10 वीच्या सुट्ट्यांमधे मी आनंदवन येथे गेलो होतो. असाच एकटा. नुकतीच दहावीची परीक्षा झालेली. साधना आमटेंच ‘समिधा’ हे पुस्तक वाचनात आलं आणि मी त्यांना पत्र पाठवलं. तर प्रत्यक्ष साधनाताईंच पत्रोत्तर आलं. भेटायला आणि आनंदवन पाहायला ये म्हणून. तसाच निघालो. मनात आनंदवनाबद्दलच्या खूप सार्या कल्पना घेऊन.
आनंदवनाच्या गेट मधून आत प्रवेश केला की उजव्या बाजूला काही अंतरावर एक मोठी ड्रेसिंग रूम आहे. तिथे कुष्ठरूग्णांच्या जखमांना रोज ड्रेसिंग केल्या जातं. तिथे जाऊन पोहचलो. त्या वेळी बायोलॉजीची आणि डॉक्टरी पेशाची मनस्वी चीड होती. म्हणून मग ड्रेसिंग कसं करतात ते पाहायचं आणि जमलं तर प्रत्यक्षात स्वतः करून पाहायचं असं ठरवलं. दुसर्या दिवशी सकाळीच क्लिनिकला गेलो.
ती रूम बर्यापैकी मोठी. चार खाटा ठेवलेल्या. आणि बॅंडेजच सामान. आयोडीनचा वास.खास हॉस्पिटलचं वातावरण. बॅंडेज करायला चारजणं आणि गरज असल्यास इंजेक्शन द्यायला अजून एक. असे पाचजण मिळून आठ-नऊशे लोकांचं बॅंडेज करायचे.
सकाळी 6 वाजता काम सुरू व्हायचं. सगळ्या पेशंटना बॅंडेज करून आपापल्या कामाला जायचं असायचं.म्हणून सकाळी तिथे कायम गर्दी आणि घाई असायची. सगळ्यांनाच कामाला जायची लगबग.
पहिल्या दिवशी सगळं फक्त पाहात होतो.आधीची पट्टी सोडणं, औषध लाऊन जखम धुवून त्यावर पट्टी लावणं. पिवळी आणि पांढरी असे पट्ट्यांचे दोन प्रकार. ज्यांची जखम अजून ओली असेल अशांसाठी पिवळी तर इतरांसाठी पांढरी पट्टी. अनेक जखमा. आणि त्यावर रोज केल्या जाणारं बॅंडेज. काम करायचं असेल तर चालणं आलचं. आणि त्यासाठी रोज पट्ट्या बदलणं देखील.
बहुतेक सगळी म्हातारी नाहीतर चाळीशी पार केलेली माणसं. बर्याच वर्षांपासून आनंदवनात असणारी. तिथेच काही ना काही काम करणारी.
पट्ट्या बांधणं वाटलं तेवढं सोपं नव्हतं. प्रत्येक पेशंटची पट्टी बांधायची विशिष्ट पद्धत असायची. वर्षानुवर्ष पट्टी बांधून तयार झालेली. झडलेल्या बोटांनुसार, ते जे काम करतात त्या कामाच्या स्वरूपानुसार ठरलेली. शेतात काम करणार्या म्हातार्या एक जादा पट्टी सोबत ठेवत. प्रत्येकजण आदल्या दिवशीची स्वतःची पट्टी सोबत घेऊन बसायचा.
पट्ट्या बांधून घेताना त्यांना कसल्या वेदना होत नसत. कारण कुष्ठरूग्णाला त्या भागात संवेदना नसतात. बंडेज गुंडाळताना, ती पांढरी पट्टी घट्ट आवळून बांधावी लागायची. आधी खूप सारा मेडिकेटेड कापूस पायाभोवती गुंडाळायचा आणि मग पट्टी बांधायची. अशी घट्ट बांधली की दिवसभर काम करताना ती निसटत नसे.
कधी कधी जखमेतून छोटे दगड, काचेचे तुकडे असं बरचं काही काढावं लागायचं. शेतात काम करताना पट्ट्यांमधून हे सगळं त्या जखमेत जाऊन बसायचं.
मी नवीन आहे, अजून शिकतोय हे कळाल्यावर तिथल्या म्हातार्या पट्टी बांधताना धीर द्यायच्या. त्यांना पट्टी कशी बांधून हवी ते स्वतःहून सांगायच्या. चुकलं तर ओरडायच्या. नीट जमल्यावर मनापासून शाबासकी द्यायच्या.
मी आणि मोना सोडून ड्रेसिंग करणारे बाकी सगळे कुष्ठरूग्णच होते. ट्रिटमेंट घेऊन बरे झालेले.
सकाळी सहा ते नऊ प्रचंड काम. गडबड आणि धांदल. नऊ नंतर मात्र म्हातारेकोतारे, कामाला न जाऊ शकणारे पेशंट यायचे. सगळं आवरायला अकरा वाजायचे.
ती ड्रेसिंग रूम म्हणजे गडबड, गोंधळ आणि आनंदाचा नुसता कल्लोळ असायचा. ड्रेसिंग करणारं कुणी आलं नसेल तर त्याची चौकशी व्हायची. एकमेकांची थट्टा करत आणि हसतखेळत सगळं काम चालायचं.
रोज काम करून कामात सफाई येऊ लागली. 10-12 दिवस काम केल्यानंतर तर कुणाला कशी पट्टी लागते हे पाठच झालं होतं. पट्टी नीट जमली तर त्या प्रेमळ म्हातार्या खूपच कौतुक करायच्या..आर्शीर्वाद द्यायच्या.
सुरूवातीला वाटायचं, काय ह्या त्यांच्या वेदना..किती हा त्यांना त्रास..रोज पट्टी बदलायची. जखम झाली तर ती चिघळायची. मग काही दिवस काम बंद. असं बरच काही.
पुस्तकातून वाचून डोक्यात बसलेलं दुःख मी त्यांच्यात शोधायला जायचो. पण ही मंडळी तर भलतीच आनंदी असायची. कसलं दुःख आणि कसलं काय? जे झालयं ते मान्य करून जगायची.
प्रत्यक्षात दुःख होतं, वेदना देखील होती. पण या लोकांनी ती खूप सौम्य करून टाकली होती.
एकदा तर एक पेशंट आले होते. बरेच म्हातारे होते. त्यांच्या डाव्या पायाचा अर्धा अंगठा उंदराने रात्रीतून कुरतडून खाऊन टाकला होता.. संवेदना नसल्याने रात्री त्यांच्या लक्षात आलं नाही. सकाळी ऊठून पाहतात तर अंथरूणात सगळं रक्तं. त्यांचं ड्रेसिंग करताना खूप भरून येत होतं.
चार-पाच दिवसात बाबांच्या कानावर ही गोष्ट गेली की जालन्याहून आलेला मुलगा रोज ड्रेसिंग करतोय. त्यांनी मुद्दाम भेटायला बोलावलं. तोपर्यंत त्यांची भेट झालीच नव्हती. आनंदवनाचा सगळा परिसरच एवढा मोठा होता की तो पाहताना सगळा दिवस निघून जायचा. आणि त्यांना भेटायला जायचं दडपणचं यायचं. आपण काही काम करत नाही, तर पहिल्याच दिवशी जाऊन त्यांना कसं भेटायचं अशी काहीशी भावना मनात होती.
मग मी त्यांना भेटायला गेलो. खूप वेळ बोलत होते..काय बोलत होते ते आता फारसं आठवत नाही कारण मी खूप भारावून गेलो होतो. केवढा मोठा माणूस.. काही सुचतच नव्हतं त्या वेळेस.
बाबा त्यावेळेस रोज पहाटे स्ट्रेचरवरून फिरायला जायचे. मला म्हणाले, ‘तूही रोज येत जा’. तिथून पुढे आनंदवनात होतो तोपर्यंत मी रोज पहाटे त्यांच्यासोबत फिरायला जायचो. तो अर्धा पाऊन तास भलताच भन्नाट असायचा. पावसाळी वातावरण, पहाटेची वेळ आणि त्यात बाबांसोबत त्यांचं बोलणं ऐकत फिरणं. सगळच स्वप्नवत.
कुष्ठरोगासारख्या भीषण रोगाशी लढणारी ही माणसं. आता आनंदी असली तरी खूप काही सोसलेली. कुष्ठरोगाचे निदान झाल्यावर घरच्यांनी आणि गावातल्या लोकांनी झिडकारलेली. त्यांची वेदना सारखी असल्याने सगळी एकमेकांना धरून राहायची, सांभाळायची.
बाबा त्यांच्या झडलेल्या बोटांकडे पाहून त्यांना ‘ जीवंत मानवी शिल्प ’ म्हणतात. तेंव्हा त्याचा अर्थ कळायचा नाही, पण आता कळतो.
मी आनंदवनात गेलो होतो तेंव्हा वैचारिक गुंत्यात फारसा पडलोच नव्हतो. आपण काहीतरी वेगळं करत आहोत असंही तेंव्हा वाटलं नव्हतं. सेवेचं सामर्थ्य मला बाबांच्या आनंदवनात शिकायला मिळालं. मला ते खूप भावलं. जवळचं वाटलं. त्या नकळत्या वयात तिथल्या कुष्ठरूग्णांशी मी जोडल्या गेलो. माझा मित्र मला विचारत होता, ‘सध्या जे काम करतो आहेस, त्याची प्रेरणा तुला कुठून मिळाली?’ मागे वळून विचार केला आणि आनंदवनातला हा अनुभव आठवला. कदाचित हीच माझी प्रेरणा असेल..नक्की ठाऊक नाही..प्रेरणेचं नक्की माहीत नाही, पण आनंद आणि समाधान मात्र खूप मिळालं. या अनुभवाने खूप काही दिलं. शब्दांच्या पलीकडचं !
-सागर जोशी
2 comments:
khup chan anubhav aahe.....vachun khup chan vatal...me svataha ek doctor aahe...internship chalu aahe mazi sadhya....kharach ekhadyachi seva karun jo aanad milato to me anubhavala aahe....really...khup amezing feeling astat tya...keep it up
Khup sundar. Mala asha goshti wachun nehmi aapan doctor nahi yabaddal halhal watate. Midekhil Taaincha pustak alikadech wachala aani tyanna patrahi pathawala..yeti diwali anandawanat celebrate karen. Kharya arthana..
Post a Comment