Saturday, September 5, 2009

एक जाणीव

गावात राहून आल्यानंतर म्हणण्यापेक्षा निर्माण 2.1 पासून आजपर्यंत सुरू असलेल्या विचारप्रक्रियेतून झालेली एक जाणीव...

अनेक छोट्या खेड्यांनी मिळून सोलापूर हे शहर तयार झाले आहे. या शहरात आजुबाजूला थोडस डोळसपणे बघितलं की लक्षात येतं, अरे, आपण गावात पाहिलेले, आपल्याला जाणवलेले प्रश्न फक्त गावात नाहीत , ते आपल्या अवतीभवतीसुद्धा कोणत्या ना कोणत्या स्वरूपात आहेत.

रस्त्यावरून जाताना सोलापुरात अशी कित्येक ठिकाणं आहेत जिथे रस्त्याच्या कडेने लोक उघड्यावर प्रातःर्विधीसाठी बसलेले असतात, वेगवेगळ्या कारखान्यात, हॉटेलात, दुकानात लहान मुले काम करीत असतात,कित्येकांना विडी, सिगारेट, गुटखा, तंबाखूचे व्यसन असते, एखादी 70 वर्षाची म्हातारी आजीबाई रोज गाडीवर केळी विकून पोट भरते, जिल्हा परिषदांच्या शाळांमध्ये शिक्षक निम्म्यापेक्षा जास्त वेळ इतर कामे करतात, या शाळेतील मुलांना 5 ,6 वीत गेले तरी वाचता येत नाही, विशिष्ट भागातली (झोपडपट्टीतली) मुले, मोठी माणसे, तिथली अस्वच्छता, व्यसनाधीनता, दारिद्र्य, इ. अनेक प्रश्न.

ही यादी न संपणारी अशीच आहे. वरील सगळ्या गोष्टी आपल्याला माहीत नव्ह्त्या का? तर होत्या. पण असं वाटायच, की मी म्हणजे कुणीतरी वेगळा आहे. वेगळा म्हणजे श्रेष्ठ नाही पण तरीही हे सगळे प्रश्न आपले नाहीत, आपला त्यांच्याशी काही संबंध नाही, अशी टिपिकल मध्यमवर्गीय मानसिकता होती. पण आता लक्षात येतंय, आपणही त्यांच्यातलेच एक आहोत. हे आपल्या सगळ्यांचे प्रश्न आहेत. ते सोडवण्यासाठी फक्त व्यवस्थेला जबाबदार धरुन आपल्याला मोकळं होता येणार नाही. समाजाप्रती आपली काही कर्तव्य आणि जबाबदा-या आहेत.

हा फक्त माझा एकटीचाच प्रश्न नाही. जवळजवळ प्रत्येकालाच वाटतं की, मी डॉ. म्हणून वेगळा किंवा इंजिनिअर म्हणून वेगळा किंवा आणख़ी काही. त्यामुळे आपण स्वतःला एका कोषात बंदिस्त करून घेतो. आपल्यातला संवाद कमी होतो. समाजात प्रत्येक व्यक्तीची वेगवेगळी बेटं तयार होतात. या कोषातून बाहेर येऊन स्वतःहून लोकांशी संवाद साधणे, ते कोणीतरी वेगळे किंवा आपण कोणीतरी वेगळे असे न मानता आपण सारे एक आहोत. हे सारे माझे प्रश्न आहेत अस मला आता वाटायला लागलेय.

कदाचित, सारे भारतीय माझे बांधव आहेत या प्रतिज्ञेतील वाक्याचा अर्थ मला आत्ता समजायला लागलाय!

-तृप्‍ती कल्‍याणशेट्टी


1 comment:

Anonymous said...

mastach trupti.. chaan aani satya lihilays..