती च्या 2.5 टक्के व जल विद्युत निर्मिती च्या 25 टक्के वीज इथे निर्माण होते.

जगातील सर्वात मोठा जल विद्युत प्रकल्प हा चीन मध्ये, थ्री गॉर्जेस डॅम या ठिकाणी आहे. सध्या इथे 18,300 MW इतकी वीज निर्माण होते आणि काम पूर्ण झाल्यावर 22,500 MW निर्माण होईल.

भारतात सध्या अंदाजे 1,50,000 MW इतकी वीज निर्माण करण्याची क्षमता आहे. त्यापैकी 37,000 MW वीज ही जल विद्युत पद्धतीनी होते.

सध्या महारष्ट्रातात (व भारतातही) कोयना जल विद्युत प्रकल्प (अंदाजे 2000 MW) हा सर्वात मोठा जल विद्युत प्रकल्प आहे. चंद्रपूर इथे कोळशापासून औष्णिक वीज प्रकल्पात अंदाजे 2400 MW वीज निर्मिती होते.

सतलज नदीवरचा नाथपा झाकरी प्रकल्पात 1,500 MW वीज निर्माण होते.

कोयना प्रकल्प

4 सप्टेंबर 2009 च्या द हिंदू या वर्तमानपत्रात आलेल्या अग्रलेखावरून प्रेरीत. हा लेख आपण इथे वाचू शकता.

-प्रियदर्शन

No comments: